एन.डी. स्टुडिओत कार्निव्हलला थाटात सुरुवात

कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओ येथे आयोजित कार्निव्हलला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. विशेष मुलांच्या हस्ते उद्घाटन करत या उपक्रमाचा भावनिक आणि प्रेरणादायी प्रारंभ करण्यात आला. उद्घाटनानंतर वातावरण अधिकच रंगले ते अभिनेत्री कविता लाड यांच्या अनुभवकथनातून झालेल्या मुलाखतीमुळे.

पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या एन.डी. स्टुडिओत २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान हा कार्निव्हल आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी दोनशेहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. उद्घाटन प्रसंगी प्रशासकीय अधिकारी सचिन निंबाळकर आणि मुख्य लेखावित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांची उपस्थिती लाभली.

तिकीट दर आणि बुकिंगची माहिती

३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या कार्निव्हलमध्ये पाच वर्षांपासून सर्व वयोगटांसाठी प्रवेश खुला आहे. तिकीट दर ₹९९९ असून जेवणासह पॅकेजसाठी ₹१४९९ आकारण्यात येत आहेत. एकाचवेळी २५ किंवा त्यापेक्षा अधिक तिकिटांचे बुकिंग केल्यास प्रति तिकीट ₹१३९९ दर लागू होणार आहे. तिकीट बुकिंग http://www.ndartworld या संकेतस्थळावर ऑनलाइन तसेच स्टुडिओच्या ठिकाणी ऑफलाइन उपलब्ध आहे.

कलाकारांची मांदियाळी आणि गप्पांचा कार्यक्रम

या कार्निव्हलदरम्यान विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. २६ डिसेंबर रोजी सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांच्याशी दुपारी ४ ते ६ या वेळेत गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. २७ डिसेंबर रोजी अदिती सारंगधर यांची उपस्थिती लाभणार आहे.

२८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि विक्रम गायकवाड यांचा संवाद कार्यक्रम रंगेल. २९ डिसेंबर रोजी आनंद इंगळे, ३० डिसेंबर रोजी डॉ. गिरीश ओक आणि ३१ डिसेंबर रोजी संजय मोने यांच्यासोबत दुपारी ४ ते ६ या वेळेत गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

चित्रपट, रंगभूमी आणि संस्कृती यांचा संगम साधणारा हा कार्निव्हल रसिकांसाठी एक वेगळीच अनुभूती ठरणार आहे.

Leave a comment