संगीत विश्वात २० वर्षांचा प्रवास ते सदाबहार जुन्या गाण्यांना नवा ट्विस्ट — या कारणांनी गायक अभिजीत सावंत यांच्यासाठी २०२५ ठरलं खास!

२०२५ : अभिजीत सावंतसाठी चर्चेचं वर्ष

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं जंगी स्वागत करत असताना, २०२५ हे वर्ष अनेक कलाकारांसाठी लक्षवेधी ठरताना दिसलं. नवनवीन प्रोजेक्ट्स, अनपेक्षित कोलॅबोरेशन्स आणि वेगळ्या माध्यमांतून स्वतःला सिद्ध करणारे कलाकार चर्चेत राहिले. याच यादीत ठळकपणे उठून दिसलं एक नाव — गायक अभिजीत सावंत. सदाबहार गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिजीतने २०२५ मध्ये पुन्हा एकदा रसिकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे, जेन झी पिढीसाठी त्याने एका OG गाण्याचं नवं, फ्रेश व्हर्जन सादर केलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

२० वर्षांचा संगीतप्रवास आणि नावीन्यपूर्ण वाटचाल

संगीत विश्वात २० वर्षं पूर्ण करत असताना, २०२५ हे वर्ष अभिजीतसाठी नावीन्यपूर्ण संधी घेऊन आलं. वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स, सुमधुर गायनासोबत गाण्यांमधील अभिनय आणि सादरीकरणाचा वेगळा बाज — या सगळ्यांचा अनुभव प्रेक्षकांना मिळाला. गायक म्हणूनच नव्हे, तर परफॉर्मर म्हणूनही अभिजीतने या वर्षात स्वतःची वेगळी ओळख अधोरेखित केली.

इंडियन आयडॉलपासून रियालिटी शोपर्यंतचा प्रवास

इंडियन आयडॉलपासून सुरू झालेला अभिजीतचा प्रवास अनेक रियालिटी शोपर्यंत विस्तारला. २०२५ मध्ये ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये सहभाग घेत त्याने नामवंत शेफ्ससोबत प्रेक्षकांची मनं जिंकली. गाणं आणि खाणं — या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत, या वर्षात त्याने अनेक गाजलेली आणि लोकप्रिय गाणीही सादर केली.

बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये मराठी गाण्याची जादू

बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या संगीत महोत्सवांपैकी एक असलेल्या ‘बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट’मध्ये अभिजीतने मराठी गाणं सादर करत हिंदी रसिक प्रेक्षकांनाही भुरळ घातली. अजय–अतुल या जोडी नंतर या मंचावर मराठी गाण्याचा मान पटकावणारा अभिजीत हा कलाकार ठरला. हा क्षण त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद ठरला.

जुन्या गाण्यांना मॉडर्न ट्विस्ट, जेन झीचा ट्रेंड

जुन्या आयकॉनिक गाण्यांना मॉडर्न ट्विस्ट देत, आय पॉपस्टारसारख्या मंचावर किंगसोबत ‘मोहब्बते लुटाऊंगा’ हे गाणं अभिजीतने नव्या ढंगात सादर केलं. या नव्या व्हर्जनला केवळ जेन झीच नव्हे, तर मिलेनियल्सकडूनही भरभरून प्रतिसाद मिळाला. जुन्या गाण्यांची नवी बाजू प्रेक्षकांना भावली आणि हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडही झालं.

‘तुझी चाल तुरु तुरु’ ते ‘रुपेरी वाळूत’ — सदाबहार गाण्यांचं पुनरुज्जीवन

‘तुझी चाल तुरु तुरु’, ‘ढगाला लागली कळ’, ‘रुपेरी वाळूत’ यांसारख्या सदाबहार गाण्यांना हटके ट्विस्ट देत अभिजीतच्या आवाजाने ही गाणी पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली. २०२५ मध्ये आयकॉनिक गाणी री-क्रिएट करत, त्यातील मज्जा आणि भावनात्मक ओलावा त्याने नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. त्यामुळे आजची पिढी या गाण्यांवर ट्रेंड करू लागली.

गौतमी पाटीलसोबत अनपेक्षित कोलॅबोरेशन

वर्षाच्या शेवटी अभिजीतने आणखी एका मोठ्या, अनपेक्षित कोलॅबोरेशनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ‘रुपेरी वाळूत’ हे धमाकेदार गाणं सादर करत तो पुन्हा चर्चेत आला. ट्रेंडी गाणी, प्रभावी सादरीकरण आणि गाण्यातील अभिनय — सगळ्याच बाबी लक्षवेधी ठरल्या.

नव्या वर्षाकडे अपेक्षेने पाहणारे प्रेक्षक

मराठी संगीतविश्वासोबतच हिंदी इंडस्ट्रीतही अभिजीत सावंत नव्या गाण्यांसह सक्रिय राहणार का, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. २०२५ प्रमाणेच येणारं वर्षही त्याच्यासाठी तितकंच दमदार आणि संगीतप्रेमींसाठी खास ठरो, हीच अपेक्षा.

Leave a comment