
“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार थीमसोबत बिग बॉस मराठी सिझन ६चा बहुप्रतिक्षित प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, संपूर्ण महाराष्ट्रात नव्या सिझनची चर्चा जोरात सुरू झाली आहे. सहाव्या पर्वाचा हा प्रोमो केवळ उत्सुकता वाढवणारा नाही, तर यंदाचा खेळ मनोरंजनाच्या चौकटीपलीकडे जात नशिबालाच आव्हान देणारा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत देतो.
रितेश भाऊंच्या कडक संवादांनी सेट झाला ‘मूड’
प्रोमोमधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे रितेश भाऊंचे प्रभावी आणि कोड्यातून अर्थ सांगणारे संवाद. “फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा कडक ओळींनी यंदाच्या सिझनचा टोन ठरवला आहे. प्रत्येक प्रोमोमधून प्रेक्षकांना काहीतरी नवं देण्याची रितेश भाऊंची परंपरा यंदाही कायम असून, हटके लूक, खास स्वॅग आणि ठसकेबाज अंदाज यामुळे हा प्रोमो लक्ष वेधून घेतो.
थीम वेगळी, खेळ वेगळा
यंदाच्या सिझनची टॅगलाईन “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ घोषणा नसून संपूर्ण खेळाची दिशा दाखवणारी आहे. दारापलीकडे काय ट्विस्ट असणार, कोणाचा खेळ कधी पालटणार, पास कोण होणार आणि फेल कोण ठरणार—या सगळ्या प्रश्नांची उत्सुकता प्रोमोने आणखी वाढवली आहे. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” या ओळी सोशल मीडियावर आधीच चर्चेचा विषय ठरत आहेत.
भव्य घर, शेकडो दारं आणि क्षणाक्षणाला बदलणारा डाव

घराची भव्य रचना, शेकडो दारखिडक्यांनी सजलेला जंगी थाट आणि दारापल्याड लपलेली सरप्राइझेस—हे सगळं मिळून यंदाचा खेळ प्रत्येक क्षणी कलाटणी घेणार असल्याचा ठाम इशारा प्रोमो देतो. एका क्षणात डाव कसा बदलू शकतो, कोणाची वाट कशी ठरू शकते, याची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच घर कसं असणार आणि नक्की कोणते ट्विस्ट प्रेक्षकांना थक्क करणार, याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
११ जानेवारीपासून नवा अध्याय
प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस मराठी सिझन ६चा नवा प्रवास ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. दररोज रात्री ८ वाजता आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstarवर हा ‘नशिबाचा खेळ’ प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, यात शंका नाही.
