अजित दादांच्या आठवणी…प्रशांत साजणीकर, सह व्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी

पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री, कामाला लागलेली यंत्रणा

दादा पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सगळी पक्षयंत्रणा जोमाने कामाला लावली. पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी आठवड्यातून एक दिवस सर्वसामान्य नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयात भेटावे, असे आदेश दिले. त्याआधी अशी पद्धत नव्हती. सर्वांनी एक-एक दिवस वाटून घेतला. बहुतांश मंत्र्यांनी साधारण दुपारी मंत्री कार्यालयात भेटीची वेळ देण्याचे निश्चित केले.

गुरुवारी सकाळी आठ—अवाक करणारा निर्णय

बुधवारी मंत्रीमंडळ बैठक होत असे. दादांनी स्वतःसाठी गुरुवार निवडला. गुरुवारी दुपारी कितीची वेळ द्यावी, असे विचारायला गेलो असता दादा म्हणाले—सकाळी ८ वाजता. आम्ही सगळे अवाक झालो. मुंबईत इतक्या सकाळी कोण येणार? पण दादा ठाम होते. तसे पक्ष कार्यालयास कळवले. पुढच्याच गुरुवारी सकाळी ७ वाजता चर्चगेटच्या पक्ष कार्यालयात पोहोचलो, तर पाय ठेवायला जागा नव्हती. राज्याच्या दूरदूरच्या ग्रामीण भागातून लोक रांगा लावून उभे होते. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी ही गर्दी वाढतच गेली.

लोकांसाठी योग्य ठरलेली वेळ

लोक सकाळी सहापासून रांगा लावत आणि दादा सात वाजल्यापासून असंख्य लोकांना भेटून त्यांची कामे मार्गी लावत. रात्रभर प्रवास करून सकाळी लवकर भेट मिळणे किती सोयीचे आहे, असे अनेकजण सांगत. सकाळी लवकर वेळ देण्याचा दादांचा निर्णय किती योग्य होता, याची ठाम जाणीव झाली.

प्रशासनाची विलक्षण जाण आणि पकड

दादांना प्रशासनाची इतकी उत्तम जाण होती की कोणते काम होईल-नाही, हे क्षणार्धात ते ओळखत. काम होणार नसेल तर तसे स्पष्ट सांगत आणि होणार असेल तर कोणाला फोन करायचा, बैठक ठेवायची की कागदावर रिमार्क देऊन काम कसे होईल—निर्णय तिथल्या तिथे घेत. राज्य प्रशासनातील अधिकारी कोणत्या पदावर आहेत आणि त्यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय आहेत, याचे त्यांना नेमके भान असे; सचिव, कलेक्टर किंवा एसपी कोण आहे, हे सांगावे लागत नसे. कोणत्याही प्रसंगात संभ्रम किंवा द्विधा अवस्था त्यांच्यात कधी पाहिली नाही.

कार्यतत्पर कर्मयोगी

सतत कार्यमग्न राहणे हा दादांचा अलौकिक गुण. दिवस-रात्र काम करूनही थकवा न दाखवणे, बैठका-दौरे-गाठीभेटी यात अखंड व्यस्तता—हे त्यांच्या कामाचे स्वरूप. कोणतीही बैठक ३० मिनिटांपेक्षा जास्त चालत नसे आणि त्यात निर्णय होत. अधिकारी असोत, राजकारणी वा कार्यकर्ते—कामाव्यतिरिक्त गप्पांत रमलेले त्यांना कधी पाहिले नाही.

कामच ओळख, प्रसिद्धीपासून अंतर

उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात सोशल मीडियाचा उदय होत होता. छोटी कामे करून मोठी प्रसिद्धी मिळवण्याचा तो काळ; पण दादांनी हा मार्ग स्वीकारला नाही. “माझे काम हीच माझी ओळख,” असे ते नेहमी सांगत. सुरुवातीला पत्रकारांपासूनही ते अंतर ठेवत. तरी त्यांच्या सहवासात आलेला लहान-मोठा प्रत्येकजण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत असे. इमेज बिल्डिंगसाठी कोणत्याही एजन्सीची गरज त्यांना कधीच लागली नाही; कार्यमग्नता आणि कामाचा धडाका यामुळेच त्यांची प्रतिमा घडली.

