दिल्लीतील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळा अभिजीत नलावडे ठरला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता

दिल्लीमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आरवली फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी कलाविश्वासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. एका मराठमोळ्या युवा अभिनेत्याने हिंदी चित्रपटासाठी उत्कृष्ट कामगिरी करत थेट राजधानीत मराठीचा झेंडा फडकावला आहे.

‘द मशरूमस’मधील अभिनयासाठी अभिजीतचा सन्मान

श्रीजा बरुआ दिग्दर्शित ‘द मशरूमस’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी अभिजीत नलावडे याला ‘सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. संयमित, सूक्ष्म आणि वास्तवदर्शी अभिनयामुळे त्याने परीक्षकांसह प्रेक्षकांचीही मनं जिंकली. विशेष म्हणजे ही अभिजीतची पहिलीच फिल्म असूनही त्याने आपली ठसठशीत छाप पाडली.

अनुष्का कौशिक ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

या चित्रपटात अभिजीतसोबत अभिनेत्री अनुष्का कौशिक हिनेही प्रभावी भूमिका साकारली आहे. ‘महाराणी’, ‘लस्ट स्टोरीज 2’, ‘पटना शुक्ला’ आणि ‘उजडा चमन’ यांसारख्या प्रोजेक्ट्समधून ओळख निर्माण केलेली अनुष्का या चित्रपटात एका वेगळ्या रेट्रो लूकमध्ये प्रेक्षकांना भावली आणि तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला.

600 चित्रपटांमधून निवड; वर्ल्ड प्रीमियरला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरवली फिल्म फेस्टिव्हलमध्ये तब्बल 600 चित्रपटांमधून ‘द मशरूमस’ची निवड करण्यात आली होती. दिल्लीत झालेल्या या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियर शोला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित रसिकांनी कलाकारांच्या अभिनयाचे जोरदार कौतुक केले, तर परीक्षकांनीही चित्रपटाच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.

अहिल्यानगरच्या कर्जतचा अभिजीत; रंगभूमीपासून मोठ्या पडद्यापर्यंत प्रवास

मूळचा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतचा असलेला अभिजीत नलावडे सध्या मुंबईत सक्रिय असून हिंदी रंगभूमीवर त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. नाटकांमधून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर त्याने मोठ्या पडद्यावरही प्रभावी पदार्पण केले आहे.

फेस्टिव्हलमध्ये खास मुलाखत; टीमची पुढची झेप अमेरिकेत

चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर अभिजीत नलावडे आणि अनुष्का कौशिक या जोडीची फेस्टिव्हलमध्ये विशेष मुलाखत घेण्यात आली. याचवेळी ‘द मशरूमस’ टीमने आणखी एक आनंदाची बातमी दिली—या चित्रपटाची निवड अमेरिकेतील प्रतिष्ठित USA Film Festival साठीही करण्यात आली आहे.

दिल्लीतील यशाने कलाकार भारावले

आरवली आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेल्या या उत्साही प्रतिसादामुळे संपूर्ण टीम आनंदित झाली असून, या यशाने अभिजीत नलावडेच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

बाईट्स

अभिजीत नलावडे – सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता
अनुष्का कौशिक – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
डॉ. अवनीश राजवंशी – संचालक, आरवली फिल्म फेस्टिव्हल

Leave a comment