
‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार पाहता येईल अशी धमाल मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही ‘सुपर डुपर’ ठरला असून, एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या दमदार कलाकारांमुळे हा चित्रपट ‘पैसा वसूल’ ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे.
गमतीदार गोंधळाची कथा

ट्रेलरमध्ये एका फ्लॅटभोवती फिरणारा भन्नाट गोंधळ पाहायला मिळतो. एका बाजूला परंपरा जपणारं गावाकडचं कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारं शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि तिथून सुरू होतो तुफान राडा! एकच घर आणि दोन टोकाचे विचार असलेले लोक… त्यांच्या सवयी, जीवनशैली आणि विचारांतील तफावत यामुळे निर्माण होणारे मजेशीर प्रसंग ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात.
भावनिक स्पर्श असलेला संवाद
या सगळ्या गोंधळात निर्मिती सावंत यांच्या तोंडी असलेला “झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच” हा संवाद विशेष लक्ष वेधून घेतो. विनोद, नात्यांमधली ऊब आणि भावनिक क्षण यांचा सुंदर मेळ या चित्रपटात दिसून येतो.
दमदार कलाकारांची फळी

झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.
दिग्दर्शन आणि निर्मिती
या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे हे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. तर छायांकनाची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे.
दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा विश्वास
दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले की, “‘सुपर डुपर’ हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर नात्यांमधल्या गंमतीजमती आणि त्यामागची भावनिक बाजू दाखवणारा प्रवास आहे. दोन वेगळ्या कुटुंबांना एकाच घरात राहावं लागल्यावर निर्माण होणारे प्रसंग आम्ही हलक्या-फुलक्या शैलीत मांडले आहेत.”
तर झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, “हा चित्रपट प्रेक्षकांना हसवण्याबरोबरच भावनिक आणि विचार करायला लावणारा आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा चित्रपट आहे.”
प्रदर्शनाची तारीख
३ एप्रिलपासून ‘सुपर डुपर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा एक धमाल कौटुंबिक महासोहळा ठरणार आहे, यात शंका नाही.
