‘क्रांतिज्योती’ मराठीची पोरं महाराष्ट्रभर ठरली सुपरहिट!पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची बंपर कमाई

मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज

मराठी शाळेच्या अस्मितेला ठाम आणि संवेदनशील आवाज देणारा क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताच राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी माध्यमातील शाळा, त्यातील संस्कार, शिक्षक-विद्यार्थी नातं आणि काळानुरूप येणारी आव्हानं यांचं वास्तववादी चित्रण या चित्रपटातून समोर येतं. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटगृहांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून, सोशल मीडिया आणि बुक माय शोवरही चित्रपट सातत्याने ट्रेंडिंग आहे. पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली भक्कम उपस्थिती नोंदवली आहे.

हाऊसफुल प्रयोग आणि प्रेक्षकांचे पाणावलेले डोळे

चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक शहरांमध्ये हाऊसफुल प्रयोग होत आहेत. मराठी शाळेच्या आठवणींमध्ये हरवलेले प्रेक्षक, वर्गखोल्यांची गंध, शिक्षकांचा शिस्तबद्ध पण मायेचा स्पर्श आणि मैत्रीची उब अनुभवत भावूक होताना दिसत आहेत. चित्रपटातील संवाद, प्रसंग आणि भावनिक क्षण प्रेक्षकांना थेट भिडत असून, अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ प्रेक्षकांपर्यंत सर्व वयोगटातील रसिकांनी या चित्रपटाला मनापासून स्वीकारलं आहे.

मनोरंजनासोबतच व्यापक अनुभव देणारा सिनेमा

प्रभावी कथा, कलाकारांचा सहज आणि नैसर्गिक अभिनय, मनाला स्पर्श करणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही. तो प्रेक्षकांना विचार करायला लावणारा, आठवणी जागवणारा आणि मराठी माध्यमाच्या मूल्यांची जाणीव करून देणारा व्यापक अनुभव ठरतो. समीक्षकांकडूनही चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंतांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

दिग्दर्शकावर अभिनंदनाचा वर्षाव

या यशानंतर प्रेक्षकांकडून दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्याच्या विविध भागांतून त्यांना कौतुकाचे संदेश आणि शुभेच्छा मिळत असून, अनेक प्रेक्षक चित्रपट पाहिल्यानंतर थेट दिग्दर्शकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. प्रेक्षकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद या चित्रपटाच्या आशयाला मिळालेली खरी दाद मानली जात आहे.

प्रेक्षकांच्या प्रेमाविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची भावना

या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी प्रेक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रेक्षकांनी या वेगळ्या आणि संवेदनशील विषयाला मनापासून स्वीकारल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं असून, मिळालेलं प्रेम पुढील चित्रपटांसाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देत असल्याचंही ते सांगतात.

दमदार स्टारकास्ट आणि दर्जेदार निर्मिती

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांचा समावेश आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं असून, क्षिती जोग या चित्रपटाच्या निर्माती आहेत. विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ हे सहनिर्माते आहेत. दर्जेदार निर्मितीमूल्य आणि ठोस आशय यांच्या जोरावर हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

Leave a comment