विश्व मराठी संमेलनात दादासाहेब फाळके चित्रनगरीचा लक्षवेधी दालन

नाशिक येथे भरलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे दादासाहेब फाळके चित्रनगरी दालन विशेष आकर्षण ठरत आहे. या दालनाला विशेषतः तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सिनेसृष्टीत करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हे दालन माहितीचा खजिना ठरत आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे दालन उभारण्यात आले आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे दालन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत चित्रपट क्षेत्रासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जातात. एक खिडकी योजना, दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी अर्थसहाय्य योजना, राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा, तसेच चित्रपताका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांसारख्या उपक्रमांची सविस्तर माहिती येथे दिली जात आहे.

कंटेंट क्रिएशन झोनला तरुणाईचा प्रतिसाद

या दालनातील सर्वाधिक लक्षवेधी उपक्रम म्हणजे खास तरुणांसाठी उभारलेला ‘कंटेंट क्रिएशन झोन’. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नवोदित तरुणांना कंटेंट क्रिएटर बनण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी येथे प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर उभे राहून स्वतःचा कंटेंट सादर करण्याची संधी देण्यात येत आहे. या अनुभवातून चित्रीकरणाचे विविध पैलू समजण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे या झोनमध्ये तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभाग घेताना दिसत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरू नका – तंत्रज्ञानाचा स्वीकार करा

भविष्यातील माध्यमविश्व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर अधिक वेगाने विकसित होणार असल्याचा संदेश या दालनातून देण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरण्याऐवजी योग्य प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन नवोदित तरुणांना करण्यात आले आहे.

तरुणांसाठी विशेष प्रशिक्षण वर्गांची माहिती

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि Film and Television Institute of India (एफटीआयआय) यांच्या सामंजस्य करारातून विविध प्रशिक्षण वर्ग चालवले जात आहेत. चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, तांत्रिक कौशल्य आणि माध्यम प्रशिक्षणाबाबतची माहिती या दालनात सविस्तरपणे देण्यात आली आहे.

विश्व मराठी संमेलनात उभारलेले हे दादासाहेब फाळके चित्रनगरी दालन केवळ माहितीपर नाही, तर नव्या पिढीला सिनेविश्वाकडे प्रेरित करणारे व्यासपीठ ठरत आहे.

Leave a comment