‘हमाल दे धमाल’च्या रम्य आठवणींना उजाळा

मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर एकेकाळी राज्य केलेल्या ‘हमाल दे धमाल’ या अजरामर चित्रपटाच्या विशेष शोला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या निमित्ताने चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते प्रदर्शनानंतरच्या अनेक रम्य आठवणींना उजाळा मिळाला. विशेषतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींनी उपस्थित रसिक भावूक झाले.

स्मृतीदिनानिमित्त विशेष शो

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने, दिवंगत कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात ‘हमाल दे धमाल’ चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता.

पडद्यावर लक्षाची एन्ट्री, टाळ्यांचा कडकडाट

चित्रपट सुरू होताच पडद्यावर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एन्ट्रीला रसिकांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली. एकेकाळी प्रेक्षकांच्या हसण्यातून आणि प्रेमातून जिवंत राहिलेल्या या भूमिका आजही तितक्याच आपुलकीने स्वीकारल्या जात असल्याचं या क्षणी प्रकर्षाने जाणवलं.

कलाकारांच्या आठवणी आणि किस्से

या विशेष शोदरम्यान पुरुषोत्तम बेर्डे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर आठल्ये आणि चेतन दळवी यांची खास मुलाखत घेण्यात आली. या सर्वांनी चित्रपटाच्या चित्रीकरणातील आठवणी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचे अनुभव आणि काही मजेशीर किस्से रसिकांसमोर उलगडले. या संवादातून त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीचं एक जिवंत चित्र उभं राहिलं.

प्रिया बेर्डे यांची उपस्थिती

कार्यक्रमाला अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला भावनिक आणि आपुलकीची किनार लाभली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना मानाचा मुजरा करण्याचा हा क्षण उपस्थितांसाठी खास ठरला.

प्रास्ताविक आणि स्वागत

चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी अशा उपक्रमांमधून मराठी चित्रपटांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

लक्षाचा अभिनय कायम स्मरणात

चित्रपटाचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी मुलाखतीदरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी सांगताना, ‘हमाल दे धमाल’ मधील त्यांची भूमिका ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत गाजलेल्या भूमिकांपैकी एक असल्याचं नमूद केलं. मराठी रसिकांनी त्यांच्यावर अपार प्रेम केलं असून त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे आणि तो कायम राहील, असं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं. विजय पाटकर आणि जयवंत वाडकर यांनीही आपापल्या आठवणी शेअर करत त्या सुवर्णकाळाला पुन्हा उजाळा दिला.

Leave a comment