
लहान वयातच संगीताच्या रंगमंचावर पाऊल ठेवलेल्या बेलाचा प्रवास सातत्य, मेहनत आणि गुणवत्तेचा आहे. अवघ्या अकरा–बारा वर्षांची असतानाच तिने गाण्याच्या स्टेजवर उभी राहण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर ‘सारेगम’ या लहान मुलांच्या स्पर्धेत तिने भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली, तेव्हा तिचं वय केवळ चौदा–पंधरा वर्षांचं होतं. लगेचच मोठ्यांच्या मेगाफायनलमध्ये सहभागी होण्याची संधी तिला मिळाली आणि ही स्पर्धाही तिने जिंकली. याच क्षणापासून बेला शेंडे यांच्या व्यावसायिक गायनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
या प्रवासात तिला अनेक संधी मिळाल्या, मान-सन्मान मिळाले; मात्र या सगळ्यामुळे लक्ष विचलित न होता तिने प्रत्येक संधीला आव्हान मानलं आणि ती आव्हानं सातत्याने पेलत गेली. गाणाऱ्या घराण्यात जन्म झाल्यामुळे संगीत तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग ठरलं. तिची मोठी बहीण सावनी या त्यांच्या आजी, किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कुसुम शेंडे यांच्याकडे रीतसर गायनशिक्षण घेत होत्या. त्या वेळी शेजारी बसून बेला आजीचं आणि बहिणीचं गाणं ऐकत असे. आई-वडिलांसोबत अनेक संगीत कार्यक्रमांना जाणं, मोठ्या कलाकारांना जवळून पाहणं, यामुळे तिची गाण्याची आवड अधिक ठळकपणे दिसू लागली.
बेलामधील ही आवड व क्षमता वडिलांनी ओळखली आणि तिचं गायनप्रशिक्षण सुरू झालं. सुरुवातीला ती आजीकडेच गाणं शिकत होती; मात्र तिच्या आवाजाची पट्टी वेगळी असल्याचं लक्षात आल्यावर पुरुष गायकाकडे शिकावं असा सल्ला देण्यात आला. त्यानंतर तिने वडिलांकडेच गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू यांसारख्या दिग्गज गायिकांचं नियमित येणं-जाणं होतं. या वातावरणामुळे बेलाचं गायन अधिक समृद्ध होत गेलं.
दहावीत असतानाच ‘सारेगम’ची स्पर्धा सुरू होती. अभ्यास आणि गाणं दोन्ही सांभाळण्याचं मोठं आव्हान तिच्यासमोर होतं. सुरुवातीला ती थोडी साशंक होती, मात्र घरच्यांचा आणि शाळेतील शिक्षकांचा पाठिंबा मिळाला. तिने अभ्यास आणि गायन यांचा समतोल साधला आणि ही स्पर्धा जिंकली. या विजयानंतर तिच्यासाठी अनेक अल्बम्स, हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांची शीर्षक गीते खुली झाली.
पार्श्वगायनाची पहिली संधी तिला महेश मांजरेकर यांनी दिली. त्यांच्या ‘एहसास’ या चित्रपटासाठी तिने गायन केलं. त्यानंतर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘जोधा अकबर’, ‘उत्तरायण’, ‘पहेली’ अशा अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये तिचा आवाज पोहोचला. ‘नटरंग’सारख्या अजय–अतुल यांच्या उत्कृष्ठ संगीताने नटलेल्या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आणि ही सगळी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.
‘अनुबंध’, ‘शुभं करोती’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘एक झोका’, ‘वृंदावन’ अशा विविध मालिकांची शीर्षक गीतेही तिच्याच आवाजात आहेत. हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तिने गायन केलं आहे. २००१ मध्ये ‘तेरा मेरा साथ रहे’ या हिंदी चित्रपटातून तिने पार्श्वगायनात पदार्पण केलं. ‘सा रे ग म प’ या संगीत शोमध्ये स्पर्धक ते परीक्षक असा तिचा प्रवासही उल्लेखनीय ठरला.
मराठी सिनेसृष्टीत बेला शेंडे यांनी लावणी, रोमँटिक गाणी आणि शास्त्रीय आधार असलेल्या गाण्यांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘नटरंग’मधील ‘अप्सरा आली’ आणि ‘वाजले की बारा’ या लावण्या आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. ‘काकस्पर्श’मधील ‘सांज येळी’, ‘तुह्या धर्म कोणचा’ मधील ‘खुरखुरा’, ‘७२ मैल एक प्रवास’मधील ‘मन बावरे’, ‘मंगलाष्टक वन्स मोर’मधील ‘रोज मला विसरून मी’ अशी अनेक गाणी तिच्या आवाजामुळे लक्षात राहिली. हिंदीत ‘जोधा अकबर’मधील ‘मन मोहना’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील ‘इश्क वाला लव्ह’, ‘व्हॉट्स युअर राशी?’मधील ‘सु चे’, ‘पहेली’मधील ‘कांगना रे’ यांसारख्या गाण्यांमधूनही तिने आपली छाप पाडली.
या प्रवासात तिला झी गौरव, नर्गिस दत्त पुरस्कार, सुशील स्नेह पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, झी संगीत पुरस्कार, स्टार स्क्रीन पुरस्कार, मिर्ची म्युझिक पुरस्कार यांसह अनेक सन्मान मिळाले. २०१४ मध्ये ‘खुरखुरा’ या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, हा तिच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. सुबोध भावे यांच्या ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात तिने अभिनय आणि गायन दोन्ही केलं, हेही तिच्या अष्टपैलूतेचं उदाहरण आहे.
आजही तिचा गायनप्रवास तितक्याच जोमाने सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाण्याच्या संधी ती सातत्याने स्वीकारत आहे. म्हणूनच मराठी आणि भारतीय संगीतविश्वात बेला शेंडे या खऱ्या अर्थाने अष्टपैलू गायिका, एक हिरकणी ठरतात.
