दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेतर्गत ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसाह्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसाह्य सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण आणि गणेशोत्सव रिल्स स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्यमंदिरात हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमातील मान्यवर

या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.

गणेशोत्सव रिल्स स्पर्धेचा निकाल

राज्यस्तरावर स्वप्निल लांडे प्रथम, अभिनव कुरणे द्वितीय, तर योगेश शिंदे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. महाराष्ट्र व भारताबाहेरील गटात सुमीत कुटवाल, दक्षता जवंजळ, रोहन शेटकर आणि राजकुमार सोनटक्के यांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान करण्यात आले. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागातील विजेत्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

अर्थसहाय्य प्राप्त चित्रपट

या ५० चित्रपटांमध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ४, राज्य पुरस्कारप्राप्त ३, ‘अ’ दर्जा प्राप्त १०, ‘ब’ दर्जा प्राप्त २३ आणि ‘क’ दर्जा प्राप्त १० चित्रपटांचा समावेश आहे. पाणी, सुमी, गोष्ट एका पैठणीची, नाळ–२, गोदावरी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, सत्यशोधक, पावनखिंड, विषय हार्ड, लग्नकल्लोळ, भिकारी, नेबर्स, मोऱ्या, रांगडा, छत्रपती संभाजी, ओवा, ऊन सावली, सोंग्या, गडकरी, महाराजा, धोंड्या, सुर लागू दे, भागीरथी मिसिंग, जन्मऋण यांसारखे अनेक चित्रपट त्यात आहेत.

‘खंजिरीचे बोल’ पोस्टरचे अनावरण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन आणि लेखक श्रीकांत बोजेवार यांचा हा चित्रपट सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने निर्मित केला आहे.

Leave a comment