
-
येऊदे कितीही अडचणीचं वारं… ‘मी जिंकून घेईन सारं’ नवी मालिका कलर्स मराठीवर

भारती आचरेकर दिसणार मराठी मालिकेत पहिल्यांदाच!
असं म्हणतात की रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली नाती अनेकदा अधिक जिव्हाळ्याची असतात. ती आपल्यासाठी कोणतेही वादळ झेलतात, आपल्यामागे खंबीरपणे उभी राहतात आणि वेळ पडल्यास जीव ओवाळून टाकायलाही मागे पुढे पाहत नाहीत. याच भावनिक धाग्यावर आधारित आहे कलर्स मराठीवरील नवी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’. या मालिकेतील छवी देखील अशाच नात्यांची किंमत ओळखणारी मुलगी आहे. रक्ताचं नातं नसतानाही तिच्यासाठी बाई-आजी म्हणजे देवासमान आहेत. राजगुरू परिवारासाठी आणि बाई-आजींसाठी छवी काहीही करायला तयार आहे. मात्र या कुटुंबाचं रक्षण करताना तिच्यासमोर अनेक अडथळे उभे राहणार आहेत. या संकटांना ती कशी सामोरी जाणार आणि नात्यांची ही लढाई कशी जिंकणार, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
प्रोमोने वाढवली उत्सुकता
नुकताच या मालिकेचा प्रभावी प्रोमो प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रोमोमधील सर्वात मोठं आकर्षण ठरतात त्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर. त्या ‘बाई-आजी’ या अत्यंत वेगळ्या, ठाम आणि प्रभावी भूमिकेत प्रथमच मराठी मालिकेत दिसणार आहेत. कमी संवादांतूनही त्यांची स्क्रीन प्रेझेन्स, लाघवी व्यक्तिमत्त्व आणि करारी बाणा ठसठशीतपणे जाणवतो.
कलाकारांची दमदार फळी
या मालिकेत अत्यंत गोड, सोज्वळ आणि मनमोकळ्या स्वभावाची छवी ही भूमिका जान्हवी तांबट साकारणार आहे. तर शांभवीची भूमिका अमृता फडके साकारत आहेत. याशिवाय वत्सला – वंदना वाकनीस, अनिकेत – संचीत चौधरी, साकेत – अमित रेखी आणि बेबी आत्या – दिशा दानडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
राजगुरू परिवाराची कथा
राजगुरू परिवाराचा डोलारा बाई-आजी सांभाळत आहेत. त्या कुटुंबाच्या कर्ताधर्ता आहेत. जशा जिजाऊ शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, तशाच बाई-आजी आपल्या मुलाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. एका अपघातात मुलगा आणि सून अकाली गेले आणि त्या दिवसापासून बाई-आजींनी आपल्या नातवंडांना साकेत आणि अनिकेत यांना आईची माया दिली. याच राजगुरू परिवारात लहानाची मोठी झाली छवी.
सुंदर आणि सोज्वळ या पारंपरिक चौकटीत न बसणारी ही इम्परफेक्ट छवी स्वभावाने बडबडी, थोडी अति उत्साही पण तितकीच हुशार आहे. प्रत्येक नात्यात मनापासून जीव ओतणारी ही मुलगी बाई-आजींवर प्रचंड प्रेम करते. बाई-आजींचा रुबाब आणि छवीची त्यांच्यावर असलेली निष्ठा क्षणोक्षणी जाणवते.
शांभवीचा सूड आणि निर्माण होणारा संघर्ष
एकीकडे बाई-आजी आणि छवीचं सावलीसारखं नातं आहे, तर दुसरीकडे या परिवारावर वाकडी नजर आहे ती शांभवीची. अत्यंत चाणाक्ष, धूर्त आणि सूडभावनेने पेटलेली शांभवी राजगुरू परिवाराला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखत आहे. तिच्या मनात साचलेला भूतकाळ आणि सूडाची भावना या कुटुंबावर मोठं संकट आणणार आहे. शांभवीचा डाव छवीला कळणार का? आणि कितीही संकटं आली तरी छवी हे सर्व खंबीरपणे कसं निभावून नेणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.
बाई-आजी आणि छवीचं विश्वासाचं नातं
प्रोमोमध्ये बाई-आजी आणि छवीमधील अतूट विश्वासाचं नातं ठळकपणे दिसून येतं. आयुष्याच्या निर्णायक क्षणी बाई-आजी प्रत्येक निर्णयासाठी छवीच्या ठाम व्यक्तिमत्त्वावर आणि विचारांवर विसंबून असतात. छवीवर असलेला बाई-आजींचा अढळ विश्वास आणि तिच्याकडून मिळणारा आधार हे या नात्याचं सार आहे.
