
मराठी माध्यमाच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७ कोटींहून अधिक कमाई करत अभिमानास्पद यश संपादन केले आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात ५० यशस्वी दिवस पूर्ण करत अर्धशतक गाठले असून, हा टप्पा साजरा करतानाच शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यामुळे हा सोहळा अक्षरशः दुहेरी जल्लोषात रंगला.
मुंबईत जल्लोषमय सेलिब्रेशन; ढोल-ताशा, लेझीम आणि बालशिवरायांचे आगमन

मुंबईतील एका चित्रपटगृहात हा सोहळा दणक्यात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर वातावरण भारावून गेले. घोड्यावरून ‘बालशिवरायां’चे आगमन होताच उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली. शिवगर्जना ऐकताना प्रेक्षक स्तब्ध झाले आणि पुढच्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला. घोषणांचा नाद आणि मराठी अस्मितेचा अभिमान यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत विद्यार्थ्यांसह हा विशेष सोहळा साजरा केला.
प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहण्याचा भावनिक क्षण
चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत बसून चित्रपट पाहिला. पडद्यावर चालणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला उत्स्फूर्त टाळ्या, शिट्ट्या आणि भावनिक प्रतिक्रिया उमटत होत्या. अनेकांनी आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला, तर नव्या पिढीतील विद्यार्थ्यांनीही चित्रपटाशी मनापासून नाते जोडले. प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्याचा क्षण टीमसाठी अत्यंत समाधानकारक ठरला.
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची भावना
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “आजचा दिवस खूप खास आहे. एका बाजूला चित्रपटाचे ५० दिवस पूर्ण झाले आणि त्याच वेळी आपण शिवजयंती साजरी करत आहोत. मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी असलेला हा चित्रपट आणि शिवरायांचा प्रेरणादायी वारसा यांचा सुंदर संगम आज अनुभवायला मिळाला. प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहण्याचं समाधान शब्दांत मांडणं कठीण आहे. उद्यापासून शोजही वाढत आहेत, हे सर्व प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झाले.”
आठव्या आठवड्यात वाढलेले शोज आणि चित्रपटगृहांची संख्या
आठव्या आठवड्यात पदार्पण करताना चित्रपटगृहांची संख्या शंभरच्या पुढे गेली असून शोजची संख्याही वाढत आहे. वाढत्या प्रतिसादामुळे चित्रपटाची यशस्वी घोडदौड अधिकच वेग घेत आहे.
कलाकारांची दमदार फळी आणि निर्मितीची धुरा
या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून निर्मितीची धुरा क्षिती जोग यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांचा सहभाग आहे.
