मराठमोळा स्वॅग आणि प्रेमाचा नवा साज,अनुश्री माने दाखवणार ‘दिसली तू पहिल्यांदा २’ मध्ये नखरेल अंदाज!

लोकप्रिय रियालिटी शोमधून अल्बम सॉंगपर्यंतचा प्रवास

सध्या मराठी संगीतविश्वात नव्या गाण्यांची लाट उसळलेली असताना, ठेका धरायला लावणारं आणि मनाला भिडणारं गाणं म्हणून दिसली तू पहिल्यांदा २ प्रचंड चर्चेत आलं आहे. रोमँटिक भावविश्व आणि रॅपचा आधुनिक ठसा यांचा सुंदर मेळ साधत हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यात अभिनेत्री अनुश्री माने तिच्या नखरेल, मराठमोळ्या स्वॅगमधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ घालताना दिसते.

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ते लोकप्रिय चेहरा

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून आपल्या रिलेटेबल रील्समधून ओळख निर्माण करणाऱ्या अनुश्री मानेने अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. चल भावा सिटीत या लोकप्रिय रियालिटी शोमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘नखरेवाली’ या अल्बम सॉंगमुळे अनुश्री खऱ्या अर्थाने चर्चेत आली आणि तिचा चाहता वर्ग अधिक विस्तारला.

‘दिसली तू पहिल्यांदा २’ मधील कलाकारांची भक्कम फळी

‘दिसली तू पहिल्यांदा २’ या गाण्यात अनुश्री मानेसोबत अक्या जाधव, तृप्ती राणे, ऋषी कणेकर आणि अस्मिता जाधव ही कलाकार मंडळी दिसत असून, सर्वांचाच अभिनय आणि केमिस्ट्री गाण्याला वेगळं वजन देते. दृश्यरचना, स्टाईल आणि सादरीकरण यामुळे हे गाणं तरुणाईमध्ये विशेष पसंतीस उतरत आहे.

जगदंबा प्रोडक्शनस्‌ची नवी म्युझिकल पेशकश

‘जगदंबा प्रोडक्शनस्’ प्रस्तुत ‘दिसली तू पहिल्यांदा २’ या गाण्याची निर्मिती ऋतुजा कणेकर यांनी केली असून, आधुनिक ढंगात साकारलेलं हे गाणं मराठी अल्बम सॉंग्सच्या ट्रेंडला नवा आयाम देताना दिसत आहे. संगीत, शब्द आणि व्हिज्युअल्स यांचा समतोल साधत हे गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

अनुश्री मानेचं मनमोकळं मनोगत

या गाण्याबद्दल बोलताना अनुश्री माने म्हणाली की, “आजवर माझ्या चाहत्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. ‘दिसली तू पहिल्यांदा २’ या गाण्यातून मी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे आणि या गाण्यालाही तसंच प्रेम मिळेल अशी मला खात्री आहे. हा अल्बम सॉंग माझ्यासाठी नवा अनुभव होता. शूटिंगदरम्यान खूप मजा आली आणि बरंच काही नव्याने शिकायला मिळालं. मागे वळून न पाहता, नवनवीन प्रयोग करत माझा प्रवास सुरू ठेवायचा आहे.”

नव्या गाण्यातून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न

मराठमोळा स्वॅग, प्रेमाची झलक आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम असलेलं ‘दिसली तू पहिल्यांदा २’ हे गाणं अनुश्री मानेच्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचं पाऊल ठरत आहे. प्रेक्षकांच्या प्रेमावर विश्वास ठेवत, नवनवीन आशयातून भेटीला येणारी अनुश्री माने येत्या काळात आणखी कोणते नवे प्रयोग घेऊन येते, याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष नक्कीच लागून राहणार आहे.

Leave a comment