Home

  • अंजली पाटील आणि शारीब हाश्मी यांचा ‘मल्हार’ येतोय

    व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.  ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार.

    ‘मल्हार’चे पोस्टर आणि शीर्षकाची झलक पाहून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल ! ही कथा गुजरात प्रदेशामधील कच्छच्या ग्रामीण भागात घडत असून तीन वेगवेगळया कथा येथे घडताना दिसणार आहेत. ज्या एकमेकांशी संबंधित आहेत. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल, याची खात्री आहे.

    कलाकार कोण ?

    ‘मल्हार’चे निर्माते प्रफुल पासड असून या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, हृषी सक्सेना, बालकलाकार श्रीनिवास पोकळे, विनायक पोद्दार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य आणि रवी झंकाल प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल कुंभार यांनी केले आहे.

    या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणतात, “हा चित्रपट गावाकडील अनेक विषयांवर आधारित असून यात अनेक पात्रांचा समावेश आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी कथा आहे. मैत्री, प्रेम,विश्वास अशी भावनात्मक जोड प्रेक्षकांना यात बघायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक नवा अनुभव असेल असे म्हणायला हरकत नाही. ‘मल्हार’ला प्रेक्षक पसंती दर्शवतील याची मला खात्री आहे.”

  • ‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

    आज भारतात ‘मंजुमल बॉईज’ आणि ‘अवेशम’सारखे प्रादेशिक चित्रपट गाजत आहेत. ओटीटीवरील ‘पंचायत’, ‘फॅमिली मॅन’सारख्या वेब शो चे विषय लक्षवेधी ठरत असताना मराठी सिनेमाही मागे राहिलेला नाही. मराठीत खूप दिवसांनी फ्रेश कंटेंट असलेला एक भन्नाट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीचा सुगंध लाभलेला आणि शहरी भागातील प्रेक्षकांनाही धरून ठेवणारा ‘विषय हार्ड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. संगीतप्रधान कथानकाच्या जोडीला एक वेगळंच आकर्षण असलेला मराठी मातीतील रांगडा अभिनेता सुमित या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, कसलेली अभिनेत्री पर्ण पेठेने आपल्या अभिनयाच्या बळावर या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. ‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

    बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज याची निर्मिती असलेल्या ‘विषय हार्ड’चे निर्माते गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या सुमित यांनीच कथालेखनही केलं आहे. ‘चल… चल… चल… पळ… पळ… पळ…, कोण पळतंय पुढे?’ असं म्हणत ‘विषय हार्ड’चं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ग्रामीण-निमशहरी भागातील एका रस्त्यावर एका मागोमाग एक धावणारी माणसं पोस्टरवर दिसतात. त्या सर्वांच्या पुढे एक बाईक आहे. त्यावर एक तरुण आणि तरुणी आहेत. ‘पुढे रस्ता बंद आहे’, असं लिहिलेला फलक दिसतो आणि ‘विषय हार्ड’ हे शीर्षक येतं. येत्या जुलै महिन्यात डायरेक्ट थेटरमध्ये असं रांगड्या कोल्हापूरी भाषेत लिहिलं वाक्य ‘विषय हार्ड’च्या प्रदर्शनाची घोषणाही करतं. सर्वांच्या पुढे पळणाऱ्या बाईकवर बसले आहेत मुख्य भूमिकेतील पर्ण पेठे आणि सुमित… या चित्रपटाच्या निमित्ताने पर्ण आणि सुमित प्रथमच एकत्र आले असल्याने प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. पर्ण-सुमितच्या जोडीला हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

    दिग्दर्शक सुमित यांनी दिपक भिकाजी माडकेर यांच्या साथीने चित्रपटाची पटकथा व संवादलेखन केलं आहे. नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित पाटील, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी लिहिलेल्या गीतांना साहिल कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे. स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलं असून, ओंकार शेटे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वेशभूषा सायली घोरपडे यांची, तर संकलन सौरभ प्रभुदेसाई यांचं आहे. डिओपी अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संदीप गावडे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. जुलैमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • “झाड” चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र

    वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून  मोठ्या पडद्यावर येत आहे. झाड या चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून, २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

    योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. गणेश मोरे आणि प्रशांत मुरकुटे सहदिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन,  शरद ठोंबरे, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर,  कैलास मुंडे,  प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास चौरे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे,  माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आर्यन हजारे अशी स्टारकास्ट आहे. 

