जागतिक संगीत दिन विशेष: ‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं – प्राप्ती रेडकर

संगीताचा वारसा घरातूनच मिळाला

झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील ‘सावली’ हे पात्र गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तिचा मधुर आवाज, संघर्षमय प्रवास आणि भावनिक कथा यामुळे सावलीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. जागतिक संगीत दिनानिमित्त सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने संगीताशी असलेल्या आपल्या नात्याविषयी आणि या भूमिकेमुळे मिळालेल्या अनुभवांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.

प्राप्ती सांगते, “माझे बाबा प्रवीण रेडकर हे गायक आहेत. ते लाईव्ह शोज करतात. त्यामुळे संगीत आणि गायनाची आवड मला लहानपणापासूनच होती. गावी असताना बाबा आणि काकांसोबत भजनाला जायचे, तिथे गाणी गायचे आणि आजही गाते. मात्र अभिनय क्षेत्रात आल्यामुळे गायनाकडे तितकं लक्ष देता आलं नाही.”

‘सावली’मुळे संगीताच्या आणखी जवळ गेले

सावली या व्यक्तिरेखेने प्राप्तीला संगीताशी पुन्हा नव्याने जोडले. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “सावली साकारताना मी संगीताच्या आणखी जवळ गेले आहे. कारण मालिकेत सावलीला जो आवाज दिला आहे तो गायिका केतकी माटेगावकरचा आहे आणि ती माझ्या आवडत्या गायिकांपैकी एक आहे. त्यामुळे या पात्राशी आणि तिच्या संगीतप्रवासाशी मी अधिक भावनिकरित्या जोडली गेले.”

‘माझे माहेर पंढरी २.०’ गाणं ठरलं खास

मालिकेतील ‘माझे माहेर पंढरी २.०’ हे गाणं सावलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर दाखवण्यात आलं आहे. सारंग आणि मेहेंदळे कुटुंबाला अनेक दिवसांपासून ऐकू येणारा आवाज ताराचा नसून सावलीचाच आहे, हे सत्य उघड होतं. या प्रसंगाचं चित्रीकरण करताना आलेल्या भावनिक अनुभवांविषयी प्राप्ती म्हणाली, “हे गाणं शूट करताना मी खरोखर रडत होते. सावलीने इतकं सहन केलं आणि आता तिला प्रेम करणारा नवरा मिळाला, ज्याने तिला तिची खरी ओळख आणि हक्काचं कौतुक मिळवून दिलं. त्या सर्व भावना अनुभवताना मला प्राप्ती म्हणूनही खूप वाईट वाटत होतं. हे गाणं माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे.”

‘संगीत म्हणजे आयुष्याची थेरपी’

जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना शुभेच्छा देताना प्राप्ती म्हणाली, “संगीत म्हणजे एक प्रकारची थेरपी आहे. ते माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतं. मी खूप आनंदी असताना गाणी ऐकते, उदास असताना किंवा राग आला तरी संगीताचीच साथ घेते. प्रत्येक मूडमध्ये संगीत माझ्यासोबत असतं आणि मी त्याच्याशी रिलेट करू शकते.”

दोन वर्षांनंतरही प्रेक्षकांचं प्रेम कायम

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी प्रेक्षकांचं प्रेम आजही तितकंच कायम आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्राप्ती म्हणाली, “मालिकेला दोन वर्षं झाली आहेत, पण प्रेक्षकांचं प्रेम आजही पहिल्या दिवसाइतकंच आहे. हे प्रेम असंच कायम राहू द्या आणि सावलीवर असाच भरभरून आशीर्वाद ठेवा.”

तेव्हा पाहायला विसरू नका ‘सावळ्याची जणू सावली’, दररोज दुपारी १ वाजता, फक्त झी मराठीवर.

Leave a comment