
मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा खळखळून हसवणारा, ताणतणाव विसरायला लावणारा आणि कौटुंबिक नात्यांतील गंमती-जमती हलक्याफुलक्या शैलीत मांडणारा नवा प्रयोग रंगत आहे. ‘लाडकी विहीण योजना’ हे नाव जरी शासकीय वाटत असलं तरी ही योजना आहे शंभर टक्के मनोरंजनाची. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणं आणि त्यांना दोन-अडीच तासांचा दिलखुलास विरंगुळा देणं, हाच या नाटकामागचा खरा हेतू आहे.
‘योजना’ पण मनोरंजनाची – कागदपत्रांशिवाय!
नावात ‘योजना’ असली तरी यात कोणत्याही अटी-शर्ती नाहीत, अर्ज नाहीत, कागदपत्रांचा पसारा नाही. आहे फक्त मिश्किल संवाद, खुसखुशीत विनोद आणि मराठी घराघरांत घडणाऱ्या प्रसंगांचं जिवंत चित्रण. कौटुंबिक वास्तवावर विनोदी पद्धतीने भाष्य करत हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं आश्वासन देतं. पत्रकार परिषदेत कलाकारांनी स्पष्ट केलं की ही कोणतीही शासकीय योजना नसून ही खास रसिकांसाठीची मनोरंजन योजना आहे.
निर्मिती सावंत यांची ‘माहेरी’ परतफेड

या नाटकाचं खास आकर्षण म्हणजे अभिनेत्री निर्मिती सावंत यांची रंगभूमीवर पुनरागमन. “नाटक म्हणजे माझं माहेर,” असं सांगताना त्यांनी भावनिक शब्दांत रंगभूमीशी असलेलं नातं व्यक्त केलं. चित्रपटाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मधल्या काळात नाटकापासून दूर राहावं लागलं, मात्र ‘लाडकी विहीण योजना’च्या निमित्ताने पुन्हा रंगभूमीवर उभं राहण्याचा आनंद त्यांच्यासाठी खास आहे. “प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ,” असं त्या म्हणाल्या.
दिग्दर्शन, लेखन आणि दमदार टीम

‘लाडकी विहीण योजना’ची निर्मिती अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंटने केली आहे. नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांचे असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. “शासनाची नाही, ही सावंतांची योजना आहे,” असं विनोदी भाष्य करत दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी या नाटकामागील भक्कम टीमचं कौतुक केलं.
लेखक प्रथमेश शिवलकर यांचं हे पहिलं व्यावसायिक नाटक असून इतक्या मातब्बर कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणं ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. संहितेवर पूर्ण विश्वास असल्याचं निर्माते दिलीप जाधव यांनी सांगत, हे नाटक १५० हून अधिक प्रयोग गाठेल असा ठाम विश्वास व्यक्त केला.
कलाकारांची ताकद आणि रंगतदार साथ
नाटकात निर्मिती सावंत यांच्यासोबत स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकारांची साथ आहे. निर्माते दिलीप जाधव आणि प्रसाद ओक असून सहनिर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, तृप्ती पाटील आणि संजय मेमाणे आहेत.
नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, प्रकाशयोजना सुनील जाधव, गीतलेखन क्षितीज पटवर्धन, गायिका राधिका भिडे, वेशभूषा पुर्णिमा ओक, रंगभूषा मदन गायकवाड आणि सूत्रधार प्रणित बोडके अशी तांत्रिक टीम नाटकाला अधिक समृद्ध करते.
शुभारंभाचे रंगतदार प्रयोग
या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग पुढीलप्रमाणे होणार आहेत –
गुरुवार ५ मार्च, दुपारी ४.०० वा., प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह
शुक्रवार ६ मार्च, दुपारी ४.०० वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह
शनिवार ७ मार्च, दुपारी ४.०० वा., यशवंत नाट्य मंदिर
रविवार ८ मार्च, दुपारी १.०० वा., यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
हास्य, मॅडनेस आणि उत्तम कलाकार-तंत्रज्ञांची भट्टी यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ मराठी रंगभूमीवर नक्कीच वेगळी छाप पाडेल, असा विश्वास संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे. रंगभूमीवरील ही ‘मनोरंजन योजना’ प्रेक्षकांना किती आनंद देते, हे आता प्रयोगांनंतरच ठरणार आहे.
