
कविश शेट्टीचा व्हायरल लूक
‘आफ्टर ओएलसी’च्या पोस्टरवरील चार्मिंग आणि डॅशिंग लूकमुळे अभिनेता कविश शेट्टीने चाहत्यांमध्ये एक वेगळीच चर्चा रंगवली आहे. साऊथ सिनेसृष्टीत अनेक उल्लेखनीय भूमिका साकारल्यानंतर आता मराठी चित्रपटातून त्याचा दमदार प्रवास सुरू होत आहे. पोस्टरवरील त्याचा रुबाबदार अंदाज तरुणाईला भावला असून सोशल मीडियावर त्याचा लूक झपाट्याने व्हायरल होत आहे.
मराठी मातीशी जोडलेली नाळ
कन्नड हा जन्मभूमीचा भाषा-अनुभव असलेला कविश, आता मनाने पूर्णपणे ‘मराठी’ झाला आहे. महाराष्ट्रात काही वर्षे वास्तव्यास असल्याने मराठी संस्कृती, बोली आणि जीवनशैली यांचा त्याच्यावर खोलवर प्रभाव पडला आहे. याच भावनेतून ‘मराठीसाठी काहीतरी विशेष करायचं’ या इच्छेने त्याने ‘आफ्टर ओएलसी’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.
मराठी सिनेमातील पदार्पणाची कहाणी
कविश सांगतो, “मराठी सिनेमा करणं हे माझं स्वप्न होतं. महाराष्ट्राने मला आयुष्यात खऱ्या अर्थाने उभं केलं. त्यामुळे या मातीसाठी काहीतरी देणं माझ्यासाठी आवश्यक होतं.” भाषेचं आव्हान असलं तरी महाराष्ट्रात राहिल्यामुळे मराठी संवाद बोलण्यात त्याने सहजता मिळवली. भूमिकेसाठी त्याने केस वाढवले आणि ती स्टाईल शूट संपेपर्यंत सांभाळणेही कठीण ठरले.

ॲक्शन दृश्यांमागची जिद्द
चित्रपटातील ॲक्शन सीन्स कठीण ठिकाणी शूट झाले. ‘KGF’, ‘कांतारा’ आणि ‘सलार’चे प्रसिद्ध फाईट मास्टर विक्रम मोर यांच्या मार्गदर्शनाखाली कविशने हे ॲक्शन सीन्स पूर्ण केले. एका उंच उडीच्या सीनमध्ये त्याचा तोल जाऊन गंभीर दुखापतही झाली. तब्बल सहा महिने बेडरेस्ट घेतल्यानंतर तो पुन्हा सेटवर परतला आणि आव्हान स्विकारत चित्रपटाचं शूट पूर्ण केलं.
दिग्दर्शन आणि निर्मिती
हा चित्रपट कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी मराठी आणि कन्नड दोन्ही भाषांमध्ये दिग्दर्शित केला आहे.
निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’च्या माध्यमातून केली आहे.
प्रदर्शनाची तारीख
‘आफ्टर ओएलसी’ हा सिनेमा येत्या २८ नोव्हेंबर रोजी मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत जगभरात प्रदर्शित होत आहे.
