
स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही लोकप्रिय मालिका सध्या अत्यंत रंजक टप्प्यावर पोहोचली आहे. कथानकात नव्या वळणाची भर घालत मालिकेत लवकरच एका चिमुकल्या पाहुणीची एण्ट्री होणार आहे. प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी बालकलाकार तक्षा शेट्टी ‘जुई’ या भूमिकेतून मालिकेत प्रवेश करत आहे.
छोट्या सावित्रीच्या भूमिकेतून मिळालेलं प्रेम
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत तक्षाने आपल्या निरागस आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्या भूमिकेमुळे तिला भरभरून प्रेम मिळालं आणि आता ती पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
जुईची भावस्पर्शी कथा

मालिकेत तक्षा साकारणारी ‘जुई’ ही गरीब घरातील, पण अत्यंत चुणचुणीत आणि हुशार मुलगी आहे. तिच्या पालकांनी शिक्षणासाठी तिला मुंबईत मावशीकडे पाठवलं असलं तरी, मावशी तिला शाळेत न पाठवता सिग्नलवर गजरे, साबण यांसारख्या वस्तू विकायला लावते. या कठीण परिस्थितीतही जुई तिच्या निरागस स्वभावाने आणि व्यवहारिक हुशारीने प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरी जाते.
फोटोग्राफिक मेमरी आणि सर्जनशीलता

जुईची खासियत म्हणजे तिची फोटोग्राफिक मेमरी. ती जे काही पाहते ते अचूक लक्षात ठेवते. साध्या कागदापासूनही काहीतरी वेगळं तयार करण्याची कला तिच्यात आहे. तिची ही सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता कथानकात वेगळं आकर्षण निर्माण करते.
नंदिनीच्या आयुष्यात नवं वळण
योगायोगाने जुईची भेट नंदिनीशी होते आणि याच भेटीमुळे नंदिनीच्या आयुष्यात नवं वळण येण्याची शक्यता निर्माण होते. सध्या नंदिनी अनेक उलथापालथींमधून जात असताना जुईसोबतचा तिचा संबंध तिच्या आयुष्याला कोणती दिशा देईल, याची उत्सुकता वाढली आहे.
पाहा मालिका रोज सायंकाळी
या नव्या घडामोडी अनुभवण्यासाठी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येईल.
