
विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या केस नं. ७३ या चित्रपटात ते एसपी संजय देशमुख या जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
प्रामाणिक अधिकारी, कठीण परीक्षा
एसपी संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्या सेवाकाळात एकही गुन्हा आजवर अनसॉल्व्ह राहिलेला नाही. प्रामाणिकपणा, कर्तृत्व आणि सरळ स्वभावामुळे संजय देशमुख गावात लोकप्रिय आहेत. मात्र, ऐन निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांच्या हाती एक अत्यंत गुंतागुंतीचा खटला येतो. ही केस सोडवण्याचं प्रचंड दडपण त्यांच्यावर येतं आणि प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कसोटीचा ठरतो.
सस्पेन्सने भरलेला थरार

धागेदोरे मिळत नाहीत, संशय वाढत जातो आणि एकामागोमाग घडणाऱ्या घटनांमुळे कथानक अधिकच गूढ बनतं. धाडस, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणारी ही भूमिका चित्रपटाला वेगळी कलाटणी देणारी ठरणार आहे. कथेमधील सस्पेन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असल्याचं संकेत मिळतात.
निर्मिती आणि दिग्दर्शन
लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित केस नं. ७३ या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली असून सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत.
अभिनेत्यांचा अनुभव, भूमिकेचं आव्हान
“जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नक्कीच आव्हानात्मक होतं. एकामागोमाग होणाऱ्या खूनांचा आणि त्यामागच्या गुन्हेगाराचा मागोवा घेताना निर्माण होणारं गूढ प्रेक्षकांना चित्रपटात अनुभवता येईल,” असं शैलेश दातार सांगतात.
तगडी स्टारकास्ट
शैलेश दातार यांच्यासोबत अशोक शिंदे, राजसी भावे, नंदिता पाटकर आणि पियुष आपटे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे. ६ फेब्रुवारीपासून हा थरारक अनुभव प्रेक्षकांना चित्रपटगृहात अनुभवता येणार आहे.
