भारतीय लष्कराची साहसी कहाणी “फौजी” चित्रपटातून उलगडणार !

देशसेवा ज्याच्या रक्तात भिनली आहे पण केवळ शारीरिक अडचणींमुळे ज्याचे लष्करामध्ये भरती होण्याचे स्वप्न अधुरे राहिले अशा एका सामान्य मुलाच्या जिद्दीने आणि अफाट आत्मविश्वासाने मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे.

एनसीसीपासून सुरू झालेला प्रवास फौजी बांधवांचे महत्त्व घराघरांपर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न, नोटबंदी आणि कोरोनासारखी आव्हाने जवळच्या मित्राचा अपघाती मृत्यू आणि ऐन रिलीजच्या वेळी मार्गदर्शकावर आलेला आरोग्याचा प्रसंग ! या सर्व महाप्रचंड आव्हानांवर मात करत ‘फौजी’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे.

या संपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवासात नाथ विश्वनाथसाहेब यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने, आणि सुधीरदादा पाटसकर यांचे खंबीर नेतृत्व या मुळे फौजी या चित्रपटाला एक अभेद्य बळ मिळाले आहे. घनश्याम येडे यांना लहानपणापासूनच देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र ओढ होती. कॉलेजमध्ये असताना एनसीसीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी सैनिकांविषयीचा नितांत आदर जपला परंतु शारीरिक अडचणींमुळे त्यांना सैन्यात प्रत्यक्ष जाता आले नाही.

सैनिकांचे खरे महत्त्व आणि त्यांच्या त्यागाची गाथा प्रत्येकापर्यंत पोहोचवलीच पाहिजे या ज्वलंत विचारातून त्यांच्या डोक्यात ‘फौजी’ चित्रपटाचा विचार जन्मला ! या प्रवासात त्यांची भेट सुहास गरगडे यांच्याशी झाली. दोघांचीही परिस्थिती सामान्य, पण फौजींसाठी काहीतरी करण्याची जिद्द अफाट. मग बँका, पतसंस्था,सावकार यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करत चित्रपट उभा करण्याचे धाडस त्यांनी केले.

अनेक प्रयत्न करूनही चित्रपट पूर्ण करणे सोपे नव्हते. त्यात नोटबंदी पाठोपाठ आलेला कोरोना काळ कठीण ठरला. मग वासुदेव महाराज गरुड यांचे आशीर्वाद आणि सतीश नाझरकर, अशोक नाझ्रकर,गणेश गुंजाळ, डॉ. शंकर तळबे, सुनील गावडे, अशोक गाडे, प्रवीण बुरुंगे, राजेंद्र करणे, विष्णुपंत नेवाळे, शिवाजी दडस, कोंडीबा नलावडे ,जोतीबा घाडगे यांसारख्या सहकार्यांच्या बळावर चित्रपट हळूहळू पूर्णत्वास येऊ लागला.

चित्रपट अंतिम टप्प्यात असतानाच काळाने घाला घातला. चित्रपटातील प्रमुख पात्रांपैकी एक आणि जवळचा जिवलग मित्र सुहास गरगडे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या आघाताने चित्रपट अर्ध्यावरच लटकला आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकावर स्वतःचे घर ,जमीन गहाण ठेवण्याची वेळ आली.तरी पण खचून न जाता जिवलग मित्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा धाकटा भाऊ मयूर गरगडे याला त्याच्या जागी घेऊन मित्राला खरी श्रद्धांजली दिली,स्वार्थासाठी न जाता,स्वताला त्रास घेऊन,स्वतचेच नुकसान करून घेतले पण शब्द बदलला नाही.

पण चित्रपटाचे पुढे काय? मग ज्यांना घनश्याम यांनी आपले सर्वस्व आणि वडीलस्थान मानले, त्या नाथ विश्वनाथ साहेब यांनी घनशामसाठी “फौजी”यासारख्या सामाजिक चित्रपटाच्या पाठीशी उभे राहत आपले अमूल्य मार्गदर्शन व साथ दिली. साहेबांचे आशीर्वाद, त्यांची प्रेरणा आणि सहनिर्माती सौ. स्वप्नजा विश्वनाथ यांच्या रूपाने या कुटुंबाने फौजी चित्रपटासाठी आपले दरवाजे सताड उघडे केले. या दोन्ही महान व्यक्तींच्या खंबीर साथीमुळे चित्रपट यशस्वीपणे उभा राहण्यास मोठी मदत झाली.सेन्सॉरचे टप्पे पार करून चित्रपटाची रिलीज तारीख ठरली.

मात्र रिलीजची तारीख जवळ येत असताना नाथ विश्वनाथ साहेब मृत्यूच्या दाढेत सापडले. अशा बिकट प्रसंगी त्यांच्या मुलीने स्वतःच्या शरीराचा भाग देऊन साहेबांना जीवदान दिले. साहेबांच्या समाधानासाठी चित्रपटाची रिलीज तारीख पुढे ढकलली नाही.ज्या दिवशी चित्रपट रिलीज झाला, त्या दिवशी चित्रपटगृहात काय होते याकडे कोणाचेच लक्ष नव्हते; कारण सर्वांसाठी विश्वनाथ साहेब वाचणे सर्वात महत्त्वाचे होते. पण घनश्याम येडे यांच्या मनात असलेला ठाम विश्वास होता “साहेब जगले तर असे अनेक चित्रपट मी पुन्हा उभे करू शकेन, हाच त्यांचा विश्वास आज खरा ठरला.

अशा अटीतटीच्या प्रसंगी चित्रपटात एकलव्य प्रतिष्ठान,सुधीरदादा पाटसकर हे ‘प्रस्तुतकर्ता’ म्हणून अत्यंत समर्थपणे पुढे आले. चित्रपट पाहिल्यानंतर घनश्याम येडे यांच्यामधील अफाट देशप्रेम, त्यांचा साधेपणा आणि प्रामाणिक स्वभाव सुधीरदादांच्या मनाला भिडला. हा चित्रपट घराघरांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, या भावनेने त्यांनी फौजीसाठी हवी ती ताकद लावण्याचा आणि आपला संपूर्ण पाठिंबा देण्याचा शब्द दिला.

सुधीरदादांच्या या दिलदार आणि खंबीर भूमिकेमुळे या प्रवासाला एक भक्कम आकार मिळाला. आणि आज विश्वनाथ साहेबां आणि सुधीरदादा पाटसकर यांच्या सारख्या दिलदार व्यक्तींच्या साथीमुळे हा चित्रपट मोठ्या दिमाखात प्रेक्षकांच्या भेटीला आता खरा येतोय.

दिग्गजांची फौज आणि संगीताची मेजवानी या चित्रपटात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, शाहबाज खान, टीनू वर्मा, संजय खापरे, नागेश भोसले, हंसराज जगताप, अश्विनी कासार आणि खुद्द घनश्याम येडे यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

शान, वैशाली माडे, बेला शेंडे, आदर्श शिंदे, उर्मिला धनगर आणि कविता राम यांच्या सुरेल आवाजाने या चित्रपटाला आणखी उंची प्राप्त करून दिली आहे. “फौजी” हा केवळ एक चित्रपट नसून, मराठी सिनेसृष्टीतील आजवरचा सैनिकांच्या व्यथा सांगणारा मराठीतील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट प्रत्येकाने आवर्जून पहावा असाच आहे. फौजी 27 नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment