‘तलास’ चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न

मराठी सिनेसृष्टीत आशयघन आणि उत्कंठावर्धक चित्रपटांची परंपरा कायम राहिली आहे. त्याच परंपरेत भर घालणारा आगामी रहस्यमय चित्रपट ‘तलास’ सध्या चर्चेत आहे. शीर्षकातून नेमकी कथा उलगडत नसली, तरी कुतूहल मात्र नक्कीच वाढते. नुकतेच या चित्रपटातील धम्माल हळदी गीताचा दिमाखदार प्रकाशन सोहळा पार पडला आणि चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली.

रहस्यमय कथानकाची उत्कंठा

दीपतारांगण क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्मात्या दीपा सावंत-खोत यांनी ‘तलास’ या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, गुंतागुंतीच्या घटना आणि शेवटच्या टप्प्यावर उलगडणारे रहस्य अशी या चित्रपटाची मांडणी आहे. दिग्दर्शक उदय गणपत जाधव यांनी अभ्यासपूर्ण दिग्दर्शन करत कथा आणि पटकथाही स्वतः लिहिली आहे. संवादलेखनाची जबाबदारी रुपाली कुटे यांनी सांभाळली आहे.

धम्माल हळदी गीताचा रॉयल जल्लोष

दादर क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ‘या गो बायांनो हळद घेऊनशी…’ या गाण्याचे प्रकाशन करण्यात आले. हळदीच्या सोनसळी रंगात न्हालेलं, जल्लोषमय आणि रॉयल थाटात साकारलेलं हे गीत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गीतकार आणि संगीतकार विजय गाडेकर यांच्या लेखणीतून अवतरलेले आणि संगीतबद्ध केलेले हे गाणे महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी गायले आहे.

या गाण्यावर गौतमी पाटील हिने ठसकेबाज नृत्य सादर केले असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले आहे. पारंपरिक हळदीच्या सोहळ्याला ग्लॅमर आणि ऊर्जा देणारी ही सादरीकरणशैली प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

कलाकारांची दमदार फळी

चित्रपटात चिन्मयी सुमित, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील अशी दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. विविध भूमिकांमधून ही टीम कथानकाला अधिक प्रभावी बनवणार आहे.

तांत्रिक बाजू भक्कम

चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सचिन लोखंडे यांनी केली असून कलादिग्दर्शन अनिल केदार, वेशभूषा धनश्री सालेकर, रंगभूषा सुनील सावंत, छायाचित्रण पंकज पटेल यांनी सांभाळले आहे. पोस्ट प्रॉडक्शन संमित स्टूडियो येथे झाले असून संकलन सुबोध नारकर आणि ध्वनीआरेखन विशाल राणे यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता सदानंद टेंबुलकर, निर्मिती व्यवस्थापक संदीप मोरे आणि डीआय कलरिस्ट भूषण दळवी यांनी तांत्रिक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

रहस्य, थरार आणि उत्सवाचा संगम असलेला ‘तलास’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे, यात शंका नाही.

Leave a comment