रोहित परशुरामचा नवा प्रवास; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत साकारणार ‘शंकर’ची दमदार भूमिका

‘अप्पी आमची कलेक्टर’नंतर झी मराठीवर पुनरागमन

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अर्जुन या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहित परशुराम आता पुन्हा एकदा झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेत तो ‘शंकर’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार असून या व्यक्तिरेखेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोल्हापूरच्या मातीतला रांगडा शंकर

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “मी शंकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. गावच्या सावकार मातोश्रींचा मुलगा, व्यायामाची आवड असलेला आणि कोल्हापूरच्या मातीत वाढलेला रांगडा तरुण. एका बिनधास्त आणि मनमोकळ्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या आयुष्यात घडणारे बदल, प्रेम आणि आई यांच्यामध्ये समतोल साधताना होणारी त्याची गोड दमछाक आणि त्याचा भावनिक प्रवास या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे.”

ऑडिशनपासून मालिकेपर्यंतचा प्रवास

या भूमिकेची संधी कशी मिळाली याबद्दल सांगताना रोहितने एक खास आठवण शेअर केली. “मी ‘कमळी’ मालिकेच्या सेटवर आदित्यला भेटायला गेलो होतो. त्यावेळी दिग्दर्शक अनिकेत साने झी मराठीसाठी नवी मालिका करत असल्याचं समजलं. मी लगेच त्यांना भेटलो, ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक फेऱ्या, सीन वर्क आणि चर्चेनंतर मला ही भूमिका मिळाली. झी मराठीच्या कुटुंबात पुन्हा सहभागी होणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”

भूमिकेसाठी खास तयारी

‘शंकर’ साकारण्यासाठी रोहित विशेष मेहनत घेत आहे. कोल्हापुरी बोलीभाषा, लहेजा, शारीरिक बांधा आणि व्यक्तिरेखेची मानसिकता समजून घेण्यासाठी तो सातत्याने तयारी करत आहे.

“कोल्हापुरी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोय. भरपूर व्यायाम, योग्य आहार आणि नियमित दिनचर्या पाळतोय. स्क्रिप्टचं सखोल वाचन करत आहे, जेणेकरून शंकर अधिक प्रामाणिकपणे साकारता येईल,” असे तो सांगतो.

निसर्गरम्य वातावरणात रंगतंय चित्रीकरण

मालिकेचे चित्रीकरण मुंबईबाहेरील सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात सुरू आहे. हिरवाई, मोकळं वातावरण आणि गावाकडच्या जीवनशैलीमुळे कलाकारांना काम करताना वेगळी ऊर्जा मिळत असल्याचे रोहितने सांगितले.

“गावाकडचं वातावरण शंकरसारखी व्यक्तिरेखा जगण्यासाठी खूप मदत करतं. संपूर्ण टीमसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरत आहे,” असे तो म्हणाला.

निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याचा आनंद

मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल रोहित विशेष भावूक झाला आहे.

“निवेदिता सराफ यांच्या प्रोजेक्टमध्ये फक्त एका दृश्यात उभं राहायलाही मला आनंद झाला असता. इथे तर मी मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व, अभिनयातील सहजता आणि सकारात्मक ऊर्जा प्रेरणादायी आहे,” असे रोहितने सांगितले.

प्रेक्षकांच्या प्रेमाची अपेक्षा

‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अर्जुन या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता ‘शंकर’लाही तितकंच प्रेम मिळेल, असा विश्वास रोहितला आहे.

“साताऱ्याच्या मातीतला अर्जुन आणि कोल्हापूरच्या लाल मातीतला शंकर मला जणू भावंडांसारखे वाटतात. अर्जुननंतर आता शंकरच्या रूपात मी पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. त्यांनी जसं आतापर्यंत प्रेम दिलं, तसंच प्रेम आणि आशीर्वाद शंकरलाही मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे तो म्हणाला.

१५ जूनपासून भेटणार ‘कृष्णाईच्या लेकी’

स्त्रीशक्ती, स्वाभिमान आणि नात्यांचा भावनिक प्रवास उलगडणारी ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवी मालिका १५ जूनपासून दररोज सायंकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a comment