भारती आचरेकर यांची प्रतिक्रिया
या भूमिकेविषयी बोलताना भारती आचरेकर म्हणतात, “बाई-आजी ही केवळ पारंपरिक चौकटीतील आजी नाही, तर उदारमतवादी आणि मोकळ्या विचारांची स्त्री आहे. काळानुसार बदल स्वीकारणारी, आजच्या पिढीच्या विचारांशी सहज जुळवून घेणारी आणि स्निकर घालून आत्मविश्वासाने वावरणारी ही ‘कूल’ आजी आहे. नातवंडांना समजून घेणारी, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं जपणारी पण घराचा कणा असलेली ही स्त्री आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीनंतर मी पहिल्यांदाच मराठी मालिकेत इतक्या मध्यवर्ती भूमिकेत काम करते आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा एक नवा आणि उत्सुकतेचा टप्पा आहे.”
मालिकेविषयी सतीश राजवाडे यांचे मत
कलर्स मराठीचे Executive Vice President, Marathi Cluster सतीश राजवाडे म्हणाले, “आमचा प्रयत्न नेहमीच दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीची कथानकं प्रेक्षकांसमोर आणण्याचा असतो. बऱ्याच काळानंतर आम्ही अशी फिक्शन मालिका घेऊन येत आहोत जी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावी अशी आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ ही जिद्द, नात्यांची गुंतागुंत आणि मूल्यांची परंपरा यांचा संगम असलेली कथा आहे. छवीच्या आयुष्यात बाई-आजींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांचा समृद्ध अनुभव या मालिकेचं सर्वात मोठं बळ ठरणार आहे.”
कथेत आणखी रंग भरणारी बबी आत्या
या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावणारी बबी आत्या देखील टीझरमध्ये दिसते. तिची उपस्थिती कथेला आणखी धार देणार आहे. नात्यांमधील ताणतणाव, घरातील संघर्ष आणि एका ठाम स्त्रीचा आवाज याची झलक देणारा हा प्रोमो प्रेक्षकांना अनेक प्रश्नांसह सोडून जातो.
प्रसारणाची वेळ
“येऊदे कितीही अडचणीचं वारं… मी जिंकून घेईन सारं!”
ही नवी मालिका १६ मार्चपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. -
“फुला” चित्रपटातून अस्सल संगीताची मेजवानी

संगीतमय “फुला” चित्रपटाचा पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न
वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी “फुला” या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अस्सल लोकसंगीताची मेजवानी देणाऱ्या या चित्रपटात बऱ्याच काळानंतर सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट साकारला असून त्यांच्या या प्रयत्नामुळे एक वेगळा आणि आशयघन विषय मोठ्या पडद्यावर येणार आहे.
पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा उत्साहात

ज्येष्ठ पत्रकार तसेच एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे सीनियर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत “फुला” या चित्रपटाचा पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यास चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. तसेच प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक राज सोडा यांनीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली.
चित्रपटाच्या निर्मितीमागील टीम
पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी “फुला” या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर यांचे आहे, तर पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांनी केले असून सर्जनशील दिग्दर्शन अमर देवकर यांनी केले आहे. गीतलेखन रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांचे आहे. छायांकन प्रताप जोशी, कला दिग्दर्शन अतुल लोखंडे, संकलन राहुल प्रजापती यांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे असून वेशभूषा कोमल जावीर आणि अक्षता पाटील यांनी केली आहे. रंगभूषेची जबाबदारी समाधान भोरे यांनी सांभाळली आहे.
गाण्यांना लाभलेले दिग्गज गायकांचे आवाज
या चित्रपटातील गाण्यांना वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे आणि आकाश नवगिरे यांनी आपले स्वर दिले आहेत. पारंपरिक लोकसंगीताचा साज लाभलेल्या या गाण्यांमुळे चित्रपटाच्या कथेला एक वेगळी भावनिक उंची मिळणार आहे.
राजीव खांडेकर यांचे मत
यावेळी बोलताना राजीव खांडेकर म्हणाले की, आपल्या सर्वांना आपल्या लोककला आणि लोकपरंपरांचा अभिमान असतो. ज्या कलाकारांचे आपण कौतुक करतो, त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातील वास्तव कसे असते, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. नव्या दमाच्या तरुणांनी एकत्र येऊन तयार केलेला हा चित्रपट वाघ्या-मुरळींच्या आयुष्यावर आधारित असून प्रेक्षकांनी अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला नक्कीच साथ द्यावी.
