
स्टेजवर उभा राहून सलग दोन तास केवळ बोलण्याच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणं हे काही सोपं काम नाही. पण स्टँडअप कॉमेडीच्या या अनोख्या कलेतून अनेक कलाकार आज प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. अशाच कलाकारांमध्ये सध्या वेगळं स्थान निर्माण केलेलं नाव म्हणजे स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे. आपल्या खास शैलीतून आणि अचूक टायमिंगमधून प्रेक्षकांना हसवणारे मंदार भिडे आता संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कॉर्पोरेट नोकरी सोडून स्टँडअप कॉमेडीचा प्रवास
मंदार भिडे यांनी काही वर्षांपूर्वी मोठ्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून पूर्णवेळ स्टँडअप कॉमेडी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सुरुवातीला छोट्या-मोठ्या स्टेजवरून सादरीकरण करत त्यांनी आपल्या विनोदाच्या शैलीतून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या विनोदात दैनंदिन आयुष्यातील निरीक्षणं, साधे पण नेमके संवाद आणि प्रसंगांची रंगतदार मांडणी असल्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्याशी लगेच नातं जोडता येतं.
अचूक टायमिंग आणि क्लीन कॉमेडीची खासियत

मंदार भिडे यांच्या कॉमेडीची खासियत म्हणजे त्यांचं अचूक टायमिंग आणि ‘क्लीन कॉमेडी’ची शैली. त्यांच्या कार्यक्रमात अगदी लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळेच मनमोकळेपणाने हसू शकतात. कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर न वापरता फक्त प्रसंग आणि निरीक्षणांच्या माध्यमातून हसवणं ही त्यांची ताकद मानली जाते. त्यामुळे त्यांच्या शोला कुटुंबासोबत येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी असते.
महाराष्ट्रातील विविध शहरांत भेटणार प्रेक्षकांना
आपल्या महाराष्ट्र टूरबद्दल बोलताना मंदार भिडे सांगतात की, आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी परफॉर्म केलं आहे, मात्र महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जाऊन तिथल्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटणं हा अनुभव नक्कीच वेगळा असणार आहे. महाराष्ट्रात दर बारा कोसावर भाषा बदलते, त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या प्रेक्षकांसमोर स्टँडअप सादर करणं हे तितकंच आव्हानात्मक आणि रोमांचक आहे.
स्टँडअप फॉरमॅट अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
मंदार यांच्या मते, स्टँडअप कॉमेडी हा प्रकार अजूनही अनेकांना नवीन वाटतो. त्यामुळे कुटुंबासोबत येऊन हा कार्यक्रम पाहावा आणि मोठ्या पिढीलाही या फॉरमॅटची ओळख व्हावी, हा त्यांच्या महाराष्ट्र टूरमागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. प्रेक्षकांना मनमोकळं हसायला मिळावं आणि एक हलकाफुलका अनुभव घेता यावा, यासाठी ते हा टूर करत आहेत.
लवकरच जाहीर होणार शहरांची यादी
मंदार भिडे यांची महाराष्ट्र टूर लवकरच सुरू होणार असून या टूरमध्ये राज्यातील विविध शहरांमध्ये त्यांचे शो आयोजित केले जाणार आहेत. कोकणापासून पुणे, नाशिक आणि इतर अनेक शहरांपर्यंत हा प्रवास होणार असल्याची चर्चा आहे. मात्र नेमकी तारीख आणि शहरांची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हास्याचा धबधबा अनुभवण्याची संधी
मंदार भिडे यांचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पसरलेले आहेत. त्यांच्या शोमध्ये उपस्थित राहून हास्याचा खळखळाट अनुभवण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाही त्यांच्या थेट स्टँडअप शोचा आनंद घेण्याची संधी मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढलेली दिसत आहे.
