
‘जुळली गाठ गं’ या ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या प्रेक्षकांसाठी थरारक वळण पाहायला मिळत आहे. सावी आणि धैर्य यांना वेगळं करण्यासाठी दामिनी सातत्याने कट रचत असून, त्याच कटाचा भाग म्हणून सावीच्या आयुष्यात अंगदचा प्रवेश होतो. भाऊंचा विद्यार्थी असल्याचा बनाव करून अंगद स्वतःच्या बिझनेससाठी सावीची मदत घेतो आणि नकळत सावी या प्रकरणात अडकते.
खोटे आरोप आणि सावीची अस्तित्वाची लढाई
अंगदने रचलेल्या डावामुळे सावीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि विनयभंगाचा खोटा आरोप लावण्यात येतो. या गंभीर आरोपांमुळे सावीला अटक होते. मात्र, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सावी ही खंबीरपणे कायद्याची लढाई लढत आहे. तिच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण टप्पा असल्याचं मालिकेत ठळकपणे दाखवण्यात येत आहे.
पंचकन्यांची एकजूट, अन्यायाविरुद्ध संघर्ष
या निर्णायक लढाईत सावीच्या मदतीसाठी ‘सन मराठी’वरील इतर मालिकांमधील महत्त्वाच्या महिला व्यक्तिरेखा एकत्र येणार आहेत. इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या पाठीशी उभी असून, राणी कायद्याच्या चौकटीतून तिला सोडवण्यासाठी ठामपणे लढते आहे. आता अर्पिता, अनुप्रिया आणि वैदेही या तिघींचीही साथ सावीला मिळणार आहे. राणी, मंजू, अर्पिता, अनुप्रिया आणि वैदेही या पंचकन्या एकत्र येऊन सावीला निर्दोष कसं सिद्ध करणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
महिला सशक्तीकरणाचा प्रभावी संदेश
या विशेष भागाबद्दल सावीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पायल मेमाणे सांगते की, सावी हे पात्र घराघरात पोहोचलं आहे. लग्नाआधी बेधडक असलेली सावी लग्नानंतर अधिक जबाबदार झाली असली, तरी आज तिच्यावर आलेल्या खोट्या आरोपांमुळे ती स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडते आहे. महाराष्ट्रात अनेक महिलांवर होणाऱ्या अन्यायाला सामोरं कसं जायचं, हा संदेश मालिकेतून ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न असल्याचं ती सांगते. विविध मालिकांतील अभिनेत्री एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध उभ्या राहतात, हे दृश्य प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
‘अंतिम निकालाचा टप्पा’ पाहायला विसरू नका
पंचकन्यांचा हा विशेष भाग म्हणजे ‘अंतिम निकालाचा टप्पा’ पाहायला ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता ‘सन मराठी’वर नक्की पाहा. हा भाग चुकवू नका, अशी विनंती अभिनेत्री पायल मेमाणे यांनी प्रेक्षकांना केली आहे.