मुरळीच्या आयुष्याची संघर्षमय कथा
“फुला” ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ अशा पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही कथा महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. या चित्रपटात कान्हा तुझी बासरी, माझा राजा मल्हारी, आसरा तू माझ्या जीवाचा, कुंकू कोरलं कपाळी, मुरळी झाले मी गं बाई, कपाळी सजलं बाशिंग आणि डर्बीचा थरार अशी सात गाणी आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या या गाण्यांमधून वाघ्या-मुरळीच्या लोकसंस्कृतीचे चित्रण करत मुरळीच्या भावविश्वाची मांडणी करण्यात आली आहे.
प्रदर्शनाची तारीख
अस्सल लोकसंस्कृती, अर्थपूर्ण कथानक आणि दमदार संगीताचा संगम असलेला “फुला” हा चित्रपट १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठी लोकपरंपरेचा वेगळा अनुभव देणारा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
-
‘२४ व्या झी सिने अवॉर्ड्स २०२६’ मध्ये विकी कौशलने मराठा शौर्याला दिली खास आदरांजली

‘२४ व्या झी सिने अवॉर्ड्स २०२६’मध्ये विकी कौशलच्या दमदार परफॉर्मन्समधून मराठा अभिमानाचा उत्सव
‘झी’ टीव्हीने पुन्हा एकदा भारतीय सिनेमाचा भव्य उत्सव साजरा करत ‘२४वा झी सिने अवॉर्ड्स २०२६’ हा सोहळा रंगतदार पद्धतीने पार पाडला. या सोहळ्यात बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकार, धमाकेदार परफॉर्मन्स आणि सिनेमावर प्रेम करणारे चाहते एकत्र आले. ‘FANtertainment’ या संकल्पनेला साजेसा हा सोहळा खऱ्या अर्थाने सिनेमाचा जल्लोष ठरला. या भव्य कार्यक्रमातील सर्वात खास क्षणांपैकी एक म्हणजे अभिनेता विकी कौशल यांचा दमदार परफॉर्मन्स होता. आपल्या अभिनयासाठी ओळखला जाणारा ‘छावा’ म्हणजेच विकीने आपल्या लोकप्रिय भूमिकेची झलक स्टेजवर साकारत प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
मराठा शौर्याला अनोखी आदरांजली
भारतीय सिनेमाच्या या भव्य सोहळ्यात यंदा प्रेक्षकांना एक अत्यंत खास आणि अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. लोकप्रिय अभिनेता विकी कौशल महाराष्ट्राची परंपरा, शौर्य आणि गौरवाला साजेसा एक भव्य परफॉर्मन्स सादर करत महान मराठा योद्ध्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करताना दिसला. महाराष्ट्राच्या शौर्यगाथांवर आधारित हा परफॉर्मन्स पारंपरिक शैलीत सादर करण्यात आला.
भव्य प्रवेशाने रंगला जल्लोष
या भव्य सादरीकरणाची सुरुवात विकीच्या दमदार एंट्रीने झाली. तो एका भव्य हत्तीवरून प्रेक्षकांमध्ये प्रवेश करताना दिसला. नाशिक ढोलाच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या लाटांमध्ये तयार झालेल्या जल्लोषमय वातावरणाने संपूर्ण सभागृह दणाणून गेले. मराठा परंपरा, पराक्रम आणि सांस्कृतिक अभिमानाचा साज चढवणारा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.
सोहळा पाहण्याची संधी
अशा अनेक अविस्मरणीय क्षणांनी सजलेला ‘२४वा झी सिने अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य सोहळा पाहायला विसरू नका. हा कार्यक्रम रविवार, १५ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता फक्त झी सिनेमा, झी टीव्ही आणि झी५ या माध्यमांवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
-
‘आपली यारी… गावावर भारी!’

‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान पटकावलेला ‘बाप्या’ १५ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेला आणि अनोख्या संकल्पनेमुळे चर्चेत असलेला ‘बाप्या’ हा आगळावेगळा मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ अशी हटके टॅगलाईन असलेला हा चित्रपट १५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे नुकतेच प्रदर्शित झालेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून या वेगळ्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.
पोस्टरमधील रहस्यमय संकेत
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पाठमोरी उभी असलेली एक व्यक्ती आणि तिला पाहून गावातील इतर पात्रांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य, कुतूहल आणि प्रश्नार्थक भाव अनेक प्रश्न निर्माण करतात. विशेष म्हणजे पोस्टरमधील ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे असल्याचे कळतेय. मात्र ती अशी का उभी आहे? तिच्या आगमनाने गावात एवढे आश्चर्य का निर्माण होते? आणि तिच्या येण्याने नेमके कोणते बदल घडणार आहेत? असे अनेक प्रश्न या पोस्टरमधून निर्माण झाले आहेत.
मैत्रीभोवती फिरणारी कथा
या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप गूढ ठेवण्यात आली असून त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. मैत्री आणि नातेसंबंधांभोवती फिरणाऱ्या या वेगळ्या कथेत नेमके काय घडते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळही या चित्रपटातील मैत्रीची ताकद आणि त्यातून घडणाऱ्या रंजक घटनांची झलक देते.
कलाकारांची दमदार फळी
या अनोख्या आणि हटके संकल्पनेवर आधारित चित्रपटात प्रतिभावान अभिनेता गिरीश कुलकर्णी झळकणार असून त्यांच्यासह राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरमुळेच चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दिग्दर्शन आणि निर्मिती
समीर तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘बाप्या’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे विशेष ठरणार आहे. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी आहेत.
‘पिफ्फ’मध्ये तिहेरी सन्मान
प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने मोठे यश मिळवत पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (PIFF) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. या तिहेरी सन्मानामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दिग्दर्शक समीर तिवारी यांचे मत
दिग्दर्शक समीर तिवारी यांच्या मते हा चित्रपट मैत्री, नाती आणि त्यातून घडणाऱ्या रंजक प्रसंगांची एक वेगळी आणि अनोखी कथा आहे. प्रेक्षकांना हसवत-खेळवत एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला असून ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळच या चित्रपटाचा आत्मा असल्याचे ते सांगतात.
रहस्य उलगडण्याची उत्सुकता
राजश्री देशपांडे यांची ही रहस्यमय व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे? तिच्या आगमनाने गावात असा खळबळजनक प्रतिसाद का उमटतो? आणि ‘आपली यारी… गावावर भारी!’ म्हणवणारी ही मैत्री नेमकी कोणती? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील दिवसांत समोर येतील आणि त्याच वेळी या अनोख्या चित्रपटाचे आणखी काही पैलू उलगडत जातील.
-
‘सनई चौघडे’ मध्ये अदिती सारंगधर पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार

झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेत ती ‘तेजस्विनी खानोलकर’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, तिच्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतीच्या भावनांनी समृद्ध अशी ही भूमिका असल्याचं अदिती सांगते. दिसायला जे दिसतं ते नेहमी तसं असतंच असं नाही, अशा अनेक स्तरांनी भरलेली तेजस्विनी ही व्यक्तिरेखा असून ती आपल्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकणारी आणि मुलांवर अत्यंत प्रेम करणारी आई आहे.
आईची भूमिका स्वीकारण्यामागचं कारण
अदिती सांगते की, झी मराठीवर तिने यापूर्वी नायिका आणि खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत; मात्र *‘सनई चौघडे’*मध्ये ती पहिल्यांदाच आईची भूमिका करत आहे. सुरुवातीला आईची भूमिका करायला ती तयार नव्हती, कारण प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या प्रवासात काही टप्पे स्वीकारावे लागतात. पण काळानुसार टेलिव्हिजनमध्येही चांगले बदल होत आहेत आणि मजबूत, विचारपूर्वक लिहिलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यामुळे सखोल विचार करून आणि स्वतःच्या तत्त्वांचा सन्मान राखत तिने ही भूमिका स्वीकारली.
व्यक्तिरेखेचे वेगळेपण आणि भावविश्व

अदितीच्या मते, तेजस्विनी ही फक्त आईची भूमिका नसून अनेक अनुभवांनी घडलेली एक स्त्री आहे. तिच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी तिच्या मनावर खोल परिणाम झालेले आहेत. त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळं वजन आणि भावनिक खोली आहे. तिच्या भोवती अनेक घटना फिरत असतात आणि त्या प्रत्येक घटनेत तिचं मत, तिची भूमिका आणि तिची संघर्षशील वृत्ती स्पष्ट दिसते.
दिग्दर्शक आणि टीमसोबत काम करण्याचा अनुभव
या मालिकेत काम करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे दिग्दर्शक-निर्माते राजू सावंत यांच्यासोबत काम करण्याची संधी. अदितीच्या मते, चांगल्या कलाकाराला चांगला दिग्दर्शक मिळणं आणि चांगल्या दिग्दर्शकाला योग्य कलाकार मिळणं ही भाग्याची गोष्ट असते. त्यामुळे ही भूमिका स्वीकारताना तिला विशेष आनंद झाला.
