मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

‘चिरायू’च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला असताना, गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा सन्मान सोहळा दिमाखात आणि उत्साहात पार पडला. मराठी कलाविश्वातील कलाकार, तंत्रज्ञ आणि मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यात नात्यांचा आणि कलेचा उत्सव साजरा करण्यात आला.

नववर्षाच्या स्वागतासाठी अभिनव उपक्रम

‘चिरायू’चे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी नव्या आणि सकारात्मक संदेश देणाऱ्या संकल्पनांमधून हा सोहळा साकारला जातो. यंदा या मंचावर ‘बीज गुढी’ ही अनोखी संकल्पना साकारण्यात आली. गोधड्यांमध्ये बियांचा वापर करून उभारलेली ही गुढी केवळ परंपरेचे प्रतीक न राहता निसर्गाशी नाते जपण्याचा संदेश देणारी ठरली. भविष्यात या बियांपासून झाडे उगवून हरित पर्यावरण घडवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. परंपरा आणि पर्यावरण यांची सांगड घालत हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

२००६ पासून सुरू असलेली परंपरा

२००६ पासून ‘शेलार मामा फाउंडेशन’तर्फे हा सन्मान सोहळा सातत्याने आयोजित केला जात आहे. पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकर्मींचा गौरव करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

पुरस्कार आणि गौरव सोहळा

यंदा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अभिनेता सुयश टिळक याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुरस्कृत ‘पर्यावरण स्नेही’ पुरस्कार देण्यात आला. पडद्यामागील कलावंतांमध्ये वेशभूषेसाठी राहुली नागरे, चित्रपट पोस्टर डिझायनिंगसाठी सचिन गुरव, आणि प्रसिद्धी-जनसंपर्क क्षेत्रासाठी गणेश गारगोटे यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय मेकअप आर्टिस्ट संतोष गिलबिले आणि डबिंग आर्टिस्ट तसेच अभिनेते मंगेश सातपुते यांनाही सन्मानित करण्यात आले.

तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये अमृता राव, सुजय डहाके, भार्गव जगताप, श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर आणि कबीर खंदारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

संस्थेचा उद्देश आणि सामाजिक संदेश

या सोहळ्यात शेलार मामा फाउंडेशनचे सुशांत शेलार यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, तसेच उपस्थित मान्यवर, कलाकार आणि तंत्रज्ञांचे आभार मानले. “समाजासाठी आणि कलेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ देऊन त्यांचा गौरव करणे हा आमचा हेतू आहे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच “मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच आपल्या जीवनात समृद्धी येते. त्यांच्या आयुष्यात आनंद फुलू दे,” अशी भावनाही त्यांनी व्यक्त करत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला दिग्दर्शक संजय जाधव, सचित पाटील, समित कक्कड, तसेच अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, श्रुती मराठे, गौरव घाटणेकर, स्मिता गोंदकर, पुष्कर जोग, योगेश शिरसाट, जान्हवी किल्लेदार, राधा सागर, अमृता राव, रणजित जोग, अक्षया गुरव, अक्षता नाईक, संजना पाटील, मंगेश सातपुते, अजित परब, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, मंदार चोळकर आदी कलाकारांनी हजेरी लावली.

अविस्मरणीय ठरलेला सोहळा

कला, संस्कृती आणि समाजसेवेचा संगम घडवणारा हा सोहळा कलाकारांचा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि रसिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे अविस्मरणीय ठरला. ‘चिरायू २०२६’ने पुन्हा एकदा मराठी कलाविश्वातील एकात्मता आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा केला.

Leave a comment