
कोकणातील निसर्गरम्य वातावरणात खुललेलं ‘कैरी’चं विश्व
उन्हाळ्यात चाखायला मिळणारी कैरी आता हिवाळ्यात चाखायला मिळणार हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण ‘कैरी’ हा बिगबजेट आणि मल्टीस्टारर सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. पोस्टरनंतर आता समोर आलेल्या ट्रेलरने उत्सुकतेची पातळी आणखीनच वाढवली आहे. अनेक टर्न-ट्विस्टने सजलेला हा ट्रेलर रोमँस आणि थ्रिलरची मिश्रण असलेली कथा नेमकी कशाकडे वळणार याबद्दल प्रेक्षकांना ताणतणावात ठेवतो. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित हा रोमँटिक थ्रिलर आधीच चर्चेत होता आणि ट्रेलर रिलीजने त्यात भर घातली आहे.
सायली–शशांकच्या रोमँसपासून कथेतल्या ट्विस्टपर्यंत

ट्रेलरमध्ये सर्वप्रथम डोळ्यात भरतं ते कोकणाचं नयनरम्य सौंदर्य. हिरवाईने नटलेल्या कोकणात शूट झालेलं ‘कैरी’चं विश्व स्क्रीनवर पाहताच मनाला भुरळ घालणारं आहे. सुरुवातीलाच शशांक केतकर आणि सायली संजीव यांची लव्हेबल केमिस्ट्री दिसते. कोकणातील परिसरात खुलणारा त्यांचा रोमँटिक प्रवास लक्ष वेधून घेतो. त्यातच कोकणातील लग्नसमारंभाची थाटमाट दाखवणारे दृश्येही ट्रेलरला खास रंग देतात. पण या सगळ्या रोमँटिक प्रवासाला अचानक ब्रेक लागतो आणि इथेच कथा थ्रिलरकडे वळते. नवरा हरवला म्हणून अस्वस्थ झालेली पत्नी, तिची घालमेल आणि त्यातून उलगडणारा रहस्याचा धागा — या सगळ्याची झलक ट्रेलरमध्ये मिळते आणि याच क्षणी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचते.
कलाकारांची प्रभावी फळी आणि मन वेधून घेणारे लोकेशन्स
‘कैरी’च्या ट्रेलरमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या या अनुभवी कलाकारांचा दमदार अभिनय लक्षवेधी आहे. प्रत्येक फ्रेममध्ये कोकणाची नैसर्गिक शोभा आणि चित्रपटाची रहस्यमयता सुंदरपणे मिसळली आहे. कोकणातील लोकेशन्स हे ट्रेलरमधील आणखी एक मोठं आकर्षण ठरलं आहे.
भव्य निर्मिती आणि उत्तम क्रिएटिव टीम
‘कैरी’ची निर्मिती ९१ फिल्म स्टुडिओज अंतर्गत झाली आहे. ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन यशस्वी व्यावसायिक चित्रपटांनंतर त्यांचा हा तिसरा प्रोजेक्ट असल्याने चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. हा चित्रपट अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंटच्या सहकार्याने बनला असून निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे सहनिर्माते म्हणून जोडले गेले आहेत.
‘कैरी’चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले असून संगीत दिग्दर्शन निषाद गोलांबरे आणि पंकज पडघन यांनी केलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी साई पियूष यांनी सांभाळली तर छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे.
१२ डिसेंबरला उलगडणार ‘कैरी’चं रहस्य
रोमँटिक प्रेमकथा, कोकणाची रमणीयता आणि अचानक उभं राहिलेलं रहस्य — या सगळ्यांचा संगम असलेला हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमाल पातळीवर पोहोचली आहे. ‘कैरी’च्या रूपाने कोणता अनोखा प्रवास पहायला मिळणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