पूर्वीच्या भूमिकांपेक्षा वेगळा अनुभव
अदितीने आपल्या कारकिर्दीत अनेक लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. *‘वादळवाट’*मधील रमा चौधरी, *‘लक्ष’*मधील सलोनी देशमुख, *‘हम बने तुम बने’*मधील तुलिका, *‘येऊ कशी तशी मी नांदायला’*मधील मालविका आणि आता *‘सनई चौघडे’*मधील तेजस्विनी — प्रत्येक भूमिकेचे वेगवेगळे कंगोरे असल्याचं ती सांगते. प्रत्येक व्यक्तिरेखेचं बोलणं, वागणं, दिसणं आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न ती नेहमी करत आली आहे.
सहकलाकार आणि युनिटसोबतची मैत्री
या मालिकेच्या सेटवर आधीपासून परिचित असलेले काही सहकलाकार असल्यामुळे काम करताना एक वेगळं समाधान मिळाल्याचं अदिती सांगते. अभिनेत्री मेघना हिला ती आधीपासून ओळखते. तसेच निर्माती मनस्वीही तिला परिचित आहे. याशिवाय बॅकस्टेज काम करणाऱ्या अनेक सदस्यांशीही तिची चांगली ओळख असल्यामुळे स्वतःच्या माणसांमध्ये काम करत असल्याची भावना तिला मिळाली.
कलाकार आणि युनिट यांचं नातं महत्त्वाचं
अदितीच्या मते, कलाकारांमध्ये मैत्री होणं स्वाभाविक असतं; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण युनिटसोबतचं नातं. कलाकारांनी आपल्या युनिटला सोबत घेऊन पुढे जायला हवं. शूटिंगच्या वेळी युनिटसोबत वेळ घालवणं, एकत्र जेवणं आणि कामाचा आनंद वाटून घेणं तिला खूप आवडतं. नव्या कलाकारांसोबत काम करताना मिळणारी नवीन ऊर्जा देखील तिला प्रेरणा देत असल्याचं ती सांगते.
१६ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला
तेजस्विनी खानोलकरच्या रूपात अदिती सारंगधर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. तिच्या या नव्या आणि भावनिक व्यक्तिरेखेचा प्रवास पाहण्यासाठी ‘सनई चौघडे’ ही मालिका १६ मार्चपासून दररोज रात्री ८:३० वाजता फक्त झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
तब्बल तेरा वर्षांनी ट्रेंडसेटर गायक अभिजीत सावंतने केलं या मराठी चित्रपटासाठी खास गाणं

मराठी संगीतविश्वात आपला वेगळा ठसा उमटवणारा आणि इंडियन आयडॉलमधून घराघरात पोहोचलेला गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2025 वर्षात ट्रेंडसेटर ठरलेला हा गायक आता पुन्हा एकदा आपल्या सुरेल आवाजातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक वर्षांपासून आपल्या वेगळ्या गायनशैलीमुळे अभिजीत सावंतने संगीतप्रेमींच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
तेरा वर्षांनंतर पुन्हा चित्रपटासाठी गायन
तब्बल तेरा वर्षांनंतर अभिजीत सावंत पुन्हा एकदा मराठी चित्रपटासाठी गाणं गाताना दिसणार आहे. ‘सखे गं साजणी’ या आगामी मराठी चित्रपटाचं टायटल ट्रॅक त्याने गायलं असून या गाण्यामुळे प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘सर सुखाची श्रावणी’ या सदाबहार गाण्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटातील गाण्यातून तो प्रेक्षकांना भेटणार आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अभिजीत सावंतची एक झलकही पाहायला मिळत आहे.
गाणं आणि अभिनय दोन्हीचा अनुभव

नुकतंच ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचं टायटल गाणं प्रदर्शित झालं असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या गाण्याबद्दल बोलताना अभिजीत सावंत सांगतो की, चित्रपटासाठी गाणं करणं हे प्रत्येक गायकाचं स्वप्न असतं आणि ही संधी मिळाल्याचा त्याला खूप आनंद आहे. ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक गाण्याची संधी मिळाल्यापासून या गाण्याबद्दल त्यालाही उत्सुकता होती. या गाण्यात गाण्यासोबत अभिनय करण्याची संधी मिळाल्यामुळे हा अनुभव त्याच्यासाठी आणखी खास ठरला आहे.
