‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाने पूर्ण केले गौरवशाली पन्नास दिवस

प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आठव्या आठवड्यातही थिएटरमध्ये गर्दी

मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवणारा झी स्टुडिओजसनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित, तसेच केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाने आपला गौरवशाली पन्नासावा दिवस पूर्ण केला आहे. आठव्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत असून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, जालना आणि जळगाव यांसारख्या शहरांमध्ये चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कायम आहे. भावनिक आणि मनोरंजक क्षणांनी सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्याची लोकप्रियता अजूनही टिकून आहे.

निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची दाद

चित्रपटातील निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध, संवादातील सहजता आणि अभिनयातील नैसर्गिकता यामुळे चित्रपटाला वेगळी रंगत प्राप्त झाली आहे. त्यांच्या बहारदार अभिनयामुळे प्रेक्षकांना या कथेशी भावनिक नाळ जोडता आली असून अनेकांनी चित्रपट पाहताना हसत-हसत आणि काही प्रसंगांमध्ये भावूक होत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळेच हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहे.

“बाई घर चालवू शकते तर चित्रपटही चालवू शकते” – केदार शिंदे

चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, “‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाचा गौरवशाली ५० वा दिवस साजरा होत आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. माझं नेहमी एकच म्हणणं असतं की, बाई जर घर चालवू शकते तर नक्कीच चित्रपटही चालवू शकते. स्त्रीप्रधान चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता वेगळा विषय मांडण्याचा हा प्रयत्न होता. सासू-सुनेच्या नात्याबद्दलच्या भावना नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना प्रेक्षकांकडून सुखद प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी प्रेक्षकांचा कायम ऋणी आहे.”

प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे यशाचा आनंद – बवेश जानवलेकर

या यशाबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेला प्रतिसाद अत्यंत समाधानकारक आहे. भावनिक आशय आणि मनोरंजनाची जोड असलेल्या कलाकृती प्रेक्षकांना नेहमीच आवडतात, हे या चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सलग आठ आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करत पन्नास दिवसांचा टप्पा गाठणे हा आमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा क्षण आहे.

दमदार टीमने उभा केला यशाचा प्रवास

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिले असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे.

भावनिक नातेसंबंध, हलकाफुलका विनोद आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आशय यामुळे ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Leave a comment