    “झाड” चित्रपट २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार

    झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा या देशाला दिलेला कानमंत्र असं या चित्रपटाचं आशयसूत्र आहे. आजवर चित्रपटांतून सामाजिक विषय हाताळले गेले असले, तरी पर्यावरण संवर्धन, झाडांचं जतन-संगोपन हा विषय चित्रपटातून मांडला गेल्याचं फारसं पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे आजच्या ज्वलंत आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाची मांडणी “झाड” या चित्रपटातून कशी करण्यात आली आहे, याबाबत नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • दामोदर नाट्यगृहासाठी मराठी कलाकार आमरण उपोषणाला बसणार

    गेली अनेक महिने गाजत असलेल्या दामोदर नाट्यगृहाच्या प्रश्नावर नाटय कलाकार आक्रमक झाले आहे.  “सुधारित आराखडा सादर केल्याशिवाय नाट्यगृहाच्या तोडकामाची बंदी उठवली जाणार नाही” असे शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही आणि विधानपरिषदेत मा उदय सामंत यांनी  शासनाच्या वतीने तसे सांगितल्यानंतरही सोशल सर्विस लीगने निवडणूक आचार संहितेच्या आडून गुपचूप नाट्यगृहाचे तोडकाम सुरू केल्यामुळे दामोदर नाट्यगृहाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मा. प्रशांत दामले व  बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष मा. नीलम ताई शिर्के-सामंत यांनी यशवंतराव नाटय संकुलात  आज दि. 15 मे 2024 रोजी पत्रकार परिषद घेतली.

    विधानसभेत तोडकामाला स्थगिती दिलेली असताना सुद्धा तोडकाम केलं आहे त्याचा निषेध तीव्र निषेध प्रशांत दामले आणि नीलम शिर्के-सामंत यांनी केला. 

    या पत्रकार परिषदेत त्यांनी नाट्यगृह आरक्षण बदलावर तीव्र आक्षेप घेतला आणि खालील  मागण्या शासना पुढे ठेवल्या आहेत.

    1) नाट्यगृहाचे आणि शाळेचे बांधकाम एकाच वेळी सुरु करून एकाच वेळी संपवणे आणि हे लिखित स्वरूपात असावे.

    2) प्रस्तावित दामोदर नाट्यगृह किमान 750 आसनांचे नाट्यगृह असणे अत्यावश्यक आहे. 

    3) नाट्यगृहाचा वाढीव  FSI नाटकाशी संबंधित उपक्रमासाठीच वापरला जावा. 

    4) दामोदर नाट्यगृहाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना पूर्वीप्रमाणेच नव्या नाट्यगृहात काम मिळावे.  तोपर्यंत त्यांना पर्यायी रोजगार मिळावा.

    5) नव्या दामोदर नाट्यगृहात पूर्वीप्रमाणेच सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय/तालमीची जागा असावी. त्यासाठी प्रस्तावित आराखड्यात त्याची तशी नोंद असावी. नव्या नाट्यगृहाचे निर्माण होईपर्यंत सहकारी मनोरंजन मंडळास वापरण्यायोग्य पर्यायी जागा मिळावी. लेखी करार व्हावा.

    6) शाळा व नाट्यगृह ह्यांचे एन्ट्री गेट वेगवेगळे असावे. 

    7) नाट्यगृहाचे भाडे हे मर्यादित असावे.

    10) नाट्यगृह तळ मजल्यावरच असावे.

    ह्या सर्व मागण्यासाठी आम्ही  मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहोत. 

               दोन्ही संस्था ह्या मराठी माणसांशीच संबंधित असल्याने हा प्रश्न समोपचाराने सोडवावा हीच आमची अपेक्षा आहे. पण मुजोरपणा करून कोणी नाट्यगृहाचा घास घेऊ पाहिल, तर  दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी नाट्यपरिषद/ मराठी नाट्य कलाकार आमरण उपोषण करतील, असे वक्तव्य  प्रशांत दामले यांनी केलं.