प्रेक्षकांच्या प्रेमाची अपेक्षा
अभिजीत सावंतच्या आवाजाची जादू प्रेक्षकांनी अनेक गाण्यांतून अनुभवली आहे. ‘चाल तुरू तुरू’, ‘रुपेरी वाळूत’ अशा गाण्यांमधून त्याच्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आता ‘सखे गं साजणी’ या नव्या गाण्यामुळेही प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याच्या सुरेल आवाजाचा आनंद घेता येणार आहे. आजवर प्रेक्षकांनी त्याच्या प्रत्येक कलाकृतीला भरभरून प्रेम दिलं आहे, आणि याही गाण्याला तेवढंच प्रेम मिळेल अशी आशा अभिजीत सावंतने व्यक्त केली आहे.
-
स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे यांची महाराष्ट्र टूर

स्टेजवर उभा राहून सलग दोन तास केवळ बोलण्याच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवणं हे काही सोपं काम नाही. पण स्टँडअप कॉमेडीच्या या अनोख्या कलेतून अनेक कलाकार आज प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. अशाच कलाकारांमध्ये सध्या वेगळं स्थान निर्माण केलेलं नाव म्हणजे स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे. आपल्या खास शैलीतून आणि अचूक टायमिंगमधून प्रेक्षकांना हसवणारे मंदार भिडे आता संपूर्ण महाराष्ट्राला हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
कॉर्पोरेट नोकरी सोडून स्टँडअप कॉमेडीचा प्रवास
मंदार भिडे यांनी काही वर्षांपूर्वी मोठ्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून पूर्णवेळ स्टँडअप कॉमेडी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सुरुवातीला छोट्या-मोठ्या स्टेजवरून सादरीकरण करत त्यांनी आपल्या विनोदाच्या शैलीतून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या विनोदात दैनंदिन आयुष्यातील निरीक्षणं, साधे पण नेमके संवाद आणि प्रसंगांची रंगतदार मांडणी असल्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्याशी लगेच नातं जोडता येतं.
अचूक टायमिंग आणि क्लीन कॉमेडीची खासियत

मंदार भिडे यांच्या कॉमेडीची खासियत म्हणजे त्यांचं अचूक टायमिंग आणि ‘क्लीन कॉमेडी’ची शैली. त्यांच्या कार्यक्रमात अगदी लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळेच मनमोकळेपणाने हसू शकतात. कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर न वापरता फक्त प्रसंग आणि निरीक्षणांच्या माध्यमातून हसवणं ही त्यांची ताकद मानली जाते. त्यामुळे त्यांच्या शोला कुटुंबासोबत येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी असते.
महाराष्ट्रातील विविध शहरांत भेटणार प्रेक्षकांना
आपल्या महाराष्ट्र टूरबद्दल बोलताना मंदार भिडे सांगतात की, आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी परफॉर्म केलं आहे, मात्र महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जाऊन तिथल्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटणं हा अनुभव नक्कीच वेगळा असणार आहे. महाराष्ट्रात दर बारा कोसावर भाषा बदलते, त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या प्रेक्षकांसमोर स्टँडअप सादर करणं हे तितकंच आव्हानात्मक आणि रोमांचक आहे.
स्टँडअप फॉरमॅट अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
मंदार यांच्या मते, स्टँडअप कॉमेडी हा प्रकार अजूनही अनेकांना नवीन वाटतो. त्यामुळे कुटुंबासोबत येऊन हा कार्यक्रम पाहावा आणि मोठ्या पिढीलाही या फॉरमॅटची ओळख व्हावी, हा त्यांच्या महाराष्ट्र टूरमागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. प्रेक्षकांना मनमोकळं हसायला मिळावं आणि एक हलकाफुलका अनुभव घेता यावा, यासाठी ते हा टूर करत आहेत.
लवकरच जाहीर होणार शहरांची यादी
मंदार भिडे यांची महाराष्ट्र टूर लवकरच सुरू होणार असून या टूरमध्ये राज्यातील विविध शहरांमध्ये त्यांचे शो आयोजित केले जाणार आहेत. कोकणापासून पुणे, नाशिक आणि इतर अनेक शहरांपर्यंत हा प्रवास होणार असल्याची चर्चा आहे. मात्र नेमकी तारीख आणि शहरांची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हास्याचा धबधबा अनुभवण्याची संधी
मंदार भिडे यांचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पसरलेले आहेत. त्यांच्या शोमध्ये उपस्थित राहून हास्याचा खळखळाट अनुभवण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाही त्यांच्या थेट स्टँडअप शोचा आनंद घेण्याची संधी मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढलेली दिसत आहे.
