
मुंबई : पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीचे वेध लागतात. विठ्ठलनामाच्या गजरात लाखो वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होत असताना आता अभिनेत्री रिंकू राजगुरूही आपल्या चाहत्यांसाठी एक खास भक्तिमय भेट घेऊन आली आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी रिंकूचे वारीतील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्या फोटोंमागे नेमकं काय सरप्राइज दडलं आहे, याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. आता त्या चर्चांवर पडदा पडला असून सारेगम मराठीच्या नव्या वारी विशेष गीतातून रिंकूचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘बाप विठुराया’मधून रिंकूचा नवा प्रवास
सारेगम मराठीच्या आगामी वारी स्पेशल गाण्याचं नाव ‘बाप विठुराया’ असून या गाण्यात रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. गाण्याची छोटी झलक सोशल मीडियावर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये या गीताविषयी उत्सुकता वाढली आहे. भक्तिरस, वारीची परंपरा आणि विठ्ठलावरील श्रद्धा यांचा सुंदर संगम या गाण्यात पाहायला मिळणार आहे.
अजय गोगावले यांच्या आवाजाची भक्तिमय जादू

‘बाप विठुराया’ या गीताला प्रसिद्ध गायक अजय गोगावले यांचा दमदार आणि भावपूर्ण आवाज लाभला आहे. भक्तिगीतांच्या सादरीकरणातील त्यांच्या खास शैलीमुळे या गीताला आणखी भावनिक उंची मिळाली आहे. अनेक वर्षांनंतर रिंकू आणि अजय गोगावले पुन्हा एकत्र काम करत असल्याने या गाण्याबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
‘वारी आणि माझं नातं अजून घट्ट झालं’ – रिंकू राजगुरू

या गाण्याविषयी बोलताना रिंकू राजगुरू म्हणाली, “माझं पहिलं अल्बम गीत विठ्ठलावर चित्रीत होत आहे, याचा मला खूप आनंद आहे. माझं आणि विठ्ठलाचं नातं खूप जुनं आहे. विठ्ठलावर माझी अपार श्रद्धा आहे. तो माझ्या प्रत्येक क्षणी माझ्यासोबत असतो. मी त्याच्याशी मनमोकळ्या गप्पाही मारते. विठ्ठल हा माझ्या आयुष्यातील अत्यंत हळवा आणि जवळचा भाग आहे. त्यामुळे हे गाणं करण्याची संधी मिळणं, हे त्याच्याच इच्छेने घडलं असावं असं मला वाटतं. आजवर मी कधीही अल्बम गीत केलं नव्हतं, कारण माझी काम निवडण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. पण हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. अजय गोगावले यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आणि सारेगम मराठीसोबतही काम करता आलं, याचाही आनंद आहे. माझं हे पहिलंच अल्बम गीत असल्यामुळे ते माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे. प्रेक्षकांनाही ते तितकंच आवडेल, अशी आशा आहे.”
रिंकूचा कधीही न पाहिलेला लुक

या गीतातून रिंकू राजगुरूचा आतापर्यंत कधीही न पाहिलेला, साधा, सात्त्विक आणि आकर्षक लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वारीची परंपरा, विठ्ठलभक्ती आणि मराठी संस्कृतीचं सौंदर्य या गाण्यातून अनुभवायला मिळणार असून रिंकूसाठीही हा अनुभव अत्यंत खास ठरला आहे.
आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला ‘बाप विठुराया’
रिंकू राजगुरूच्या पहिल्या अल्बम गीताची उत्सुकता आता अखेर संपली आहे. ११ जुलै रोजी ‘बाप विठुराया’ हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून विठ्ठलभक्तीचा हा सुरेल प्रवास रसिकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
