प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारी अनुप्रियाची गोष्ट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’वरील ‘मी संसार माझा रेखिते’ ही नवी मालिका १ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून रोज रात्री ९:३० वाजता..

‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी आणि प्रत्येक घराशी नाळ जुळवणारी नवी मालिका घेऊन येत आहे — ‘मी संसार माझा रेखिते’. १ डिसेंबरपासून रात्री ९:३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर आणि अभिनेता हरीश दुधाडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सोबतच आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, पूजा महेंद्र, संदीप गायकवाड आणि वेद आंब्रे यांसारखे कलाकारही मालिकेत पाहायला मिळणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे कथानकात आणखी रंगत वाढणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मालिकेच्या कथेबद्दल आणि तिच्या भावविश्वाबद्दल खास माहिती देण्यात आली.

आजच्या काळातल्या प्रत्येक गृहिणीचं प्रतिबिंब — अनुप्रिया

मालिकेची मध्यवर्ती व्यक्तिरेखा अनुप्रिया ही नात्यांना जपणारी, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या कुटुंबासाठी जगणारी आणि प्रत्येक गोष्ट हसत हसत सांभाळणारी स्त्री आहे. काळ पुढे गेला असला तरी अनेक स्त्रिया आजही अनुप्रियासारखंच आयुष्य जगतात — स्वतःसाठी वेळ न काढता घरातील प्रत्येकासाठी अडजस्टमेंट करणाऱ्या, प्रेम जपणाऱ्या, माणसं सांभाळणाऱ्या. या मालिकेतून स्त्रीला सक्षम करण्याची आणि तिच्या भावविश्वातील न बोलल्या गेलेल्या गोष्टींना आवाज देण्याची प्रामाणिक धडपड दिसून येते.

अनुप्रियाच्या जगण्याची लढाई आणि तिची स्वप्नं

अनुप्रियाचा प्रेमविवाह झालेला असला तरी तिच्या बाबांनी गेली १७ वर्ष तिला स्वीकारलेले नाही. सासरच्यांचा पाठिंबा नसतानाही ती तिच्या जवळच्या माणसांसाठी रोज नवी उमेद घेऊन जगते. कुटुंबाची, नात्यांची, जबाबदाऱ्यांची धुरा सांभाळताना तिच्या मनात दडलेली स्वप्नं मात्र कोसळू न देता पुढे नेत असते तिची मुलगी — पिहू. आता या सगळ्यातून अनुप्रिया स्वतःसाठी कशी उभी राहणार, तिच्या स्वप्नांना नवं बळ कसं मिळणार, हे मालिकेत पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

पहिल्याच प्रोमोने वाढवली उत्सुकता

मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर मालिकेचं शीर्षक गीतही सर्वत्र प्रदर्शित करण्यात आलं असून त्यानेही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. कुटुंबातील नात्यांची ऊब, गृहिणीच्या आयुष्याची धडपड आणि तिचा आत्मविश्वास यातून या मालिकेचा गाभा आकार घेताना दिसतो.

दीप्ती केतकरची मनोगते

अभिनेत्री दीप्ती केतकर म्हणते, “एक गृहिणी तिच्या संसारासाठी किती अडजस्टमेंट करते हे आपण नेहमी पाहतो. पण या मालिकेतून आम्ही केवळ तिच्या संघर्षाची कहाणी न दाखवता, तिच्यासमोर येणाऱ्या प्रसंगांना तिने कसं सामोरं जायचं, आपला संसार आणखी कसा सुंदर आणि सुखी करता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ‘मी संसार माझा रेखिते’ ही फक्त अनुप्रियाची नव्हे, तर प्रत्येक घरातील स्त्रीचीच गोष्ट आहे.”

‘मी संसार माझा रेखिते’ ही कथा प्रेक्षकांच्या मनात नाते, प्रेम, जबाबदारी आणि स्त्रीशक्तीची नव्यानं जाणीव करून देईल, यात शंका नाही. १ डिसेंबरपासून ही हृदयस्पर्शी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Leave a comment