
साईबाबांचा श्रद्धा, प्रेम आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचवण्याचा संकल्प; शिर्डीतून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात
शिर्डी : साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीनगरीत आगामी ‘कृपा साई’ (KRIPA SAI) या चित्रपटाच्या पोस्टरचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. साईबाबांप्रती असलेली श्रद्धा, भक्ती, प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश चित्रपटाच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या निर्मितीमागील उद्देश आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू अशा पाच भाषांमध्ये साकारला जाणार असून, जगभर प्रदर्शित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिर्डीत आयोजित या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि निर्मिती पथकातील सदस्यांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे साईबाबांच्या काळातील बैजामाई यांच्या तिसऱ्या पिढीतील प्रतिनिधींची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
या सोहळ्याला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष संदीप शिंदे, समाजसेवक व उद्योजक सचिन हावळे पाटील, शिर्डीचे उपसरपंच तथा उद्योजक वीरेश चौधरी पाटील, उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील, डॉ. आशुतोष संतोष मैड आणि दर्शन लाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चित्रपटसृष्टीतील अभिनेता व निर्माता प्रतुष मिश्रा, अभिनेता सुनील मणि, अभिनेता व लाइन प्रोड्युसर विष्णू चौधरी, तसेच अभिनेते विशाल, पांडुरंग भारती, प्रकाश रणधीर आणि भगवान राऊत यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
‘सबका मालिक एक’ हा संदेश जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न
‘कृपा साई’ चित्रपटाचे दिग्दर्शन जय प्रकाश मिश्रा (कलमधारी) करणार आहेत. चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, साईबाबा हे त्यांच्यासाठी केवळ श्रद्धेचे स्थान नसून विश्वास, प्रेम आणि मानवतेचे प्रतीक आहेत. ‘कृपा साई’ हा केवळ चित्रपट नसून साईबाबांच्या चरणी केलेले भावनिक समर्पण आहे.
साईबाबांचा ‘सबका मालिक एक’ हा संदेश कोणत्याही एका धर्म, जात किंवा भाषेपुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवतेसाठी आहे. जीवनात आशा, विश्वास आणि आधाराची गरज असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला जाणार असल्याचे दिग्दर्शकांनी स्पष्ट केले.
शिर्डीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चित्रीकरण
‘कृपा साई’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच शिर्डीतून सुरुवात करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर कथानकाच्या आवश्यकतेनुसार महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तसेच देशातील इतर काही महत्त्वाच्या स्थळांवर चित्रीकरण होण्याची शक्यता आहे.
ओम साई भगवान आणि स्मिता पांडेय प्रोडक्शन यांच्या निर्मितीअंतर्गत हा चित्रपट साकारला जाणार असून, स्मिता पांडेय प्रोडक्शन हे चित्रपटाचे निर्मितीगृह आहे.
साईबाबांचे भक्त केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आहेत. त्यामुळे विविध भाषांमधून हा चित्रपट सादर करून साईबाबांची शिकवण अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
पाच भाषांमध्ये निर्मिती आणि जागतिक प्रदर्शनाचे नियोजन असलेल्या ‘कृपा साई’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, शिर्डीत झालेल्या पोस्टर अनावरणामुळे चित्रपटाच्या निर्मितीप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
