
बॉक्स ऑफिसचा खरा धुरंदर आहे गुजराती चित्रपट – ‘लालो कृष्णा सदा सहायाते’
२०२५ हे वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी मोठ्या अपेक्षांचं ठरलं. भव्य सेट्स, मोठे स्टार्स, कोट्यवधींचे बजेट आणि आक्रमक प्रमोशन असलेले अनेक चित्रपट या वर्षात प्रदर्शित झाले. ‘धुरंधर’, ‘छावा’, ‘सैयारा’, ‘कांतारा’ यांसारख्या सिनेमांनी प्रेक्षकांची गर्दी खेचली, सोशल मीडियावर चर्चा निर्माण केली आणि बॉक्स ऑफिसवर मोठी उलाढालही केली. त्यामुळे साहजिकच वर्षाचा सर्वात मोठा सिनेमा यापैकीच एखादा असेल, अशीच सर्वसाधारण धारणा होती. मात्र वर्षअखेरीस समोर आलेल्या आकडेवारीनं हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं आणि एक अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहिला—इतकं यश जर एका लहान गुजराती सिनेमाला मिळू शकतं, तर मराठी सिनेमा नेमका कुठे अडतोय?
या वर्षातील सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा ना हिंदी आहे, ना तमिळ, ना कन्नड आणि ना मोठ्या स्टार्सनी झळकलेला. उलट, हा एक साधा गुजराती चित्रपट आहे. शांतपणे प्रदर्शित झालेला, कुठलाही गाजावाजा नसलेला आणि फारसं प्रमोशनही न केलेला ‘लालो कृष्णा सदा सहायाते’ हा सिनेमा २०२५ चा खरा बॉक्स ऑफिस धुरंदर ठरला आहे. कोणतीही आक्रमक जाहिरात मोहीम नाही, सोशल मीडियावर ट्रेंड लावण्यासाठी लाखो रुपये खर्च नाहीत, तरीही या चित्रपटानं मोठ्या सिनेमांना नफ्याच्या बाबतीत मागे टाकलं.
या सिनेमाचं बजेट ऐकलं, तर अनेकांना धक्का बसेल. केवळ सुमारे ५० लाख रुपयांत हा सिनेमा तयार झाला. आज अनेक इंडस्ट्रींमध्ये एका गाण्यासाठी, एका सेटसाठी किंवा एका स्टारच्या मानधनासाठी कोट्यवधी खर्च होतात. त्या तुलनेत इतक्या मर्यादित खर्चात तयार झालेल्या या सिनेमाने तब्बल १२० कोटी रुपयांच्या आसपास व्यवसाय केला. म्हणजेच गुंतवणुकीच्या तुलनेत पाहिलं तर जवळपास २४,००० टक्क्यांहून अधिक नफा. इतका नफा हा केवळ आर्थिक यश नाही, तर व्यवस्थापन, आशय आणि प्रेक्षकसमज यांचं यश आहे.
या यशाची महती तेव्हा लक्षात येते, जेव्हा त्याची तुलना मोठ्या सिनेमांशी केली जाते. ‘कांतारा : चॅप्टर १’ सारख्या सिनेमाने शेकडो कोटींची कमाई केली, पण मोठं बजेट, मोठी टीम आणि प्रचंड खर्च यामुळे नफ्याचा टक्का ६५० ते ७०० च्या आसपासच राहतो. ‘धुरंधर’ आणि ‘छावा’सारखे सिनेमेही चालले, पण त्यांचं अर्थकारण हे ‘मोठा धंदा’ या चौकटीत अडकलं. त्याउलट ‘लालो कृष्णा सदा सहायाते’ने कमी खर्चात जास्त परतावा हा व्यवसायाचा मूलभूत नियम प्रत्यक्षात दाखवून दिला.
या सिनेमात कोणताही सुपरस्टार नाही, भव्य ऍक्शन सीन नाहीत, महागडे सेट्स नाहीत किंवा चार्टबस्टर गाणीही नाहीत. तरीही प्रेक्षक थिएटरमध्ये येतात. कारण कथा साधी आहे, मांडणी प्रामाणिक आहे आणि श्रद्धा, विश्वास, आत्मिक बदल या भावना कुठेही कृत्रिम वाटत नाहीत. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणारी संकटं आणि त्यातून सावरण्याचा प्रवास प्रेक्षकांना स्वतःचा वाटतो. म्हणूनच हा सिनेमा सुरुवातीला संथ गतीने सुरू होतो, पण हळूहळू प्रेक्षकांच्या तोंडी प्रचारातून मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जातो.
इथेच मराठी सिनेमानं थांबून विचार करण्याची गरज आहे. आपल्याकडे विषयांची कमतरता नाही, प्रतिभेचीही नाही. पण आपण सतत मोठ्या सेट्स, मोठी नावे, आणि ‘मोठा चित्रपट’ या कल्पनेच्या मागे धावतो का? आशयापेक्षा पॅकेजिंगवर जास्त भर देतो का? प्रेक्षक नेमकं काय शोधतोय, हे समजून घेण्यात आपण कमी पडतोय का—हा प्रश्न अशा यशानं थेट उभा केला आहे.
‘लालो कृष्णा सदा सहायाते’च्या यशानं बॉक्स ऑफिसचं गणित नव्यानं मांडलं आहे. मोठं बजेट म्हणजे हमखास यश, मोठा स्टार म्हणजे हमखास धंदा, हे समीकरण आता तितकंसं ठाम राहिलेलं नाही. योग्य आशय, नियंत्रणातला खर्च आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधणारी कथा असेल, तर कोणतीही भाषा, कोणतीही इंडस्ट्री मोठा व्यवसाय करू शकते.
म्हणूनच २०२५ च्या बॉक्स ऑफिसकडे पाहताना फक्त आकडे पाहून थांबण्यापेक्षा आत्मपरीक्षणाची गरज आहे. हा वर्षाचा खरा बॉक्स ऑफिस धुरंदर केवळ गुजराती सिनेमाचा विजय नाही, तर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीसाठी वेगळा विचार करायला लावणारी घटना आहे.