    नीलम शिर्के -सामंत यांनी याप्रसंगी दामोदर नाट्यगृहाशी संबंधित त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.  नमन दशावतार, शक्ती तुरे यांसारख्या ग्रामीण भागातील लोककलांचे  माहेरघर असलेल्या दामोदर नाट्यगृहात नव्या कलाकारांना हक्काचा आश्रय मिळत होता. गेली शंभर वर्ष अव्याहतपणे नाट्यकलेचा वारसा जपणाऱ्या दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ याचं अस्तित्व टिकलं पाहिजे. आणि शासनाने विधिमंडळात यावर उत्तर दिलेलं असतानाही कुणी मुजोरपणे नाट्यगृहावर हातोडा घालत असेल तर त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे…

    शासन कला आणि कलाकारांसाठी संवेदनशील आहे त्यांनी कलाकारांना न्याय द्यावा अन्यथा मीही प्रशांत दामलें सोबत आमरण उपोषण करिन अशी ग्वाही दिली. याप्रसंगी प्रशांत दामले, नीलम शिर्के-सामंत, यांच्यासह जेष्ठ कलाकार उपेंद्र दाते, मेघा घाडगे, अपेक्षा कदम,  अजित भुरे, दिलीप जाधव, परमानंद पेडणेकर, रत्नकांत जगताप, सतीश लोटके, माई मीडिया च्या शीतल करदेकर, सूरज,  गणेश तळेकर, निलांबरी खामकर, राजू तुलालवर, आधी नाट्यकर्मी तसेच सहकारी मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे, के राघव कुमार, श्रीधर चौगुले, दक्षता गीसावी, श्रावण धाटोबे, रुपेश कदम, राहुल पवार, अमोल तेली आदी पदाधिकारी तसेच डोअर किपर्स उपस्थित होते.

  • कार्मिक फिल्म्सचा ‘अरनमानाई ४’ हिंदीतही डब होणार….

    २४ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

    मागील काही दिवसांपासून ‘अरनमानाई ४’ या तमिळ चित्रपटाने दक्षिणेकडे बॅाक्स ऑफीसवर अक्षरश: धुमाकूळ घालत रसिकांवर मोहिनी घातली आहे. ३ मे रोजी प्रीमियर झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ‘अरनमानाई ४’ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. २४ मे रोजी ‘अरनमानाई ४’ हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले असून, आता हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचण्यास सज्ज झाला आहे.

    ‘अरनमानाई ४’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं असून, खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा ‘अरनमानाई ४’ पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे. तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.

    कलाकार कोण

    आजची सर्वात मोठी पॅन इंडिया स्टार असलेली तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. थरारक अनुभव देणारा दोघींचा अभिनय अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. ई. कृष्णसामी यांची सिनेमॅटोग्राफी आणि हिप-हॉप तमिझाद्वारे तयार केलेल्या हळूवार साउंडट्रॅकमुळे चित्रपटातील रहस्यमय वातावरण अधिकच गडद बनते. या चित्रपटातील प्रत्येक दृश्याला रोमांचक वातावरणाची किनार जोडण्यात आली आहे.

    दहा दिवसात ६६ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करणाऱ्या ‘अरनमानाई ४’ या चित्रपटाने केवळ व्यावसायिक पातळीवर यश संपादन केले नसून, भारतीय सिनेमाच्या कथाकथन क्षमतेच्या कक्षाही रुंदावण्याचे काम केले आहे. रहस्य, हास्य आणि उत्साहाचा एकत्रित अनुभव देणाऱ्या या ब्लॅाकबस्टर चित्रपटाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांना लुटता यावा यासाठी कार्मिक फिल्म्सने ‘अरनमानाई ४’ हिंदीत डब करण्यात आला आहे. अनोख्या आणि शक्तिशाली कथा सिल्व्हर स्क्रीनवर आणण्यासाठी कार्मिक फिल्म्स ही निर्मितीसंस्था ओळखली जाते.

    २४ मे रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन ‘अरनमानाई ४’ पाहायला विसरू नका. मोठे डाव आणि अशांत आत्मे असलेल्या एका अलौकिक प्रवासासाठी सज्ज व्हा.

  • मराठीतील पहिले साल्सा सॉंग “शनाया ” रसिकांच्या भेटीला

    अमेरिका, युरोपीय देशात  ” साल्सा  सॉंग ”  हा  गीतप्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. गाण्याचे बोल आणि गीत – संगीताच्या तालावर एका विशिष्ट पध्दतीने जोडीने करावयाचा हा नृत्याविष्कार आता मराठीमध्ये ऐकायला तसेच पहायला उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

    पुण्यातील युवा गायक हरिश वांगीकर याने या गीताची निर्मिती केली आहे.  भारती न्यायाधीश यांनी हे गाणे लिहिले असून युवा संगीतकार पिनाक न्यायाधीश याने ते संगीतबद्ध केले आहे.” हस ना जरा  शनाया ” हे त्या गाण्याचे बोल असून हरिशने  प्राजक्ता पाटील हिच्यासोबत या गाण्याच्या व्हिडिओमध्ये नृत्याभिनयही केला आहे.

    तारुण्यातील मैत्री, मैत्रीचे प्रेमात रूपांतर, एकमेकांबद्दचे आकर्षण, रुसवे, फुगवे, मिलनाची आस अशा विविध भावभावनांची गुंफण भारती न्यायाधीश यांनी या गाण्यात केली आहे.  गीतातील हळुवार शब्दांना अतिशय तरल, भावस्पर्शी आणि ठेका धरायला लावणारे संगीत पिनाक न्यायाधीश याने दिले आहे. हरिश वांगीकर याने शब्दातील भावभावना आणि संगीताचा एकंदरीत बाज लक्षात घेऊन समरसतेने हे गाणे गायले आहे. गीतातील शब्द, त्याला लाभलेले संगीत,  गायनाची शैली आणि नृत्याविष्कार पहाता  ” शनाया ” हे मराठीतील पहिले साल्सा सॉंग असल्याचा दावा गायक आणि निर्माता या नात्याने हरिश वांगीकर याने केला आहे.
    आदेशप्रतापसिंह चौव्हाण यांनी या गाण्याची कोरीओग्राफी केली असून त्याचे दिग्दर्शन प्रमोदकुमार बारी यांनी केले आहे. वेशभूषा समृध्दी वाळवेकर तर मेकअपची जबाबदारी स्नेहा धोंगडी हिने पार पाडली आहे. विशेष म्हणजे गायक हरिश वांगीकर आणि संगीतकार पिनाक न्यायाधीश हे दोघे आय टी क्षेत्रात कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून कार्यरत असून गीत – संगीताच्या माध्यमातून ते कलेची जोपासना करीत आहेत.

    Song Link

    https://youtu.be/CFGpDOStD0w?si=N87vdr2kzYAkEYJT

  • सृजन द क्रियेशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका

    सृजन द क्रियेशनही संस्था गेली चार वर्ष नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. ‘सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी ४ वर्षांची होतेय. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले.

    गेल्या चार वर्षात या  संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस  एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं, अनेक अभिजात नाटकांचे अभिवाचन आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. अनेक प्रतिष्ठित स्पर्धेत पुरस्कार मिळवले आहेत.

    १५ मे रोजी संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विठ्ठल सावंत आणि राजेश देशपांडे लिखित ‘तीनसान’ आणि ‘श्यान पण’देगा देवा’ ह्या दोन पारितोषिक प्राप्त एकांकिकांचा प्रयोग प्राबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह येथे रात्री ८ वाजता होणार आहेत.

    मराठी नाट्य रसिकांनी ह्याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन संस्था प्रमुख राजेश देशपांडे  यांनी केले आहे.

  • अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त

    साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत ‘अष्टपदी’ या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. ‘अष्टपदी’ हा चित्रपटही त्याच पठडीतील ठरणार आहे. भारतीय विवाह संस्कृतीमध्ये सप्तपदीला खूप महत्त्व आहे, पण या चित्रपटाचं शीर्षक ‘अष्टपदी’ असल्याने यात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत कुतूहल जागं होतं.

    ‘अष्टपदी’च्या रूपात एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ या वेगळ्या विषायावर आधारलेल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘अष्टपदी’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी उत्कर्ष जैन स्वत: सांभाळणार आहेत. जुहू येथील आजीवासन स्टुडिओमध्ये गणेशगीताच्या ध्वनीमुद्रणाने या चित्रपटाचा मुहूर्त आणि घोषणा करण्यात आली. गीतकार गणेश चेऊलकर यांनी लिहिलेलं ‘तू सुखकर्ता विघ्नहर्ता दे स्वरदान गणपती…’ हे गाणं ध्वनीमुद्रित करण्यात आलं अहे. मृण्मयी फाटक आणि अभिजीत कोसंबी यांच्या आवाजातील या गाण्याला मिलिंद मोरे यांचं संगीत लाभलं आहे. गीत ध्वनीमुद्रण अवधूत वाडकर यांनी केलं आहे. या चित्रपटाबाबत उत्कर्ष जैन म्हणाले की, चित्रपटाची कथा ‘अष्टपदी’चा खरा हिरो आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक संगीतमय त्रिकोणी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. प्रेमकथेला साजेशी श्रवणीय संगीताची किनार जोडण्याचं सुरेख काम मिलिंद मोरे यांनी केलं आहे. ‘अष्टपदी’च्या पटकथेत प्रेमाचे आजवर कधीही न उलगडलेले पैलू पाहायला मिळणार आहेत. या निमित्ताने कलाकारांची तगडी फळी प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असून, दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि नेत्रसुखद सादरीकरण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरेल अशी आशाही उत्कर्ष यांनी व्यक्त केली आहे.

    ‘अष्टपदी’च्या कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यानंतर लगेच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ची कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. महेंद्र पाटील या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक असून, कला दिग्दर्शक निलेश रसाळ आहेत. डिओपी धनराज वाघ सिनेमॅटोग्राफी करणार आहेत. चित्रपटातील गीतांना संगीत देण्यासोबतच पार्श्वसंगीताची जबाबदारीही मिलिंद मोरे यांनी सांभाळली आहे. मेकअप अतुल शिधये करणार असून, अजय खाडे कार्यकारी निर्मात्याचं काम पाहणार आहेत. राहुल पाटील आणि नंदू आचरेकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत.

  • ‘फुलवंती’ रुपात प्राजक्ता माळी अवतरणार रुपेरी पडद्यावर

    मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान असणारे पॅनोरमा स्टुडिओज आणि वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपला ठसा उमटविणारी चतुरस्त्र अभिनेत्री प्राजक्ता माळी हे संयुक्त विद्यमाने ‘फुलवंती’ ही भव्य कलाकृती घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत. ही पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार असून अभिनेत्री प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे.  

    पॅनोरमा स्टुडिओज आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती

    कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे. मंगेश पवार अँड कं आणि शिवोsहम क्रिएशन्स प्रा.लि.निर्मित ‘फुलवंती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

    आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता सांगते, ‘फुलवंती’ सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्क्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन,असा विश्वास मला आहे. दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या सोबत आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.

    ‘फुलवंती’.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती. ही अजरामर कलाकृती आता चित्रपट रूपाने मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे.

    अमोल जोशी प्रोडक्शन्स, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.
    पखवाज आणि घुंगरांची रंगणारी जुगलबंदी रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे.

  • सिताईची भूमिका करताना मी सीनमध्ये आहे हे विसरून गेले – मीरा वेलणकर

    आईपण साजरा करायला एका मातृ दिवसाची गरज नाही. ‘शिवा’ मालिकेतल्या सीताई म्हणजेच मीरा वेलणकरने आपल्या आईपणाचे आणि सेट वर आशुच्या  आईची भूमिका निभावताना असं काय झालं की तिला रडू आले. ह्याचे किस्से त्यांनी सांगितले.

    जो पर्यंत मी आई झाले नव्हते तो पर्यंत माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअर वर होतं. मी ऍडव्हर्टाईजींग क्षेत्रात काम करत होते. म्हणतात ना आई झाल्यावर आयुष्य बदलून जातं तर त्या वाक्याचा अर्थ नाही कळायचा असा वाटायचं की बाळ झाल्यावर काही महिन्यांसाठी वेळ आणि लक्ष बाळावर राहील आणि मग काही महिन्यातनंतर सर्व पाहिल्यासारखं होईल. पण आई झाल्यावर लक्षात आलं की माझ्यामध्ये आपण हुन बदल होत आहेत,  ते लहानबाळ तुमचं सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतं. आईपण शिकावं नाही लागतं ते तुमच्यामध्ये आपसूक येतं.  माझा मुलगा जन्माला आला तेव्हा सुरवातीचे काही दिवस माझ्या डोक्यात हाच विचार चालू असायचा की त्यांनी खाल्लं का, त्याची अंघोळ झाली का, त्याला आता भूक लागली असेल का?  ह्या सर्वामध्ये मी हे विसरून जायचे  की माझी विश्रांती झाली आहे की नाही आणि हे सगळं फक्त आईपण अनुभवल्यावरच होऊ शकत. कुठली ही गोष्ट असो ती अभ्यासपूर्व करायची अशी माझी पद्धत आहे म्हणून मी गरोदर असताना प्रेग्नन्सी, पोस्ट-प्रेग्नन्सी, मुलाचं संगोपन, मुलाचा विकास  ह्या सगळ्याची खूप पुस्तक वाचली होती खूप माहिती होती पण जेव्हा मी खऱ्या अर्थानी आई झाले तेव्हा कळले की ती माहिती आहे,  अनुभव नाही. माझा मुलगा खूप लाजाळू आणि अंतर्मुख होता त्याला शाळेत आणि लोकांशी रमायला वेळ लागायचा आणि ह्यामुळे मी तिथे असणं अपरिहार्य असायचं, मी कधी-कधी थकून जायचे  त्यावेळी मला समजले की संयम किती महत्वाचं आहे, फक्त संयमच नाही तर स्वीकृती असणे ही गरजेचं आहे. आई म्हणून माझ्या हे लक्षात आलं  की माझ्या मुलाचा स्वभाव वेगळा आहे आणि मी ते स्वीकारले तेव्हा त्याच्यातला ही बदल मला दिसू लागला आता त्याच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की तो अंतर्मुख होता इतका उस्फुर्त मुलगा आहे.

    आम्ही तिघी बहिणी, माझी आई शिक्षिका होती आणि ती घर आणि काम दोनी सांभाळायची ती माझी हिरो आहे. मी तिला इतकच बोलू शकते खूप खूप धन्यवाद कारण ती जे करू शकली ती एक सुपरवुमनच करू शकते. ‘शिवा’ मालिकेत मी आशुची आई आहे आणि त्याच आणि माझं नातं खूप पेमळ आहे. माझा मुलगा फक्त १२ वर्षाचाच आहे . ‘शिवा’ मालिकेच्या  निम्मिताने मला कळेल की मला पुढे जाऊन कसं  वागायला हवे आणि कसं नाही. एक किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतोय,”एकदा तुम्ही आई झालात की तुमच्यात एक प्रेमभावना असते, मग ते ऑनस्क्रीन मुलगा असो किंवा खरा मुलगा. त्यादिवशी आम्ही एक सीन करत होतो जिथे आशु रात्रभर घरी आलेला नसतो आणि आई म्हणून मी अत्यंत काळजीत असते मग अचानक तो घरी येतो मी त्याला पाहते आणि रडायलाच लागते तेव्हा माझ्या मनात हे चालू होतं की खऱ्या आयुष्यात जर माझा मुलगा घरी आला नाही तर मी काय करेन त्या विचाराने शॉट देता देता माझं डोळे पाणावले. तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाली”.

    तेव्हा आशु आणि सिताईच्या नात्यातले गोड क्षण पाहायला विसरू नका ‘शिवा’ मालिकेत दररोज रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.