
१९ बालनाट्यांमध्ये रंगलेली अटीतटीची चुरस
सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रविकिरण संस्थेची ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात पार पडली. ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे झालेल्या या स्पर्धेत १९ दर्जेदार बालनाट्यांनी सहभाग घेतला. कल्पनाशक्ती, अभिनय आणि विषयवैविध्यामुळे ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली.
‘अडलंय का’ला पाच प्रमुख पुरस्कार

कल्याण-वरप येथील सेक्रेड हार्ट स्कुलच्या ‘अडलंय का’ या बालनाट्याने सर्वोत्कृष्ट बालनाट्याचा प्रथम पुरस्कार पटकावत स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. यासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य आणि उत्कृष्ट प्रकाश योजना असे पाच पुरस्कार या नाटकाने पटकावले.
द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी

दिंडी ‘झ’ प्रतिष्ठानच्या ‘दिव्या खाली दौलत’ या बालनाट्याला द्वितीय क्रमांक मिळाला, तर मुक्तछंद नाट्यसंस्थेच्या ‘रंग जाणिवांचे’ या बालनाट्याने तृतीय क्रमांक पटकावला. अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन, पुणे यांच्या ‘सर्कस’ या बालनाट्याला स्पेशल ज्युरी अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती आणि परीक्षक मंडळ

या स्पर्धेसाठी सन मराठी वाहिनीचे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. परीक्षणाची जबाबदारी अभिनेत्री पूर्वा पवार, नाट्यदिग्दर्शक हेमंत सुहास भालेकर आणि नाट्यसमीक्षक नंदकुमार परशुराम पाटील यांनी सांभाळली.
बालरंगभूमीबद्दल मान्यवरांचे मत

दीपक राजाध्यक्ष यांनी बालकलावंतांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत हे कलाकार उद्याचे चमकते तारे असतील, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्ष नागेश नामदेव वांद्रे यांनी रविकिरण बालनाट्य स्पर्धेच्या ३९ वर्षांच्या परंपरेचा अभिमान व्यक्त केला, तर माजी अध्यक्ष विजय टाकळे यांनी ही परंपरा पुढील पिढ्यांनी जपल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
स्पर्धेचा संपूर्ण निकाल
अभिनय, लेखन, दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य आणि विविध श्रेणींमधील पारितोषिके विविध शाळा व संस्थांच्या बालनाट्यांना प्रदान करण्यात आली. १९ उत्कृष्ट बालनाट्यांमधून अंतिम निकाल जाहीर करत रविकिरण बालनाट्य स्पर्धेने बालरंगभूमीची समृद्ध परंपरा अधिक भक्कम केली.
