Home

  • रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा ‘चायवाला’

    चहा आणि चहावाला हे भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर कोणी टी… सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मात्र हि ‘चाय’ आहे… हि चाय बनवणारा चायवाला सर्वांना रोज ताजेतवाने ठेवण्याचं काम करत असतो. हाच चायवाला आता रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. ‘चायवाला’ हा मराठी चित्रपट लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा मोशन पोस्टर रिलीज करून करण्यात आली आहे.

    ‘चायवाला’च्या रूपात एक धम्माल विनोदी मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा सिनेमा सामाजिक संदेशही देण्याचं काम करणार आहे. हॅाट चॅाकलेट प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे सहनिर्मिते तानाजी वगरे आणि गोविंद वाघमारे आहेत. अजय-उद्भव या जोडगोळीकडे ‘चायवाला’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘करोड़ों चाहने वालों का मेला है, कौन कहता चायवाला अकेला है…’ हे चित्रपटाच्या पोस्टरवरील वाक्य बरंच काही सांगणारं आहे. सोशल मीडियामुळे आज चायवाल्यांपासून वडापाववाल्यांपर्यंत सर्वच जण फेमस झाले आहेत. यात दिल्लीतील डॅाली चायवाल्याची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘चायवाला’ चित्रपटातील नायक नेमका कसा असणार आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे. ‘सम ड्रीम्स नेव्हर स्लीप’ ही टॅगलाईनही खूप मार्मिक आहे. या चित्रपटाद्वारे प्रथमच एक अनाथ मुलगा आणि मुलगी रुपेरी पडद्यावर नायक-नायिकेच्या रूपात दिसणार आहेत. डोक्यावर पांढरी टोपी, बनियान आणि पाठीमागे चुलबुल पांडे स्टाईलमध्ये अडकवलेला गॅागल असा चायवालाचा पाठमोरा लुक पोस्टरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हा चायवाला नेमकी काय धम्माल करतो हे चित्रपटात पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

    ‘चायवाला’मध्ये अजय सूर्यवंशी, राजयोगिनी, पार्थ भालेराव, कमलेश सावंत आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची पटकथा तसेच संवादलेखन विनय येरापले यांनी केलं आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. गीतकार विनय येरापले यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी संगीत दिलं आहे. विजय पाटील रंगभूषा करणार असून, संतोष यादव कार्यकारी निर्माते आहेत. संजय केदारे निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहात असून, व्हिएफएक्सचं काम बाळासाहेब बोठे करणार आहेत.

  • मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेला “संघर्षयोद्धा” चित्रपट सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला

    मनोज जरांगे पाटील हे नाव आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय , मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपलं घरदार पणाला लावलं, ह्याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आता ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट देखील येतोय , हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४  ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता , पण आता हा चित्रपट सेन्सॉर बोर्डने प्रदर्शनासाठी काही वेळेसाठी थांबवला आहे असं चित्रपटाचे लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले आहे.

    सध्या देशात चाललेली आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहिते मध्ये प्रदर्शित करता येणार नाही असं सेन्सॉर बोर्ड ने सांगून हा चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसांकरिता थांबवला आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे ,  आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला ह्याच दुःख होत आहे , पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टित सुपरहिट चित्रपट होणार असं चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील यांनी सांगितले आहे.

    हा चित्रपट प्रदर्शनापासून थांबवल्यामुळे राज्यभर तीव्र निषेध होतोय, हा चित्रपट आता येत्या २१ जून २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले आहे. सेन्सॉर बोर्ड ने “संघर्षयोद्धा” चित्रपट प्रदर्शनासाठी थांबवल्यावर चित्रपटाचे लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे , दिग्दर्शक शिवाजी दोलताडे ,मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील आणि सर्व टीमने अंतरवाली सराटी येथे ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व गोष्टी सांगितल्या.

    २६ एप्रिल २०२४ ऐवजी आता २१ जून २०२४ला “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” चित्रपट होणार महाराष्ट्रभर प्रदर्शित

    यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की आपला “संघर्षयोद्धा” चित्रपट जरी सेन्सॉर बोर्ड ने थांबवला असला ,तरी २१ जून २०२४ या नव्या तारखेला मी चॅलेंज देऊन सांगतो की  सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट बघेल ,त्याच बरोबर माझ्या ह्या चित्रपटाला शुभेच्छा आहेतच.‘संघर्षयोद्धा’ चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी आहे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत, मी लवकरच माझ्या वेळेनुसार  पत्रकार परिषद घेऊन देखील चित्रपटा विषयी बोलेल त्याचबरोबर माझ्या ८ जून रोजी होणाऱ्या ९००  एकर सभेत देखील आपल्या २१ जून २०२४ला प्रदर्शित होणाऱ्या “संघर्षयोद्धा” या चित्रपटाविषयी प्रमोशन करा असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

  • “परंपरा” च्या निमित्ताने आयुष्य आणि परंपरा यातील संघर्ष रुपेरी पडद्यावर झळकणार

    समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला “परंपरा” हा चित्रपट २६  एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे. 

    हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो  यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत “परंपरा” या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे. अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे. विशेषत: महाराष्ट्रातील, जिथे सांस्कृतिक वारसा खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्र निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे मधुर संगीत लाभले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे.   
    “परंपरा” एक समृद्ध सिनेमॅटिक अनुभव देण्यास तयार आहे.

    एकंदरीत ‘परंपरा’ हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही, तर आजच्या बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे महत्त्व दर्शवणारा आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचं जगणं, सामाजिक ताण याचं दर्शनही हा चित्रपट घडवतो. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल यात शंका नाही. 

    Trailer Link

    https://youtu.be/k6hvdwqaHt8?si=rq0jnitwjuJzENPd

  • संगीतमय प्रेमकथा असलेल्या “अप्सरा” चित्रपटाचा टीजर लाँच

    एक अनोखी प्रेमकथा असलेल्या अप्सरा या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. प्रेमकथेला सुरेल संगीताची जोड देण्यात आली असून अनुभवी आणि नव्या दमाच्या कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

    सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत. या तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप,  भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विट्ठल काळे  विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग,समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संघर्ष भालेराव आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर,कृतिक माज़िरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

    एका तरुणाच्या मनातल असलेलं एका अप्सरेचं चित्र आणि त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर “अप्सरा” हा चित्रपट बेतला आहे. प्रेमकथा असल्याने स्वाभाविकपणे गाणी या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. टीजरवरूनच या चित्रपटाची कथा, अभिनय, संगीत या सगळ्यातलं वेगळेपण अधोरेखित होत आहे. त्यामुळे आता १० मे रोजी “अप्सरा” मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


    Teaser Link

    https://youtu.be/1IVsfXGpFNw?si=k-xmIds2M_w8VD61

  • ‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर…

    नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठयांचा लढा’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  नुकताच या चित्रपटाचा लोगो लाँच करण्यात आला.  

    ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सुरेश पंडित यांचे असून मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी असणार आहे.

    मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच “गरजवंत मराठ्यांचा लढा” हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. त्यामुळे अर्थातच ‘आम्ही जरांगे’ या चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रदर्शना आधीपासूनच शिगेला पोहचली आहे.

  • Janhvi Kapoor, Gulshan Devaiah & Roshan Mathew Starrer ‘Ulajh’ Will Keep You On The Edge Of Your Seat

    Junglee Pictures has announced the release date of the much-awaited film ‘Ulajh’, with a teaser, heightening the anticipation for the film. Featuring the talented Janhvi Kapoor in a never-seen-before avatar alongside Gulshan Devaiah and Roshan Mathew, the teaser offers the audience a sneak-peek into the high-stakes world of IFS (Indian Foreign Services). Helmed by National Award-winning director Sudhanshu Saria, the film is slated for a theatrical release on 5th July.

    Ulajh follows the journey of a young diplomat, who, belonging to a prominent family of patriots, finds herself embroiled in a dangerous personal conspiracy while far from her home turf, at a career-defining post. Having garnered a lot of attention, the teaser of Ulajh was unveiled by Janhvi who wrote,” Enter the world of lies, deceit & betrayals – #Ulajh in cinemas on 5th of July.”

    The film also boasts powerhouse performers including Adil Hussain, Rajesh Tailang, Meiyang Chang, Rajendra Gupta, and Jitendra Joshi. Written by Parveez Shaikh and Sudhanshu Saria, Dialogues by Atika Chauhan, Ulajh is set to release in cinemas near you on 5th July.

    #UlajhInCinemas5thJuly

  • ‘गीतरामायण’च्या सांगितिक मैफलीत रंगला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा ट्रेलर लाँच सोहळा

    स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले. ‘गीतरामायणा’तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर राज्य केले. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील टीमसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील ’गीतरामायण’मधील बहारदार गाण्यांची झलकही पाहायला मिळाली.

    हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. या चित्रपटात एकूण २७ गाणी असून या चित्रपटाच्या माध्य्मातून प्रेक्षकांना संगीत नजराणा मिळणार आहे. सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत.

