मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका

अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

मुंबई: मराठीचे वैभव जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मराठी मूड’ चॅनलतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित ‘बोला मराठी’ पुरस्कार सोहळा प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये दिमाखात पार पडला. अवघ्या एका आठवड्यात या उपक्रमाने राज्यासह देश-विदेशातील मराठीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत डिजिटल विश्वात आपला ठसा उमटवला.

एका आठवड्यात देश-विदेशातून प्रतिसाद
२१ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक येथील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे भारताबाहेरून पाकिस्तान आणि दुबईसह विविध देशांतील सहभागीही या स्पर्धेत सामील झाले. अमराठी भाषिकांनीही मराठी भाषेत सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

“मराठी माझ्यासाठी काय आहे?” या संकल्पनेवर सादरीकरणे
“मराठी माझ्यासाठी काय आहे?” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्पर्धेत वय वर्षे ५ पासून ते ६५ वर्षांच्या ज्येष्ठ स्पर्धकांपर्यंत सर्वांनी कविता, कथाकथन, गाणी आणि स्टँड-अप कॉमेडीच्या माध्यमातून मराठीबद्दलचे आपले विचार मांडले. मराठी भाषेची ओढ आणि अभिमान या विविध कलाविष्कारांतून ठळकपणे उमटला.

मान्यवरांची उपस्थिती आणि परीक्षण
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून दिग्दर्शक संजय जाधव, ज्येष्ठ साहित्यिक व बालकवी एकनाथ आव्हाड आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर नील साळेकर (Just Neel Things) उपस्थित होते. अभिनेत्री संजना पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संपूर्ण कार्यक्रम ‘marathimood’ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध होणार आहे.

चार गटांमधून अंतिम १६ विजेते
बालगट, शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा चार गटांतील सादरीकरणांचे परीक्षण करून परीक्षकांनी अंतिम १६ विजेत्यांची निवड केली. गटानुसार विजेत्यांची नावे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ‘मराठी मूड’ यूट्यूब चॅनलवर जाहीर करण्यात येणार आहेत.

रोख पारितोषिकांची घोषणा
चारही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच स्पर्धेतील सहभागी पर्शियन बीता आणि पाकिस्तानी जहानवी यांना २५ हजार रुपयांचा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मान्यवरांचे कौतुक आणि पुढील वर्षी मोठी योजना
मराठी भाषेसाठी असे उपक्रम सातत्याने होत राहिले पाहिजेत आणि ‘बोला मराठी’मुळे मराठीला जागतिक मंच मिळत असल्याचे मत संजय जाधव यांनी व्यक्त केले. छोटे चॅनल असूनही मोठे पाऊल उचलून अल्पावधीत यशस्वी उपक्रम राबवल्याबद्दल एकनाथ आव्हाड यांनी कौतुक केले. नव्या पिढीला मराठीचे बाळकडू देण्याचे काम ‘मराठी मूड’ करत असल्याचे मत नील साळेकर यांनी मांडले.

‘बोला मराठी’ उपक्रमाला अवघ्या सात दिवसांच्या तयारीनंतर मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा असून पुढील वर्षी हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात राबवला जाईल, अशी माहिती ‘मराठी मूड’चे चॅनल हेड शंतनु जोशी यांनी दिली.

मराठी भाषेचा जागतिक जागर करण्यासाठी उचललेले हे पाऊल आता डिजिटल विश्वात नवा अध्याय लिहित आहे.

Leave a comment