’असुरवन’ चित्रपटाच्या टीमने नाशिकमध्ये केली गोदा आरती

गोदावरीच्या साक्षीने टीमने घेतला आशीर्वाद; ५ डिसेंबरला चित्रपट मोठ्या पडद्यावर

’असुरवन’ चित्रपटाची संपूर्ण टीम नाशिकमध्ये भव्य गोदा आरतीसाठी एकत्र आली आणि उपस्थित भक्तांच्या साक्षीने गोदावरी मायीकडून आशीर्वाद घेतला. “हर हर गंगे! हर हर गोदा!” या जयघोषांनी वातावरण दुमदुमले आणि चित्रपटाच्या प्रमोशनला भक्तिमय सुरुवात मिळाली. नाशिक दौऱ्यात टीमने नवश्या गणपतीचे दर्शन घेतले, त्यानंतर रेडिओ इंटरव्यूज आणि चाहत्यांशी संवाद साधून पंचवटीतील रामतीर्थ घाटावर पोहोचून गोदा आरतीचा सोहळा पार पाडला. या वेळी लेखक-दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात, अभिनेता विश्वास पाटील, सूरज नेवरेकर, विशाल साठे आणि अभिनेत्री दीप्ती धोत्रे उपस्थित होती. श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने टीमला आशीर्वाद देत यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गूढ, थरार आणि कोकणी मातीचा सुगंध असलेला ‘असुरवन’

स्वप्नस्वरूप प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सचिन आंबात यांनी केले असून प्रमुख भूमिकांत विश्वास पाटील, सूरज नेवरेकर, दीप्ती धोत्रे आणि अन्य कलाकारांची मजबूत फळी आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेली कोकणातील वारली संस्कृती, रूढी-परंपरा आणि शापित डोंगर माऊलीवर आधारित कथा या चित्रपटाला वेगळा रंग देतात. “खबर कलली का?” हा आगरी बोलीतील संवाद आधीच सोशल मीडियावर चर्चेत असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. रहस्य, थरार, गूढ, ड्रामा आणि हलक्या फुलक्या विनोदाचा सुंदर मिलाफ असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भुरळ घालणारा ठरणार आहे.

’असुरवन’ चित्रपट ५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment