
-
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बोरीवलीत ‘अजित कडकडे संगीत रजनी’!

गुढीपाडव्याच्या उत्सवी वातावरणात संगीताची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. भक्तिगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक विभूषण पुरस्काराने सन्मानित अजित कडकडे यांची विशेष ‘अजित कडकडे संगीत रजनी’ बुधवार, १८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
भक्तिगीत, नाट्यसंगीत आणि भावगीतांचा सुरेल संगम

दर्शन क्रिएशन्स आणि शु-हर्ष इंटरप्राइझेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात भक्तिगीत, नाट्यसंगीत आणि भावगीतांचा सुंदर संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. मराठी संगीत परंपरेतील अनेक गाजलेल्या रचनांचा आस्वाद या विशेष संगीत रजनीमध्ये रसिकांना मिळणार आहे.
लोकप्रिय आणि कालातीत गीतांची मैफल

या संगीत रजनीमध्ये प्रख्यात गायक अजित कडकडे आपल्या अनेक लोकप्रिय आणि कालातीत रचना सादर करणार आहेत. “निघालो घेऊन दत्ताची पालखी”, “अवघे गर्जे पंढरपूर”, “अबीर गुलाल उधळीत रंग”, “कांटा रुते कुणाला”, “नाही पुण्याची मोजणी”, “स्वामी कृपा कधि करणार”, “सजल नयन नित धार” आणि “कैवल्याचा चांदण्याला” अशा अवीट गोडीच्या गीतांचा आस्वाद रसिकांना प्रत्यक्ष घेता येणार आहे.
रसिकांच्या आग्रहाखातर विशेष आयोजन
अजित कडकडे यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या विशेष संगीत रजनीचे आयोजन व्हावे, अशी मागणी वारंवार होत होती. हीच भावना लक्षात घेऊन दर्शन क्रिएशन्स आणि शु-हर्ष इंटरप्राइझेस यांनी पुढाकार घेत कडकडे यांना या कार्यक्रमासाठी विनंती केली असता त्यांनी रसिकांसाठी आनंदाने होकार दिला, अशी माहिती आयोजक समीर बापर्डेकर यांनी दिली.
अनघा मोडक करणार निरूपण
या कार्यक्रमाच्या निरूपणाची धुरा सुप्रसिद्ध निरूपणकार अनघा मोडक सांभाळणार आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी, ओघवती आणि प्रभावी वाणी तसेच विषयाचे सखोल आकलन ही त्यांची खास वैशिष्ट्ये मानली जातात. संगीत, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरांचा उत्तम अभ्यास असल्यामुळे त्या प्रत्येक कार्यक्रमाला वेगळी उंची देतात. रसिकांशी सहज संवाद साधत कार्यक्रमातील प्रत्येक सादरीकरणाचा आशय सुंदरपणे उलगडून सांगण्याची त्यांची शैली अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे त्यांच्या निरूपणामुळे हा संपूर्ण कार्यक्रम अधिक समृद्ध, रंजक आणि संस्मरणीय ठरणार आहे.
रसिकांसाठी अनोखी संधी
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे बुधवार, १८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता होणाऱ्या या बहुप्रतीक्षित संगीत रजनीमध्ये अजित कडकडे यांच्या सुमधुर रचना प्रत्यक्ष ऐकण्याची अनोखी संधी रसिकांना मिळणार आहे. या अलौकिक दर्जाच्या संगीत सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६९९७७३८०
-
‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाने पूर्ण केले गौरवशाली पन्नास दिवस

प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आठव्या आठवड्यातही थिएटरमध्ये गर्दी
मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवणारा झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित, तसेच केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाने आपला गौरवशाली पन्नासावा दिवस पूर्ण केला आहे. आठव्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत असून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, जालना आणि जळगाव यांसारख्या शहरांमध्ये चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कायम आहे. भावनिक आणि मनोरंजक क्षणांनी सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्याची लोकप्रियता अजूनही टिकून आहे.
निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची दाद
चित्रपटातील निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध, संवादातील सहजता आणि अभिनयातील नैसर्गिकता यामुळे चित्रपटाला वेगळी रंगत प्राप्त झाली आहे. त्यांच्या बहारदार अभिनयामुळे प्रेक्षकांना या कथेशी भावनिक नाळ जोडता आली असून अनेकांनी चित्रपट पाहताना हसत-हसत आणि काही प्रसंगांमध्ये भावूक होत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळेच हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहे.
“बाई घर चालवू शकते तर चित्रपटही चालवू शकते” – केदार शिंदे
चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, “‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाचा गौरवशाली ५० वा दिवस साजरा होत आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. माझं नेहमी एकच म्हणणं असतं की, बाई जर घर चालवू शकते तर नक्कीच चित्रपटही चालवू शकते. स्त्रीप्रधान चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता वेगळा विषय मांडण्याचा हा प्रयत्न होता. सासू-सुनेच्या नात्याबद्दलच्या भावना नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना प्रेक्षकांकडून सुखद प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी प्रेक्षकांचा कायम ऋणी आहे.”
प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे यशाचा आनंद – बवेश जानवलेकर
या यशाबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेला प्रतिसाद अत्यंत समाधानकारक आहे. भावनिक आशय आणि मनोरंजनाची जोड असलेल्या कलाकृती प्रेक्षकांना नेहमीच आवडतात, हे या चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सलग आठ आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करत पन्नास दिवसांचा टप्पा गाठणे हा आमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा क्षण आहे.
दमदार टीमने उभा केला यशाचा प्रवास
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिले असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे.
भावनिक नातेसंबंध, हलकाफुलका विनोद आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आशय यामुळे ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
“ही होळी माझ्यासाठी अतिशय खास आहे कारण…” – मेघना एरंडे जोशी

‘सनई चौघडे’ मालिकेतील पमा परबच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मेघनाच्या होळीच्या खास आठवणी
होळीच्या रंगांनी आणि नव्या सुरुवातीच्या उत्साहाने नटलेल्या या वातावरणात अभिनेत्री मेघना एरंडे जोशी आपल्या आवडत्या सणाविषयीच्या गोड आठवणींना उजाळा देत आहेत. ‘सनई चौघडे’ मालिकेत पमा परब ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या मेघना होळीच्या आठवणी आणि यावर्षीच्या खास कारणांबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या.
रंग, संगीत आणि पुरणपोळीची गोड चव
मेघना सांगतात की होळी हा त्यांचा अत्यंत आवडता सण आहे. या दिवशी रंगांची उधळण, संगीताचा आनंद आणि आईच्या हातच्या मऊ, लुसलुशीत पुरणपोळीचा आस्वाद – या सगळ्यामुळे होळीचा दिवस अधिकच खास बनतो. एकमेकांना रंग लावताना केलेली मस्ती, मैत्रिणींसोबतचा दंगा आणि आनंदाचा उत्सव यामुळे हा सण त्यांच्या मनात कायम विशेष स्थान राखून आहे.
लहानपणापासून होळीचा खास उत्साह
लहानपणापासूनच होळी हा मेघनाचा सर्वांत आवडता सण राहिला आहे. होळी दहनाच्या दिवशी वाईट विचारांची आणि वाईट कृत्यांची होळी पेटवण्याची परंपरा, तर धुलिवंदनाच्या दिवशी आप्तेष्टांसोबत रंगांची उधळण करत आनंद साजरा करण्याची परंपरा – या दोन्ही गोष्टी त्यांना विशेष भावतात. त्यामुळे हा सण दरवर्षी उत्साहात साजरा करण्याची त्यांची परंपरा कायम आहे.
‘सनई चौघडे’ मालिकेमुळे यावर्षीची होळी अधिक खास
यावर्षीची होळी मेघनासाठी आणखी खास ठरली आहे, कारण त्यांची नवी मालिका ‘सनई चौघडे’ मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेची सुरुवात होळीच्या पवित्र महिन्यात स्वामींच्या आशीर्वादाने होत असल्याने वातावरणात आणखी उत्साह निर्माण झाला आहे.
१६ मार्चपासून ‘सनई चौघडे’ झी मराठीवर
मेहनत, भावना आणि नात्यांची सुंदर कहाणी घेऊन येणारी ‘सनई चौघडे’ ही मालिका १६ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी ही नवी कथा पाहायला विसरू नये, असे आवाहन मेघना एरंडे जोशी यांनी केले आहे.
-
‘सनई चौघडे’ मधील रुबाबदार जय खानोलकर – शिस्त, स्वॅग आणि भावनांचा अनोखा संगम

स्टायलिश आणि दमदार नायकाच्या भूमिकेत राज हंचनाळे
झी मराठीवरील नव्या ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळे एका दमदार आणि स्टायलिश नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. जय खानोलकर ही त्याची व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. बाहेरून पाहता तो थोडा कठोर आणि अॅटिट्युड असलेला वाटतो; मात्र मनाने तो अतिशय संवेदनशील आहे. त्याच्या आयुष्यात त्याची आजी, आई आणि बहीण या तीन स्त्रियांना विशेष स्थान आहे. स्वतःच्या मेहनतीवर उभं केलेलं आयुष्य आणि स्पष्टवक्तेपणा हे त्याच्या स्वभावाचे ठळक पैलू आहेत.
काटेकोर ऑडिशन प्रक्रियेनंतर मिळाली भूमिका
या भूमिकेसाठी निवड होण्याची प्रक्रिया राजसाठी वेगळी आणि आव्हानात्मक ठरली. साधारणपणे एक-दोन ऑडिशनमध्ये निवड होत असताना या भूमिकेसाठी मात्र त्याला चार-पाच टप्प्यांतून जावे लागले. सुरुवातीला त्याने घरातून पहिलं ऑडिशन पाठवलं, जे प्रोडक्शन टीमला खूप आवडलं. त्यानंतर त्याला सेटवर बोलावून सहकलाकारांसोबत अनेक राऊंडमध्ये ऑडिशन घेण्यात आले. राज सांगतो की, या प्रक्रियेमुळे सुरुवातीला थोडे प्रश्न पडले; पण आता मागे वळून पाहताना योग्य कलाकार निवडण्यासाठी घेतलेली ही मेहनत योग्यच वाटते.
भूमिकेसाठी बॉडी लँग्वेज आणि स्वॅगवर विशेष मेहनत
जय खानोलकर ही व्यक्तिरेखा प्रभावी आणि अधिकारपूर्ण आहे. त्यामुळे त्याची बॉडी लँग्वेज, स्वॅग, अॅटिट्युड आणि स्टाईल यावर राजने विशेष काम केले आहे. स्वतःच्या मेहनतीने साम्राज्य उभं केलेला हा नायक असल्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वात रुबाब आणि आत्मविश्वास दिसणं गरजेचं आहे. दिग्दर्शकांसोबत चर्चा करून या व्यक्तिरेखेतील प्रत्येक पैलू अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर कठोर वाटणाऱ्या या व्यक्तिरेखेच्या आत दडलेला प्रेमळ स्वभाव दाखवणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं राज सांगतो.
आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी व्यक्तिरेखा
राजच्या मते, त्याने यापूर्वी साकारलेल्या भूमिका अधिक भावनिक आणि गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामध्ये ग्रामीण बोली आणि साधी बॉडी लँग्वेज होती. मात्र जय खानोलकर ही व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी आहे. त्याची चाल, बोलणं, उभं राहण्याची ढब आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारे आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्यातला हा बदल निश्चितच आवडेल, असा विश्वास राज व्यक्त करतो.
प्रोमोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांची निवड, संकल्पना आणि जय खानोलकरची दमदार एंट्री यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. “स्वामींची इच्छा” हा संवाद प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून रिक्षावर लिहिलेलं “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्यही लोकांना भावलं आहे.
१६ मार्चपासून झी मराठीवर नवी कहाणी
मेहनत, शिस्त आणि भावनांचा संगम असलेली जय खानोलकरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल. ‘सनई चौघडे’ ही नवी मालिका १६ मार्चपासून दररोज रात्री ८.३० वाजता फक्त झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी

स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देत ‘तिघी’चे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन
स्त्रीच्या भावविश्वाचा, तिच्या स्वाभिमानाचा आणि तिच्या अंतर्गत ताकदीचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या चित्रपटाचे महाराष्ट्रभर जोरदार प्रमोशन सुरू आहे. आई-मुलींच्या नात्याची भावनिक कथा सांगणारा हा चित्रपट केवळ नात्यांचा प्रवास नाही, तर तो स्त्री सशक्तीकरणाचा ठाम संदेश देणारा आहे. याच विचारांशी सुसंगत पाऊल टाकत *‘तिघी’*च्या टीमने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सर्व्हायकल कॅन्सर तपासणी व एचपीव्ही लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.
महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी आणि लसीकरण उपक्रम
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने २ मार्च ते ८ मार्चदरम्यान या रुग्णालयात महिलांसाठी विशेष तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेत ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. लहान वयात दिले जाणारे हे लसीकरण भविष्यात सर्व्हायकल कॅन्सरपासून संरक्षण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या आरोग्याबाबत सजग राहून योग्य वेळी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
आई-मुलीच्या नात्याला आरोग्याची सुरक्षित भेट
आई आपल्या मुलीला देऊ शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे उत्तम आरोग्य आणि योग्य वेळी केलेले लसीकरण ही त्या भेटीची सुरक्षित सुरुवात आहे, हा विचार या मोहिमेतून अधोरेखित करण्यात आला. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधाबाबत माहिती देणे आणि एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘तिघी’ टीमचा सक्रिय सहभाग
या मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटातील नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शिका जिजीविषा काळे सक्रियपणे सहभागी झाल्या. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारावी आणि आरोग्याबाबत सजग राहावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
नेहा पेंडसे बायस : “आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका”
या उपक्रमाबाबत बोलताना नेहा पेंडसे बायस म्हणाल्या, “आपण घरासाठी आणि कुटुंबासाठी खूप काही करतो; मात्र अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. *‘तिघी’*मध्ये आम्ही ज्या सशक्त स्त्रियांची कथा सांगतो, त्याचप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलीच्या भविष्यासाठी आरोग्याबाबत सजग राहणे गरजेचे आहे. योग्य वयात लसीकरण ही तिच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची पायरी आहे.”
सोनाली कुलकर्णी : “आरोग्यदृष्ट्याही स्वावलंबन महत्त्वाचे”
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “स्वावलंबन म्हणजे केवळ आर्थिक स्वातंत्र्य नव्हे, तर आरोग्याबाबत सजग असणेही तितकेच आवश्यक आहे. महिलांनी स्वतःची काळजी घेणे ही स्वार्थाची नव्हे तर सामर्थ्याची खूण आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण ही भविष्यासाठीची सुरक्षित गुंतवणूक आहे. आई-मुलीचे नाते जसे जपले जाते, तसेच त्यांच्या आरोग्याचे संरक्षणही जपले गेले पाहिजे.”
६ मार्चला ‘तिघी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
‘तिघी’ या चित्रपटात अनुभवी अभिनेत्री भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिजीविषा काळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
स्वावलंबी ज्येष्ठांसोबत ‘तिघी’ टीमची रंगली सात्विक होळी

स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा ठाम संदेश देणाऱ्या ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमने यंदाची होळी एका अर्थपूर्ण उपक्रमातून साजरी केली. पुण्यातील ‘मातोश्री ओल्डएज होम’ येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबत भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शिका जिजीविषा काळे यांनी रंग, गाणी आणि आनंदाची उधळण करत एक वेगळाच संदेश दिला.
स्वाभिमान आणि स्वावलंबनाचा ठाम विचार
‘तिघी’मध्ये ज्येष्ठ, स्वाभिमानी आणि स्वतंत्र स्त्रीची भूमिका साकारणाऱ्या भारती आचरेकर यांच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे. उतारवयात स्वावलंबाने आणि स्वाभिमानाने जगणे हा मुद्दा या चित्रपटात ठळकपणे मांडण्यात आला आहे. ‘मातोश्री ओल्डएज होम’मधील ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या राहण्याचा खर्च उचलतात आणि घरासारखे वातावरण, सन्मान व स्वातंत्र्य अनुभवतात. वृद्धाश्रम हा असहायतेचे प्रतीक नसून स्वावलंबनाचा पर्याय ठरू शकतो, हा विचार ‘तिघी’ अधोरेखित करतो.
सात्विक आणि पर्यावरणपूरक होळी

याच विचाराला अनुसरून ‘तिघी’ची टीम पुण्यातील ‘मातोश्री ओल्डएज होम’मध्ये होळी साजरी करण्यासाठी पोहोचली. भारती आचरेकर यांनी ज्येष्ठांसोबत गाणी म्हणत वातावरण रंगवले. सर्वांनी मिळून सात्विक पद्धतीने, पर्यावरणपूरक रंगांमध्ये होळी साजरी केली. गुलालाच्या हलक्या रंगांत आणि मनमोकळ्या गप्पांमध्ये ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद विशेष लक्षवेधी ठरला.
भारती आचरेकर यांचे मनोगत
यावेळी भारती आचरेकर म्हणाल्या की, आपण अनेकदा वृद्धाश्रमाकडे केवळ सहानुभूतीने पाहतो; परंतु येथे येऊन जाणवले की हा निर्णय कमकुवतपणाचा नसून स्वाभिमानाचा असतो. येथे घरासारखे वातावरण, प्रेम, सन्मान आणि आत्मनिर्भरतेचा अभिमान आहे. ज्येष्ठांसोबत होळी साजरी करताना मनापासून समाधान मिळाले.
६ मार्चला प्रदर्शित होणार ‘तिघी’
या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिजीविषा काळे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.
-
प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय तुंबाडची मंजुळा

झी स्टुडिओजच्या नव्या रहस्यमय चित्रपटाची घोषणा; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता
कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो निसर्गरम्य सागरकिनारा, हिरवाईने नटलेली डोंगररांग आणि गावागावांत फिरणाऱ्या गूढ, रहस्यमय कथा. भूत-प्रेतांच्या गोष्टी, चुलीपाशी रंगणाऱ्या गजाली आणि वीतभर घडलेली गोष्ट हातभर करून सांगण्याची गावकुसातील शैली — या सगळ्या वातावरणातून एक नवा चित्रपट आकाराला येत आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट होळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर मोशन पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आला आणि पहिल्याच क्षणापासून चर्चेचा विषय ठरला.
गूढ चेहरा, अडकलेले हात आणि अर्धवट बंद दरवाजा — पोस्टरमधील थरार
या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा गूढ चेहरा आणि दोन्ही कवाडांमध्ये अडकलेले हात असे भयचकित करणारे चित्र दिसते. जणू घरातून बाहेर पडण्यासाठी कोणीतरी धडपड करत आहे, अशी भावना निर्माण करणारे हे पोस्टर प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची मालिका उभी करते. नेमकी ही मंजुळा कोण? तिच्या मागचं रहस्य काय? या उत्सुकतेने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी प्रेक्षकांच्या भेटीस
‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट येत्या ५ जून रोजी, म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनी प्रदर्शित होणार आहे. कोकणातील परंपरा, गावकुसातील गूढ वातावरण आणि निसर्गाच्या सान्निध्यात उलगडणारी कथा यांचा संगम या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या दमाच्या दिग्दर्शकाचं पदार्पण
पूर्णपणे झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाद्वारे विविध कोरगावकर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. नव्या पिढीच्या दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याकडे विशेष लक्ष लागले आहे. निर्मितीची धुरा उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी सांभाळली आहे.
कलाकार आणि कथा अद्याप गुलदस्त्यात
या चित्रपटात नेमके कोणते कलाकार असतील, कथानकाची दिशा काय असेल आणि ‘तुंबाडची मंजुळा’ ही व्यक्तिरेखा कोण साकारणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
मराठी प्रेक्षकांच्या मातीशी जोडलेला विषय – बवेश जानवलेकर
या नव्या चित्रपटाबाबत बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, मराठी प्रेक्षक आधुनिक विचारसरणीचा असला तरी तो आपल्या मातीशी आणि परंपरेशी घट्ट जोडलेला आहे. गावाकडची कथा आणि स्थानिक संस्कृतीवर आधारित विषय त्याला कायम भावतात. मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ हा चित्रपट याचं उदाहरण ठरला. ‘तुंबाडची मंजुळा’ हा देखील असाच गावकुसातील वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पहिल्याच पोस्टरपासून चर्चेत आलेला ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या प्रतीक्षेचा विषय बनला आहे. ५ जूनला हा रहस्यपूर्ण अनुभव रुपेरी पडद्यावर नेमका कसा उलगडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
‘सुपर डुपर’ सिनेमा ३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस!

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानी ठरणारा हा चित्रपट ३ एप्रिलपासून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
पोस्टरमधून कथानकाची भन्नाट झलक
एका घराच्या दारात रंगलेला गोंधळ, एका बाजूला पारंपरिक कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारी तरुण जोडी – अशी मजेशीर आणि विनोदी परिस्थिती पोस्टरमधून उलगडते. प्रत्येक पात्राची देहबोली, हावभाव आणि उभी केलेली नाट्यमयता कथानकातील संघर्षाची स्पष्ट झलक देतात.
दाराच्या दोन्ही बाजूंना उभा संघर्ष
पोस्टरमध्ये एका बाजूला दार उघडण्याच्या तयारीत असलेले पारंपरिक विचारांचे कुटुंब दिसते, तर दुसऱ्या बाजूला दार बंद करण्याचा प्रयत्न करणारी आधुनिक तरुणाई दिसते. या दोन विचारसरणींची टक्करच चित्रपटाचा गाभा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विनोदाच्या आड दडलेली भावनिक बाजूही चित्रपटात तितकीच ठळक असेल, याची चाहूल पोस्टरमधून मिळते.
भव्य स्टारकास्टची जमेची बाजू
नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. एवढ्या मोठ्या कलाकार फळीमुळे ‘सुपर डुपर’ खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर ठरत आहे. प्रत्येक कलाकाराची वेगळी शैली आणि विनोदी टाइमिंग चित्रपटाला अधिक रंगतदार बनवणार आहे.
दिग्दर्शकांचा विश्वास
दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या मते, हे पोस्टर म्हणजे चित्रपटाच्या स्वभावाची पहिली झलक आहे. एका घरातील दोन विचारसरणींची मजेशीर टक्कर यातून दिसते. नात्यांमधला गोंधळ, प्रेम, राग, आपुलकी आणि भावनिक क्षणांचा सुरेख संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला स्वतःचं प्रतिबिंब या कथेत दिसेल, असा त्यांचा विश्वास आहे.
३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक महासोहळा
या चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. पोस्टरमुळेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून ३ एप्रिलपासून ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक महासोहळा चित्रपटगृहात रंगणार आहे.
-
६ मार्चला प्रदर्शित होणार आई–मुलींच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’

आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं… तरीही एकमेकींशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भावनांचा आविष्कार अधिक ठळकपणे मांडणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.
ट्रेलर लाँच सोहळ्यात भावनांचा उधाण
ट्रेलर लाँच सोहळा हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता एक भावनिक क्षण ठरला. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्यासाठी खास सरप्राईज ठेवण्यात आले होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘तिघी’च्या प्रदर्शनासाठी चित्रफितीच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. गायिका प्रियंका बर्वे आणि शरयू दाते यांनी चित्रपटातील गाणी सादर करून वातावरण अधिक रंगतदार केले.
या सोहळ्याला नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, जितेंद्र जोशी, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. अभिनेत्री गिरिजा ओक यांनीही उपस्थित राहून टीमला शुभेच्छा दिल्या.
तीन स्त्रियांच्या आयुष्याचा वास्तववादी वेध

अवघ्या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एका घरातल्या तीन स्त्रियांचं आयुष्य ठळकपणे उलगडताना दिसतं. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील मतभेद, छोट्या-मोठ्या भांडणांतून व्यक्त होणारा राग, न बोललेल्या अपेक्षा आणि तरीही प्रत्येक क्षणी जाणवणारा जिव्हाळा याचं प्रभावी चित्रण यात दिसतं.
तिघींच्या आयुष्यात वेगवेगळे संघर्ष आहेत. प्रत्येक जण स्वतःच्या प्रश्नांशी झुंज देताना दिसते. मात्र आयुष्याच्या एका निर्णायक वळणावर त्या तिघी एकमेकींसाठी कशा उभ्या राहणार, ही उत्सुकता ट्रेलर शेवटपर्यंत टिकवून ठेवतो.
‘आईचं घर. हजार आठवणी.’ – टॅगलाईनमागचा अर्थ
‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही टॅगलाईन ट्रेलरमध्ये ठळकपणे जाणवते. घर हे फक्त चार भिंतींचं नसतं; तिथे साठलेल्या आठवणी, तुटलेले संवाद आणि पुन्हा जुळणारे धागे यांचं ते प्रतीक असतं. नात्यातील ताणतणाव आणि त्यामागची माया यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करणार असल्याचं ट्रेलर सूचित करतो.
दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांचा दृष्टिकोन
चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे सांगतात की आई-मुलींचं नातं अनेक थरांनी बनलेलं असतं. कधी ते भांडणांतून दिसतं, तर कधी शांततेतून. ‘तिघी’मधून या नात्याची खरी आणि प्रामाणिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला यात स्वतःचं घर आणि स्वतःचं नातं दिसेल, असा त्यांचा विश्वास आहे.
कलाकार आणि निर्मितीमागची टीम
या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.
६ मार्चला मोठ्या पडद्यावर भेट
आई–मुलींच्या नात्याकडे संवेदनशील आणि प्रगल्भ दृष्टीकोनातून पाहणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. आयुष्याच्या निर्णायक वळणावर या तिघी एकमेकींना कशी साथ देतात, याचं उत्तर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावरच मिळणार आहे.

