
माध्यमकर्मी व चित्रकर्मींसोबत साधला संवाद
पणजी, २२ — देशविदेशातील चित्रपटकर्मी, भारतीय प्रादेशिक चित्रपटांचे प्रतिनिधी, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उत्साही उपस्थितीमुळे ५६ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गजबजून गेला आहे. या महोत्सवातील वेव्हज फिल्म बाजार विभागात दादासाहेब फाळके चित्रनगरीने उभारलेला आकर्षक आणि भव्य स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी या स्टॉलचे उद्घाटन करत औपचारिक सुरुवात केली.

स्टॉलच्या माध्यमातून मराठी तसेच हिंदी चित्रपट, मालिका आणि विविध माध्यमांसाठी चित्रिकरणाच्या सुविधा, तसेच चित्रपट उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळ चालवत असलेल्या योजना आणि उपक्रमांची माहिती जगभरातून उपस्थित असलेल्या चित्रपटकर्मींपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश साधला जात आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ गेली अनेक वर्षे कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह देशातील आणि विदेशातील निवडक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सातत्याने सहभाग नोंदवत आहे. या फिल्म बाजारांमध्ये महामंडळाने आपले ठळक अस्तित्व निर्माण केले असून मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात आले आहे.
गोव्यातील फिल्म बाजारातील सहभागाचे यंदाचे १० वे वर्ष असून, या निमित्ताने महामंडळाने पुन्हा एकदा आकर्षक स्टॉल उभारत चित्रपट उद्योग विस्ताराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान स्टॉल सर्वांसाठी खुला असून, महामंडळाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे.

पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय प्रेक्षक, निर्माते, तंत्रज्ञ आणि चित्रपटकर्मी यांनी मोठ्या संख्येने स्टॉलला भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटनानंतर स्वाती म्हसे पाटील यांनी माध्यमकर्मी आणि चित्रपटकर्मींशी विशेष संवाद साधत उद्योगासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांवर चर्चा केली. विविध भाषांतील प्रतिनिधींनी या संवाद सत्रात सक्रिय सहभाग घेतला.
महामंडळाचा हा स्टॉल केवळ माहितीचे केंद्र नसून मराठी चित्रपटांना जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी तयार केलेले एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.