-
‘बोल बोल राणी’ १० जुलैला होणार प्रदर्शित

शांततेत दडलेला थरार, मनात असंख्य प्रश्न निर्माण करणारे वातावरण आणि गूढतेची एक वेगळीच छटा… अशा उत्सुकता वाढवणाऱ्या मांडणीमुळे ‘बोल बोल राणी’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सिड विंचुरकर निर्मित आणि दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून येत्या १० जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओमुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रहस्यमयी व्हिडिओने वाढवली उत्सुकता
सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या या व्हिडिओमध्ये रहस्य आणि थराराचं जबरदस्त मिश्रण पाहायला मिळतं. खुर्चीत बसलेली एक तरुणी, तिचे बांधलेले हात, पार्श्वभूमीला घोंगावणारं रहस्यमयी संगीत आणि अचानक बंदुकीतून सुटलेली गोळी… या काही क्षणांच्या दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ‘नेमकं घडलंय तरी काय?’ हा प्रश्न प्रेक्षकांना सतत पडत आहे.
गूढ शांततेत लपलेली कथा
या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या कथेबाबत कोणताही थेट उलगडा होत नाही. मात्र त्यामध्ये दडलेली अस्वस्थ करणारी शांतता आणि गूढ वातावरण चित्रपट एका वेगळ्याच पातळीवर नेणार असल्याची झलक यातून मिळते. थरारक कथानक आणि वेगळी मांडणी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.
सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर पुन्हा एकत्र
या चित्रपटाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे तीन दमदार कलाकार तब्बल पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र झळकणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील हे तिघेही अनुभवी कलाकार आपल्या वेगळ्या अभिनयशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या सोबत संभाजी ससाणेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले प्रश्न
या व्हिडिओमधील काही क्षण प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. नेमकी ही मुलगी कोण आहे? तिचे हात का बांधलेले आहेत? बंदुकीतून सुटलेली गोळी नेमकी कुणासाठी आहे? आणि या सगळ्यामागे नेमकं कोणतं सत्य दडलं आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच चर्चेत रंगले आहेत.
थ्रिलर म्हणजे प्रश्न निर्माण करणं – सिड विंचुरकर
चित्रपटाबद्दल बोलताना निर्माते आणि दिग्दर्शक सिड विंचुरकर सांगतात की, थ्रिलर म्हणजे केवळ भीती दाखवणं नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि त्यांना शेवटपर्यंत अस्वस्थ ठेवणं. ‘बोल बोल राणी’चा हा व्हिडिओ त्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे. प्रत्येक आवाज, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक दृश्यामागे एक अर्थ दडलेला आहे. हा थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी सज्ज राहावं.
मजबूत टीमची साथ
न्यूझिलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे निर्मित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली हे निर्माते आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला आणि रचना वोरा सहनिर्माते म्हणून काम पाहत आहेत. तसेच तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी असोसिएट निर्माते आहेत. चित्रपटाला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत लाभलं आहे.
वेगळ्या मांडणीमुळे चर्चेत ‘बोल बोल राणी’
रहस्यमयी कथानक, दमदार कलाकारांची साथ आणि वेगळ्या शैलीत सादर केलेला थरार यामुळे ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गूढ वातावरण आणि उत्कंठावर्धक मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता हा थरार नेमका काय आहे, याचा उलगडा १० जुलै रोजी चित्रपटगृहात होणार आहे.
-
‘फुला’तून उलगडणार मुरळीच्या आयुष्याची संघर्षमय कथा

मराठी मातीतल्या लोकपरंपरा, लोककला आणि त्यामागील वास्तव जीवनातील संघर्ष यांचे चित्रण करणारा ‘फुला’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाघ्या-मुरळी परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटातून एका निरागस मुलीची वेदनादायी आणि संघर्षमय कहाणी मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. हा चित्रपट १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना ग्रामीण संस्कृतीचा आणि वास्तवाचा वेगळा अनुभव देणार आहे.
जेजुरीत खंडेरायाच्या साक्षीने पोस्टर लाँच
चित्रपटाचे पोस्टर नुकतेच जेजुरी येथे खंडेरायाच्या साक्षीने लाँच करण्यात आले. वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. जेजुरीसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळी पोस्टर लाँच झाल्यामुळे चित्रपटाच्या विषयाला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे.
निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी

पै. अजित शिवाजी जाधव यांनी ‘फुला’ या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जावीर यांनी केले असून पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. ग्रामीण जीवनाशी घट्ट नाळ असलेल्या या कथेला वास्तववादी पद्धतीने पडद्यावर आणण्याचा प्रयत्न या टीमने केला आहे.