वेळेचा आदर

वक्तशीरपणा हा दादांचा आणखी एक ठळक गुण. त्यामुळे अधिकारी आणि मंत्री बैठकीच्या आधी वेळेवर हजर राहत. दौर्‍यांवेळी अनेकदा राजकारण्यांच्या उशिरामुळे पायलट तक्रार करतात; दादांच्या दौर्‍यांत मात्र सकाळी ७ च्या टेकऑफला ते ६.३०लाच पोहोचत असल्याने पायलट अडचणीत पडत, अशी गंमत घडत असे.

स्वच्छता, टापटीप आणि दर्जा

दादांकडे सर्वत्र स्वच्छता आणि टापटीप दिसत असे. काम करताना ते अनेकदा पेन्सिल वापरत; तिचे टोकही नेहमी धारदार असे. कचरा दिसला तर स्वतः उचलत आणि समोरच्याची कानउघाडणी करत. दर्जात तडजोड त्यांना मान्य नव्हती. इमारत बांधकामात फरश्या कुठल्या रंगाच्या, याबाबतही अधिकारी त्यांचा सल्ला घेत. झाडांची त्यांना विशेष आवड; घर आणि कार्यालयात हिरवाई असायची.

विशेष कार्य अधिकारी म्हणून चार वर्षे

मी चार वर्षे दादांकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांच्या कडक शिस्तीमुळे दडपण आले; पण एकदा विश्वास बसला की काम करणे सोपे होत असे, कारण सूचना अत्यंत स्पष्ट असत. दौर्‍यांची आखणी माझ्याकडे असे.

अहमदाबादचा अनपेक्षित थांबा

एकदा दिल्लीतील महत्त्वाची बैठक उरकून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शासकीय विमानाने मुंबईला परतत होते. रात्री मुंबईत मुसळधार पाऊस होता. विमानातून फोन आला—पावसामुळे मुंबईत लँडिंग शक्य नाही; विमान अहमदाबादकडे वळवले आहे. तातडीने प्रोटोकॉलची सोय केली. अचानक उतरावे लागल्याने चिंता होती; पण विमान सुखरूप उतरल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मंत्रालयातील आग—एक वेदनादायी आठवण

त्या चार वर्षांत एकदाच दादांना हताश झालेले पाहिले—मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीत. दादांना अक्षरशः हाताला धरून बाहेर काढले गेले; पण दुर्दैवाने बारामतीचे दोन जण आत अडकले. दादांनी जळत्या इमारतीखाली उभे राहून अग्निशमन दलाला सूचना दिल्या; तरीही त्यांचे प्राण वाचले नाहीत. दुसऱ्या दिवशी घड्याळ आणि चेनवरून ओळख पटली. आगीतून दादे वाचले; पण त्या घटनेने त्यांना खोलवर हादरवले.

कराडचा प्रवास आणि धुक्याचा अडथळा

उपमुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच कराडला जाण्याचा प्रसंग. दरवर्षी २५ नोव्हेंबरला कराड येथील प्रीतिसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतात. त्या वेळी दादा मुंबईहून विमानाने, तर मुख्यमंत्री पुण्याहून हेलिकॉप्टरने येणार होते. कराड विमानतळ लहान आणि धुक्याने झाकलेला. सातत्याने हवामानाची माहिती घेतली. विमान वेळेत उडाले; पण धुक्यामुळे लँडिंग शक्य न झाल्याने विमान मुंबईला परतले—सुखरूप.

मन हेलावणारी ओळ

दादा, कालसुद्धा तुमचे विमान परत सुखरूप यायला हवे होते….

(लेखक सन २०१० ते २०१४ या काळात अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होते.)

Leave a comment