
नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत ट्रेलर अनावरण सोहळा
मराठी सिनेसृष्टीत सातत्याने वेगळ्या धाटणीचे, काळाशी सुसंगत प्रयोग सादर करणारे झी स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक डॅशिंग, स्टायलिश आणि मनाला भिडणारी लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या बहुप्रतीक्षित ‘रुबाब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्याच क्षणापासून या ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे.
‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ — आजच्या तरुणाईची गोष्ट
‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही लक्षवेधी टॅगलाईन घेऊन आलेला ‘रुबाब’ केवळ एक प्रेमकहाणी नसून, स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या, आत्मसन्मान जपणाऱ्या आणि प्रेमासाठी ठाम उभ्या राहणाऱ्या आजच्या तरुणाईची गोष्ट आहे. रुबाबदार, स्वॅग असलेला नायक, त्याची ड्रीम गर्ल आणि त्यांचं गोड, हळवं आणि तितकंच बेधडक प्रेम ट्रेलरमध्ये प्रभावीपणे उलगडतं. मात्र या प्रेमाच्या वाटेत समाज, कुटुंब आणि अनेक विरोधकांचे अडथळे उभे राहतात.
प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमानाचा सामना

प्रेम, संघर्ष आणि स्वाभिमान यांच्या संगमातून उभं राहिलेलं हे नातं जिंकेल की समाजाच्या दबावापुढे झुकेल, याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार आहे. दरम्यान, ट्रेलरमधील रोमँटिक केमिस्ट्री, ठसकेबाज संवाद, स्टायलिश सादरीकरण, दमदार पार्श्वसंगीत आणि ऊर्जेने भरलेली दृश्यं यामुळे ‘रुबाब’चा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
नागराज मंजुळे यांची ‘रुबाब’ टीमसाठी खास प्रतिक्रिया
यावेळी नागराज मंजुळे चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देताना म्हणाले, “शेखर माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याचं दिग्दर्शन कमाल आहे. ट्रेलर पाहूनच कळतं की चित्रपटाची कथा काहीतरी वेगळी आहे. संभाजी आणि शितल यांची जोडीही चित्रपटाच्या नावाप्रमाणेच रुबाबदार दिसते. शूट अतिशय सुंदर आणि भव्य पद्धतीने साकारलं असून संगीतही अप्रतिम आहे. ट्रेलर पाहताच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते.”
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांचा दृष्टिकोन
चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे सांगतात की, ही कथा त्यांना २०१८ मध्येच सुचली होती. आजच्या पिढीचं प्रेम बेधडक, स्पष्ट आणि स्वाभिमान जपणारं असतं, आणि हाच ‘रुबाब’ या चित्रपटात दिसणार आहे. प्रेमासाठी उभं राहण्याची, आपल्या तत्त्वांवर जगण्याची आणि भावना निर्भीडपणे व्यक्त करण्याची ही कथा असल्याचा त्यांचा विश्वास आहे.
झी स्टुडिओजचा विश्वास आणि तरुण दिग्दर्शकांना संधी
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, झी स्टुडिओज नेहमीच नव्या दिग्दर्शकांना संधी देण्यावर विश्वास ठेवते आणि शेखर हा त्याच विश्वासाचा उत्तम उदाहरण आहे. प्रेम, स्वप्नं आणि आत्मसन्मान यांचा संगम असलेली ही कथा तरुणाईच्या भावविश्वाला थेट स्पर्श करणारी असल्याचं ते नमूद करतात.
निर्मात्यांचा कमर्शियल आणि आधुनिक दृष्टिकोन
निर्माते संजय झणकर यांच्या मते, ‘रुबाब’ची कथा अतिशय प्रामाणिक आणि जिवंत वाटली. आजच्या प्रेक्षकांसाठी अधिक शहरी, कमर्शियल आणि भव्य स्वरूपात ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उपदेश न करता धमाकेदार मनोरंजन देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा त्यांचा विश्वास आहे.
कलाकार, निर्मिती आणि प्रदर्शना विषयी माहिती
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून, संजय झणकर आणि गौरी झणकर हे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी विशेष उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ मोठ्या पडद्यावर
६ फेब्रुवारीपासून सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘रुबाब’ हा चित्रपट तरुणाईच्या प्रेमाची, स्वाभिमानाची आणि स्वॅगची गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडणार असून, ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