संगीत, गीत आणि तांत्रिक बाजू
चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांनी केले आहे. ते सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील विशेष टप्पा ठरणार आहे. गीतलेखन रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांनी केले आहे. तर अमर देवकर यांनी सर्जनशील दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन प्रताप जोशी, कला दिग्दर्शन अतुल लोखंडे आणि संकलन राहुल प्रजापती यांनी केले आहे. वेशभूषा कोमल जावीर आणि अक्षता पाटील, तर रंगभूषा समाधान भोरे यांनी केली आहे.
गायनात नामवंत गायकांचा सहभाग
चित्रपटातील गाण्यांना अनेक नामवंत गायकांचा आवाज लाभला आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली इंगवले, वैष्णवी अदोडे आणि आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. त्यामुळे चित्रपटात लोकसंगीताचा आणि पारंपरिक शैलीचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.
नव्या दमाच्या कलाकारांची फळी
या चित्रपटात प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट आणि शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण आणि चित्रपटाची टीम ही सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील असून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहभागामुळे चित्रपटाला अस्सल ग्रामीण रंग मिळाला आहे.
मुरळी परंपरेतील स्त्रीच्या संघर्षाची कहाणी
‘फुला’ ही कथा एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीच्या आयुष्याभोवती फिरते. तमाशा फड, जागरण-गोंधळ यांसारख्या पारंपरिक लोककला आणि संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट उलगडते. या परंपरेत अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या आयुष्यातील संघर्ष, वेदना आणि समाजातील त्यांची स्थिती यांचे वास्तव चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे.
लोककलेच्या माध्यमातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी सांगितले की, ‘फुला’ हा केवळ एका मुलीची शोकांतिका नाही, तर महाराष्ट्राच्या लोकपरंपरांमध्ये अडकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्वाचा जिवंत दस्तावेज आहे. मुरळी परंपरेत अनेक स्त्रियांना त्यांची स्वप्ने, हक्क आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळत नाही. समाज त्यांच्या कलेचा आनंद घेतो, मात्र त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही. या वास्तवाचे प्रामाणिक चित्रण करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
१७ एप्रिलपासून चित्रपटगृहात
लोकपरंपरा, संघर्ष आणि स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न मांडणारा ‘फुला’ हा चित्रपट १७ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण संस्कृतीचा आणि वास्तवाचा वेगळा पैलू उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एक विचार करायला लावणारा अनुभव देईल.
-
उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा ‘पिक्चर बॉईज’ १५ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हलक्याफुलक्या मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी ‘पिक्चर बॉईज’ हा नवा चित्रपट येत आहे. चित्रपटात हिरो बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी धडपड करणाऱ्या काही तरुणांची कथा विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आली आहे. त्यामुळे कॉमेडीचा भरपूर डोस देणारा हा चित्रपट १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
दमदार पोस्टर सोशल मीडियावर लाँच
चित्रपटाचं दमदार पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पोस्टरमधूनच चित्रपटाची तरुणाईला भावणारी शैली आणि विनोदी अंदाज स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे ‘पिक्चर बॉईज’ बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
निर्मिती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अनुभवी टीमकडे
त्रिमूर्ती फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार आणि राजा पांडुरंग पंडितपवार हे चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शनाची धुरा निलेशसिंग राजपूत यांनी सांभाळली आहे. त्यामुळे चित्रपटात विनोदासोबतच वास्तववादी कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
संगीत आणि गायनाची खास मेजवानी
चित्रपटातील गाण्यांनाही तितकंच महत्त्व देण्यात आलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे आणि संध्या–प्रनिकेत यांनी गीतलेखन केलं असून, या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या–प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते आणि एल. के. लक्ष्मीकांत यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. त्यामुळे संगीताच्या माध्यमातूनही चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
छायांकन आणि संकलनाची जबाबदारी
चित्रपटाचं छायांकन विनोद पाटील यांनी केलं असून, संकलनाची जबाबदारी रोहन पाटील यांनी सांभाळली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या दृश्यरचनेत आणि गतीत विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
तरुण कलाकारांची दमदार फळी
‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटात प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख आणि घनश्याम दरवडे (छोटा पुढारी) यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. यांच्यासोबतच अनेक नव्या-जुन्या कलाकारांची फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात हिरो बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच्या संघर्षाची आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या मजेशीर प्रसंगांची कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मनोरंजनाची हमी
चित्रपटातूनच चित्रपटाची गोष्ट सांगण्याचा प्रकार यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाला आहे. मात्र हिरो बनण्यासाठी झटणाऱ्या तरुणांची कथा विनोदी आणि मनोरंजक शैलीत मांडण्याचा प्रयत्न ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हसवणारा आणि हलकंफुलकं मनोरंजन देणारा हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.
