
मराठी चित्रपटसृष्टीत नव्या विषयांसोबतच नवे, ताकदीचे दिग्दर्शक आपला ठसा उमटवत आहेत आणि आता या यादीत दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचे नाव ठळकपणे जोडले गेले आहे. Zee Studios प्रस्तुत व झणकर फिल्म्स निर्मित रुबाब या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. धडाकेबाज टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियासह सिनेरसिकांमध्ये चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून, पहिल्याच झटकेत ‘रुबाब’ने उत्सुकता निर्माण केली आहे.
संघर्षातून उभा राहिलेला दिग्दर्शक

मुंबईत संघर्षाची वाट चालत शेखर बापू रणखांबे यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी प्लंबिंगसारखी कामे करत आपल्या उदरनिर्वाहासाठी मेहनत घेतली. त्यानंतर रंगभूमीशी त्यांचे नाते जुळले. नाटकांच्या बॅकस्टेजवर काम करताना कथाकथन, अभिनय आणि दिग्दर्शनाची शिस्त त्यांनी जवळून अनुभवली आणि याच अनुभवांनी त्यांच्या दृष्टीला आकार दिला.
शॉर्ट फिल्म्समधून मिळालेली ओळख

रंगभूमीचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन आणि लेखनाकडे आपला मोर्चा वळवला. विविध चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यांनी व्यावसायिक अनुभव मिळवला. याच काळात त्यांनी ‘रेखा’ आणि ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्या. ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्मची निवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये इंडियन पॅनोरमा सेक्शनमध्ये झाली होती. याच चित्रपटाला इंटरनॅशनल डॉक्युमेंट्री अँड शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल ऑफ केरळमध्ये पुरस्कारही मिळाला.
राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास
‘रेखा’ या शॉर्ट फिल्मसाठी शेखर बापू रणखांबे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी केली होती. या शॉर्ट फिल्मचीही निवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या इंडियन पॅनोरमा सेक्शनमध्ये झाली होती. या यशामुळे शेखर रणखांबे यांचे नाव गंभीर आणि आशयघन दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले.
‘रुबाब’ची वेगळी मांडणी
चित्रपट करण्याची इच्छा मनात बाळगून असलेल्या शेखर बापू रणखांबे यांची ही इच्छा अखेर ‘रुबाब’च्या निमित्ताने पूर्ण होत आहे. गावाकडची प्रेमकहाणी हा विषय परिचित असला, तरी ‘रुबाब’ची मांडणी आणि दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. ही कथा केवळ प्रेमाभोवती फिरणारी नसून, प्रेम जपताना असलेला स्वाभिमान, ठामपणा आणि आत्मविश्वास या मूल्यांवर भर देणारी आहे.
दिग्दर्शकाची भावना
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या मते, ‘रुबाब’ हा चित्रपट त्यांच्या अत्यंत जवळचा आहे, कारण हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. झी स्टुडिओज आणि निर्माते संजय झणकर यांनी दिलेल्या विश्वासामुळेच योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाल्याची भावना ते व्यक्त करतात. चित्रपटातील कलाकारांनी केलेल्या कामगिरीमुळे ही कथा अधिक प्रभावी झाली असल्याचेही ते सांगतात. टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहून प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कलाकार, निर्मिती आणि प्रदर्शित तारीख
या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. Zee Studios प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. संजय झणकर आणि गौरी झणकर हे या चित्रपटाचे निर्माते असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. हा रुबाबदार प्रेमपट येत्या ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
