‘मन आतले मनातले’मध्ये उपेंद्र लिमये खलनायकी भूमिकेत

अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे उपेंद्र लिमये आता ‘मन आतले मनातले’ या चित्रपटात प्रभावी खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निर्मिती, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू

सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत ‘मन आतले मनातले’ या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. त्यांनीच या चित्रपटाचे कथा व पटकथा लेखन केले असून, संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांचे आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अँथनी यांनी केले आहे.

संगीत, गीत आणि छायांकन

चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अभिजित मजुमदार यांनी केले असून, गीतलेखन डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांचे आहे. छायांकनाची जबाबदारी सुदर्शन सेनापती यांनी सांभाळली आहे. संकलनाची जबाबदारी मलया आणि बिपिन यांनी निभावली आहे.

तगडी स्टारकास्ट

या चित्रपटात उपेंद्र लिमये यांच्यासह सुरेन महापात्रा, मानसी नाईक, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरुण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर आणि विनित भोंडे अशी तगडी कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.

मराठीत पदार्पण करणारी निर्मिती संस्था

सूर्य फिल्म वर्ल्ड या निर्मिती संस्थेने यापूर्वी ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली भाषांतील चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘मन आतले मनातले’ या चित्रपटातून ही निर्मिती संस्था मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

कथेचा वेगळा आणि थरारक विषय

थॅलेसेमिया आणि गिल्बर्ड सिंड्रोम या आजारांवर औषध शोधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका डॉक्टर दांपत्याला औषधाचा शोध लागतो. या आजारांना त्यांचा मुलगाही सामोरा जात असतो. शोध लागलेल्या औषधाचा प्रयोग ते आपल्या मुलावर करतात. मात्र त्या औषधाचा परिणाम नक्की कसा होतो, यानंतर कथा वेगवेगळ्या वळणांवर जाते आणि अनेक नाट्यमय घडामोडी घडतात. त्या मुलाचे पुढे नेमके काय होते, याचे उत्तर चित्रपटात मिळणार आहे.

उपेंद्र लिमये यांची वेगळी खलनायकी छटा

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त उपेंद्र लिमये यांनी प्रत्येक भूमिकेत खणखणीत अभिनय साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. ‘मन आतले मनातले’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला वेगळा आणि लक्षवेधी टप्पा ठरणार असून, त्यांची खलनायकी भूमिका हे या चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.

टीजरमुळे वाढलेली उत्सुकता

चित्रपटाच्या टीजरमध्ये प्रभावी अॅक्शन सिक्वेन्सेस आणि गूढ वातावरण पाहायला मिळते. या टीजरमुळे ‘मन आतले मनातले’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढली असून, १३ फेब्रुवारीला हा थरार मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Leave a comment