म्हणून नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडतं – सई ताम्हणकर

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारताना दिसते. विविध विषय, नवे प्रयोग आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा यांमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आता सई लवकरच ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटातून एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केले असून, नव्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव सईने नुकताच शेअर केला आहे. नव्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना मिळणाऱ्या अनुभवांविषयी बोलताना तिने आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

सई म्हणाली, “नवीन व्यक्तीसोबत आणि त्यांच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी काम करणं नेहमीच खास असतं. अशा वेळी मला माझ्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण होते. जेव्हा मी या इंडस्ट्रीत नवीन होते, तेव्हा अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. त्यांच्यामुळेच मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. आज जर मी एखाद्या नव्या दिग्दर्शकाला किंवा कलाकाराला तीच सकारात्मक भावना देऊ शकत असेन, तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आणि समाधान देणारं असतं.”

ती पुढे म्हणाली, “मला नेहमी वेगवेगळ्या कार्यपद्धती असलेल्या दिग्दर्शकांसोबत काम करायला आवडतं. प्रत्येक दिग्दर्शकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे नवीन वातावरण, नवीन विचारसरणी आणि वेगळ्या प्रकारचं काम करण्याची संधी मिळते. एखाद्याच्या पहिल्याच आणि त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाचा भाग होणं ही खूप समृद्ध करणारी भावना असते. नव्या प्रतिभेला आणि नव्या आवाजांना पाठिंबा देण्यात एक वेगळंच समाधान मिळतं.”

सईने आजवर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. ‘मटका किंग’मध्ये नागराज मंजुळे, ‘डब्बा कार्टेल’मध्ये हितेश भाटिया, ‘अग्नी’मध्ये राहुल ढोलकिया, ‘ग्राउंड झिरो’मध्ये तेजस प्रभा विजय देवोस्कर आणि ‘मिमी’मध्ये लक्ष्मण उतेकर यांच्यासारख्या दिग्दर्शकांसोबत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सईच्या अभिनयातील सातत्य, भूमिकांची वैविध्यता आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला दिलेला वेगळा स्पर्श यामुळे ती आजही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे. ‘तुंबाडची मंजुळा’मधील तिची नवी भूमिका आणि नवोदित दिग्दर्शकासोबतची ही नवी जुळवाजुळव प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे. आगामी काळातही सई अनेक दर्जेदार आणि वेगळ्या कथांचा भाग होणार असल्याची चर्चा आहे.

Leave a comment