‘फुला’तून उलगडणार मुरळीच्या आयुष्याची संघर्षमय कथा

मराठी मातीतल्या लोकपरंपरा, लोककला आणि त्यामागील वास्तव जीवनातील संघर्ष यांचे चित्रण करणारा ‘फुला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाघ्या-मुरळी परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटातून एका निरागस मुलीची वेदनादायी आणि संघर्षमय कहाणी मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. हा चित्रपट १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना ग्रामीण संस्कृतीचा आणि वास्तवाचा वेगळा अनुभव देणार आहे.

जेजुरीत खंडेरायाच्या साक्षीने पोस्टर लाँच

चित्रपटाचे पोस्टर नुकतेच जेजुरी येथे खंडेरायाच्या साक्षीने लाँच करण्यात आले. वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. जेजुरीसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळी पोस्टर लाँच झाल्यामुळे चित्रपटाच्या विषयाला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे.

निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी

पै. अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जावीर यांनी केले असून पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. ग्रामीण जीवनाशी घट्ट नाळ असलेल्या या कथेला वास्तववादी पद्धतीने पडद्यावर आणण्याचा प्रयत्न या टीमने केला आहे.

संगीत, गीत आणि तांत्रिक बाजू

चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांनी केले आहे. ते सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील विशेष टप्पा ठरणार आहे. गीतलेखन रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांनी केले आहे. तर अमर देवकर यांनी सर्जनशील दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन प्रताप जोशी, कला दिग्दर्शन अतुल लोखंडे आणि संकलन राहुल प्रजापती यांनी केले आहे. वेशभूषा कोमल जावीर आणि अक्षता पाटील, तर रंगभूषा समाधान भोरे यांनी केली आहे.

गायनात नामवंत गायकांचा सहभाग

चित्रपटातील गाण्यांना अनेक नामवंत गायकांचा आवाज लाभला आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली इंगवले, वैष्णवी अदोडे आणि आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. त्यामुळे चित्रपटात लोकसंगीताचा आणि पारंपरिक शैलीचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.

नव्या दमाच्या कलाकारांची फळी

या चित्रपटात प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट आणि शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण आणि चित्रपटाची टीम ही सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील असून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहभागामुळे चित्रपटाला अस्सल ग्रामीण रंग मिळाला आहे.

मुरळी परंपरेतील स्त्रीच्या संघर्षाची कहाणी

‘फुला’ ही कथा एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीच्या आयुष्याभोवती फिरते. तमाशा फड, जागरण-गोंधळ यांसारख्या पारंपरिक लोककला आणि संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट उलगडते. या परंपरेत अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या आयुष्यातील संघर्ष, वेदना आणि समाजातील त्यांची स्थिती यांचे वास्तव चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे.

लोककलेच्या माध्यमातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी सांगितले की, ‘फुला’ हा केवळ एका मुलीची शोकांतिका नाही, तर महाराष्ट्राच्या लोकपरंपरांमध्ये अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्वाचा जिवंत दस्तावेज आहे. मुरळी परंपरेत अनेक स्त्रियांना त्यांची स्वप्ने, हक्क आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळत नाही. समाज त्यांच्या कलेचा आनंद घेतो, मात्र त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही. या वास्तवाचे प्रामाणिक चित्रण करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

१७ एप्रिलपासून चित्रपटगृहात

लोकपरंपरा, संघर्ष आणि स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न मांडणारा ‘फुला’ हा चित्रपट १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण संस्कृतीचा आणि वास्तवाचा वेगळा पैलू उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक विचार करायला लावणारा अनुभव देईल.

Leave a comment