    राजसाहेब ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

    राज ठाकरे ट्रेलरचे कौतुक करताना म्हणाले, ‘’ मला बाबुजींचा सहवास फारसा लाभला नाही. परंतु माझ्या वडिलांचे आणि बाबुजींचे जवळचे संबंध होते. बाबुजींना जवळून भेटण्याचा योग आला नाही. बहुदा हा योग सुनिल बर्वेंमुळे येईल. बाबुजींची सगळीच गाणी अजरामर आहेत. त्यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे एखाद्याला नवसंजीवनी देणे. उभारी देणे. मला खात्री आहे, या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल.’’

    दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ‘आजचा हा दिवस खूपच आनंददायी आहे. कलाप्रेम राज ठाकरे यांच्या उपस्थितीने या सोहळ्यात अधिकच रंगत आणली. फडके आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे संगीत क्षेत्रातील योगदान सर्वश्रुतच आहे. परंतु इथंवर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास तसा खडतर होता. त्यांच्या या प्रवासात पत्नी ललिताबाई, ग. दि. माडगुळकर हे त्यांच्या सोबत होतेच. परंतु या प्रवासात त्यांना इतर अनेकांनी साथ दिली. त्यांच्या भावसंगीताचा हा रंजक प्रवास या चित्रपटातून मांडण्याचा आमचा प्रयत्न केला आहे.’’

  • प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’

    आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती जपतो. सुख दुःखाच्या प्रसंगी याच नात्याची सोबत आपल्याला मिळत असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके यांनी सांभाळली आहे. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या अपूर्व यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके ३४ वर्षानंतर ‘लेक असावी तर अशी’  या चित्रपटाच्या निमित्ताने नात्यातील प्रेमाचे पदर उलगडून दाखविण्यास सज्ज झाले आहेत.

    या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच कलाकार,  तंत्रज्ञ  यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.‘लेक असावी तर अशी’ चित्रपटात नयना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्येकर, अभिजीत चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने, कमलेश सावंत, सुरेखा कुडची या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत. सोबत गार्गी दातार हा नवा चेहरा झळकणार आहे.

    ‘चित्रपटातील कुटुंबाच्या प्रेमाच्या नात्यांचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जाईल’, असा विश्वास दिग्दर्शक विजय कोंडके यांनी याप्रसंगी व्यक्त केला. ‘विजय कोंडके यांचा चित्रपट’ आणि ‘उत्तम टीम’यामुळे चित्रपट करायला लगेच होकार दिला, असं सांगताना हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास अभिनेत्री नयना आपटे, सविता मालपेकर आणि अभिनेते कमलेश सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. मध्यवर्ती भूमिका देतानाच विजय सरांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी  मोलाचा होता, असं अभिनेत्री गार्गी  दातार  हिने सांगितलं.

    ‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद विजय कोंडके यांची आहे. छायांकन के अनिकेत  तर संकलन सुबोध नारकर यांचे आहे. विजय कोंडके आणि मंगेश  कांगणे यांच्या गीतांना संगीतकार  मनोहर गोलांबरे यांनी संगीत दिले आहे. वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, मंदार आपटे, देवश्री मनोहर, स्वरा बनसोडे यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन  सुजीत कुमार  तर कलादिग्दर्शन  सतीश बिडकर यांचे आहे. कार्यकारी निर्माते सिद्धेश्वर नंदागवळे आहेत.

    ‘लेक असावी तर अशी’ चित्रपट २६ एप्रिलला राज्यभरात प्रदर्शित होत आहे.

  • मराठी साहित्यातलं मानाचं पान फकिरा रुपेरी पडद्यावर

    २०१५ ला प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरण्यात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यशस्वी झाले. ‘ख्वाडा’, ‘बबन’, ‘टीडीएम’ अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणारे भाऊराव कऱ्हाडे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार? ही उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. या उत्सुकतेवरचा पडदा नुकताच उघडला आहे. इतिहासात दडलेल्या शौर्याचं तळपतं पान ते आपल्या चित्रपटातून उलगडणार आहेत. आपल्या आगामी ‘फकिरा’ या चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी नुकतीच केली. मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या अप्रतिम कादंबरीवरचा चित्रपट ते घेऊन येत आहेत.

    विषय आणि सादरीकरणाच्या कक्षा रुंदावणाऱ्या या भव्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी कलाकार मंडळी दिसणार आहेत. नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल  कुलकर्णी, मकरंद देशपांडे, मुक्ता बर्वे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने असे दिग्गज चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. रुद्रा ग्रुप आणि चित्राक्ष निर्मिती यांच्या या चित्रपटात ‘फकिरा’ ही मध्यवर्ती भूमिका कोण करणार? हे अजून गुलदस्त्यात आहे.

    चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची स्नूषा सावित्रीबाई मधुकर साठे, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, अभिनेते नागेश भोसले, कमलेश सावंत, चित्रपटाचे डीओपी वीरधवल पाटील, लेखक मंदार जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.

    ‘नशिबाने साथ दिली तर उत्तम कलाकृती साकारायला मिळते. माझ्या नशिबाने ‘फकिरा’ ही कलाकृती साकारण्याचे भाग्य मला मिळाले, याबद्दल दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी समाधान व्यक्त केले. ‘अशा विषयाचा चित्रपट करण्यासाठी अंगी अचाट धाडस लागते. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे याने हे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो असे म्हणत, अभिनेते नागेश भोसले यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. एका उत्तम प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद अभिनेते कमलेश सावंत यांनी व्यक्त केला.

    समाजाला भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, इंग्रजी राजवटीचा आत्यंतिक जुलूम आणि सर्वांविरोधात बंड करणारा लढवय्या ‘फकिरा’ याचे यथार्थ चित्रण करणाऱ्या ‘फकिरा’ कादंबरीचे  चित्ररूप  रुपेरी पडद्यावर पहायला  मिळणार आहे. २०२५ मध्ये ‘फकिरा’ प्रेक्षकांच्या  भेटीला  येणार आहे.

  • कलर्स मराठीची नवीन मालिका… ‘सुख कळले’!!!!!

    कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वा.

    महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका आपल्या मायबाप रसिकांच्या भेटीला आणतेय.

    या निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमाला भरत जाधव, सरिता जाधव, आदेश बांदेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांच्यासोबत मजेदार खेळही खेळण्यात आले.

    आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘ सुख कळले!’

    सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं… स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात नि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे, हे सांगणारी , त्यांच्या निखळ , निःस्वार्थी प्रेमाची ही कथा म्हणजेच ‘सुख कळले!’ २२ एप्रिलपासून कलर्स मराठीवर दाखल होतेय. याचे सगळे गोड प्रोमो रसिकांच्या भेटीला आले नि रसिकांनी मालिका पडद्यावर येण्याआधीच मालिकेला आपले करायला सुरूवात केलीय. माधव- मिथिलाच्या भूमिकेत रसिकांना भेटायला येणाऱ्या सागर देशमुख आणि स्पृहा जोशी यांच्या कमाल जोडीचं प्रेक्षक खूप कौतुक करतायत. या कसदार कलावंतांना पडद्यावर एकत्र पाहणं हेही सुखच असणार आहे, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळतेय. मराठी मनोरंजनाच्या इतिहासांत पडद्यावर येण्याआधी रसिकांची लाडकी होणारी “इंद्रायणी” मालिकेनंतर ही दुसरी मालिका आहे, याचा कलर्स मराठीला नितांत अभिमान आहे.

    आपल्याकडे प्रत्येक गोष्ट असणे म्हणजे सुख नाही. तर कधीकधी दुसऱ्यांच्या सुखातही आपले सुख असू शकते. कधी दुसऱ्याला खुश ठेवण्यातही सुख असते. तर कधी त्यागातही सुख असते. माधव आणि मिथिलाचे सुख कशात आहे? हे सांगणारी कथा म्हणजे ‘सुख कळले’. हीच निःस्वार्थी, निर्मळ प्रेम कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे २२ एप्रिलपासून आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. यापूर्वीच या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलेयत. त्यामुळे आता प्रतीक्षा लागली आहे ती माधव आणि मिथिलाच्या भेटीची. या मालिकेतील माधव -मिथिला म्हणजेच सागर देशमुख आणि स्पृहा जोशीने याआधीच प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या नवीन जोडीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असून केवळ प्रोमोवरही प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांचा , त्यांच्या प्रेमाचा धुंवाधार वर्षाव होतोय.

    स्पृहा व सागरच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत अर्नवी खडसे, सुनील गोडबोले, स्वप्निल परजणे, अनिरुद्ध जोशी, स्वाती देवल, आरती वडगबाळकर, शशांक दर्णे, स्वराध्य देवल आणि स्वाती बोवलेकरसह अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक घराला नि घरातल्या प्रत्येकाला आपली वाटणाऱ्या या मालिकेची कथा कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड आणि नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्राचे आजचे आघाडीचे लेखक – दिग्दर्शक केदार शिंदे यांची असून त्या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली आहे. तर सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर या मालिकेचे खंदे निर्माते आहेत.

    तेव्हा आता रसिकहो, २२ एप्रिलपासून सोम ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर तुमच्या सर्वांच्या सुखासाठी…..“सुख कळले” साठी सज्ज व्हा!!!!