
स्टायलिश आणि दमदार नायकाच्या भूमिकेत राज हंचनाळे
झी मराठीवरील नव्या ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळे एका दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. जय खानोलकर ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. बाहेरून पाहता तो थोडा कठोर आणि अॅटिट्युड असलेला वाटतो; मात्र मनाने तो अतिशय संवेदनशील आहे. त्याच्या आयुष्यात त्याची आजी, आई आणि बहीण या तीन स्त्रियांना विशेष स्थान आहे. स्वतःच्या मेहनतीवर उभं केलेलं आयुष्य आणि स्पष्टवक्तेपणा हे त्याच्या स्वभावाचे ठळक पैलू आहेत.
काटेकोर ऑडिशन प्रक्रियेनंतर मिळाली भूमिका
या भूमिकेसाठी निवड होण्याची प्रक्रिया राजसाठी वेगळी आणि आव्हानात्मक ठरली. साधारणपणे एक-दोन ऑडिशनमध्ये निवड होत असताना या भूमिकेसाठी मात्र त्याला चार-पाच टप्प्यांतून जावे लागले. सुरुवातीला त्याने घरातून पहिलं ऑडिशन पाठवलं, जे प्रोडक्शन टीमला खूप आवडलं. त्यानंतर त्याला सेटवर बोलावून सहकलाकारांसोबत अनेक राऊंडमध्ये ऑडिशन घेण्यात आले. राज सांगतो की, या प्रक्रियेमुळे सुरुवातीला थोडे प्रश्न पडले; पण आता मागे वळून पाहताना योग्य कलाकार निवडण्यासाठी घेतलेली ही मेहनत योग्यच वाटते.
भूमिकेसाठी बॉडी लँग्वेज आणि स्वॅगवर विशेष मेहनत
जय खानोलकर ही व्यक्तिरेखा प्रभावी आणि अधिकारपूर्ण आहे. त्यामुळे त्याची बॉडी लँग्वेज, स्वॅग, अॅटिट्युड आणि स्टाईल यावर राजने विशेष काम केले आहे. स्वतःच्या मेहनतीने साम्राज्य उभं केलेला हा नायक असल्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वात रुबाब आणि आत्मविश्वास दिसणं गरजेचं आहे. दिग्दर्शकांसोबत चर्चा करून या व्यक्तिरेखेतील प्रत्येक पैलू अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर कठोर वाटणाऱ्या या व्यक्तिरेखेच्या आत दडलेला प्रेमळ स्वभाव दाखवणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं राज सांगतो.
आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी व्यक्तिरेखा
राजच्या मते, त्याने यापूर्वी साकारलेल्या भूमिका अधिक भावनिक आणि गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामध्ये ग्रामीण बोली आणि साधी बॉडी लँग्वेज होती. मात्र जय खानोलकर ही व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी आहे. त्याची चाल, बोलणं, उभं राहण्याची ढब आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारे आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्यातला हा बदल निश्चितच आवडेल, असा विश्वास राज व्यक्त करतो.
प्रोमोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांची निवड, संकल्पना आणि जय खानोलकरची दमदार एंट्री यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. “स्वामींची इच्छा” हा संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून रिक्षावर लिहिलेलं “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्यही लोकांना भावलं आहे.
१६ मार्चपासून झी मराठीवर नवी कहाणी
मेहनत, शिस्त आणि भावनांचा संगम असलेली जय खानोलकरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल. ‘सनई चौघडे’ ही नवी मालिका १६ मार्चपासून दररोज रात्री ८.३० वाजता फक्त झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
