मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सुवर्णसंधी

गेले दशकभर दादासाहेब फाळके चित्रनगरी घेतेय इफ्फी फिल्म बाजारमध्ये सहभाग

पणजी दि. २१ — भारतीय चित्रपटसृष्टीतील निर्माते, तंत्रज्ञ आणि जगभरातील व्यावसायिक चित्रपट संस्थांना एका मंचावर आणणाऱ्या इफ्फी फिल्म बाजारमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीने गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सहभाग नोंदवला आहे. यंदाच्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने वेव्हज फिल्म मार्केटमध्ये सहभाग घेतला असून ‘श्री गणेशा’ आणि ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या दोन मराठी चित्रपटांचे विशेष प्रदर्शन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठी चित्रपटांची जोरदार उपस्थिती

मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांना जागतिक खरेदीदार आणि वितरकांशी जोडण्यासाठी महामंडळ गेली अनेक वर्षे इफ्फीमध्ये सहभाग घेत आहे. या सहभागाचे यंदाचे वर्ष हे अकरावे वर्ष ठरत आहे. सातत्याने उपस्थिती नोंदवत महाराष्ट्र या महोत्सवात एक महत्त्वाचे राज्य म्हणून उदयास आले आहे. मराठी चित्रपटांच्या गुणवत्तेची, विषयवैविध्याची आणि जागतिक बाजारपेठेत त्यांच्या क्षमतेची नोंद विविध देशांतील प्रतिनिधी घेत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

चित्रपट प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फिल्म बाजार विभागात संकेत माने दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ आणि श्री. मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘श्री गणेशा’ या दोन चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक आणि प्रतिनिधींकडून दणदणीत प्रतिसाद मिळाला. रसिकांनी केवळ कथा नाही तर तांत्रिक गुणवत्ता, संगीत आणि दिग्दर्शनालाही भरभरून दाद दिली. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आयोजित परिसंवादातही या चित्रपटांविषयी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या घडामोडींवर चर्चा होणार आहे.

चित्रनगरीचा स्टॉल — आकर्षणाचे प्रमुख केंद्र

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट/कंट्री पॅव्हेलियनमध्ये आकर्षक आणि माहितीपूर्ण स्टॉल उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे चित्रपटकर्मींना दिल्या जाणाऱ्या विविध योजना, फिल्म बाजारात प्रदर्शित दोन्ही चित्रपट, तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीतील प्रगत सुविधा — या सर्वांची माहिती या स्टॉलमधून जागतिक प्रतिनिधींना दिली जात आहे. याशिवाय एन. डी. स्टुडिओची माहितीही स्टॉलमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे स्टॉलला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

महामंडळाचा प्रयत्न — मराठी चित्रपटांना जागतिक दालनात स्थान मिळवून देण्याचा

या सातत्यपूर्ण सहभागामुळे महाराष्ट्र चित्रपटसृष्टीला जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे स्थान मिळत आहे. इफ्फी फिल्म बाजारासारख्या महत्त्वाच्या मंचावरून मराठी चित्रपटांचे जागतिक वितरण, सहनिर्मिती, गुंतवणूक आणि परदेशी बाजारपेठांकडे वाटचाल अधिक वेगाने होत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

Leave a comment