
‘आपला माणूस’ शिव ठाकरेचा दमदार अंदाज ‘मी धुरंधर’मध्ये झळकला
‘आपला माणूस’ म्हणून ओळख असलेला अभिनेता शिव ठाकरे नुकताच एका दमदार गाण्यासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरात गाजलेल्या ‘धुरंधर’ गाण्याच्या मराठी आवृत्ती असलेलं ‘मी धुरंधर’ हे गाणं सध्या सारेगम मराठीच्या यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे.
गाण्याचं आकर्षण ठरला शिवचा रुबाब
या गाण्याचं मुख्य आकर्षण म्हणजे शिव ठाकरेचा दमदार आणि रुबाबदार अंदाज. कुस्तीच्या आखाड्यातील त्याचा आत्मविश्वासपूर्ण लूक आणि ऊर्जा या गाण्यात प्रकर्षाने दिसून येते. मूळ गाण्याइतकंच त्याचं मराठी व्हर्जनही प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठी संस्कृतीचा ठसा

‘मी धुरंधर’ या गाण्यातून मराठी संस्कृतीचा प्रभावी ठसा उमटताना दिसतो. कुस्तीच्या आखाड्याची पार्श्वभूमी, मराठमोळा साज आणि पारंपरिक भाव यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. सारेगम मराठी नेहमीप्रमाणेच वेगळ्या आणि ट्रेंडिंग संकल्पनांद्वारे प्रेक्षकांना नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
शिव ठाकरेची भावना
या गाण्याबद्दल बोलताना शिव ठाकरे म्हणतो की, “ज्या गाण्याने जगभरात विक्रम केले, त्या ‘धुरंधर’च्या मराठी आवृत्तीचा भाग होण्याची संधी मिळाल्यावर थोडं दडपण आलं होतं. पण या गाण्याला मराठमोळा ट्विस्ट देण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. कुस्तीच्या आखाड्यात आपली संस्कृती जपत हे गाणं शूट करताना अंगावर शहारे आले. हे गाणं करणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
सोशल मीडियावर धुमाकूळ
सध्या ‘मी धुरंधर’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत असून प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठी प्रेक्षकांसाठी खास काहीतरी देण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला असून तो यशस्वी ठरल्याचं स्पष्ट दिसत आहे.
