आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’

चित्रपटप्रेमींचं लक्ष लागून राहणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव ला मुंबईत शुक्रवार, ९ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पन्नासहून अधिक देशांतील विविध भाषांमधील चित्रपटांचा समावेश असलेल्या या महोत्सवामुळे सिनेप्रेमींसाठी ही खरीखुरी मेजवानी ठरणार आहे.

मराठमोळ्या कलावंतांचे चित्रपट ठरणार मुख्य आकर्षण

यंदाच्या महोत्सवात मराठी कलावंतांच्या चित्रपटांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यात दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा बहुचर्चित आगामी हिंदी चित्रपट मयसभा, दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला उत्तर, तसेच दिग्दर्शक संतोष डावखर यांचा गोंधळ या चित्रपटांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाने होणार उद्घाटन

सान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या इंडोनेशियन चित्रपट On Your Lap (Pangku) च्या प्रदर्शनाने यंदाच्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.

मुंबई आणि ठाण्यात होणार चित्रपटांचे प्रयोग

निवडलेले चित्रपट प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मधील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉल सिनेपोलीस येथे दाखवले जाणार आहेत. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी सशुल्क प्रतिनिधी नोंदणी सुरू असून, वाजवी शुल्कात www.thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. प्रभात चित्र मंडळाच्या सभासदांसाठी विशेष सवलतीचीही सोय आहे.

मान्यवरांना मानाचे पुरस्कार

महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदाचा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक व क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a comment