
शिवरायांचे बुद्धिचातुर्य आणि मुत्सद्देगिरीचा थरारक अध्याय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या पराक्रमाइतकेच त्यांचे बुद्धिचातुर्य हे केंद्रस्थानी राहिले आहे. महाराज हे केवळ रणांगणावरील योद्धे नव्हते, तर अत्यंत कुशल मुत्सद्दी होते, हे त्यांनी असंख्य मोहिमांतून सिद्ध केले. गनिमी कावा ही कूटनीती त्यांनी इतक्या प्रभावीपणे वापरली की शत्रू सावध होण्याआधीच त्याला पराभवाचा धक्का बसायचा.
मुघल साम्राज्याला हादरा देणारी आग्रा स्वारी
औरंगजेबाचे मुघल साम्राज्य त्या काळातील सर्वात बलाढ्य सत्ता मानली जात होती. अशा साम्राज्याला केवळ आव्हान देणेच नव्हे, तर आग्राला जाण्याचा निर्णय घेऊन भर दरबारात निडरपणे उभे राहणे हा स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत धाडसी अध्याय आहे. या प्रसंगात महाराजांची तल्लख बुद्धी, प्रसंगावधान, आखलेली रणनीती आणि रक्ताचा थेंबही न सांडता शत्रूला नामोहरम करण्याची क्षमता ठळकपणे दिसते.
श्री शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टक संकल्पनेतील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या टिझरमधून प्रेक्षकांसमोर आले आहे. औरंगजेबाच्या पोलादी पहाऱ्याला भेदून घेतलेली मोठी जोखीम, मुघल दरबारातील बाणेदार क्षण आणि त्यामागील थरारक खेळी यांची रोमांचकारी झलक या टिझरमध्ये पाहायला मिळते.
भव्य निर्मिती आणि दिग्गज टीम
पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनील परमार आणि मुरलीधर छतवानी हे चित्रपटाचे निर्माते असून रवींद्र औटी, तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा सहनिर्माते आहेत. या भव्य चित्रपटाचे वर्ल्डवाइड वितरण पॅनोरमा स्टुडिओज करणार आहे.
इतिहासातील प्रेरणादायी अध्याय भव्य पडद्यावर
अत्यंत कठीण परिस्थितीतही हार न मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि धैर्याची आठवण करून देणारा हा सुवर्णअध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटातून भव्य स्वरूपात साकारला जात आहे. शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारी रोजी हा थरारक इतिहास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
