
मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ या औचित्याने हा सन्मान निवडला जातो.
२०१४ पासून नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून मराठी नाट्य कलाकार संघातर्फे साजरा केला जातो. व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांचा स्वतंत्र दिवस असावा, या भावनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली. त्या दिवसाच्याच निमित्ताने दरवर्षी एखाद्या मान्यवर रंगकर्मीला ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदा हा मान वंदना गुप्ते यांच्याकडे आला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही मराठी रंगभूमीची मातृसंस्था असून, मराठी नाट्य कलाकार संघ ही तिची व्यावसायिक रंगकर्मींसाठी कार्य करणारी अधिकृत घटक संस्था आहे. कलाकार संघाच्या मार्फत व्यावसायिक रंगभूमीवरील कलाकारांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. साधारणपणे दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडतो.
मात्र यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा जाहीरपणे न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी हा पुरस्कार लवकरच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या दालनात प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच या सोहळ्यासाठी अपेक्षित खर्चाची संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याची माहिती मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी दिली आहे.
