Home

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !

    नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. 

    शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळतो.
    शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय त्यामुळे ‘संगीत मानापमान’ ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळतोय. 

    कथा शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची, जिओ स्टुडिओज् सादर करत आहे ‘संगीत मानापमान‘ चा भव्य दिव्य ट्रेलर

    विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच “भामिनी” चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय, वैदेहीची एक नवीन झलक आपल्याला पहायला मिळते. तसच  कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन ह्यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते आणि इतर दिग्गज आणि नामवंत कलाकार एकाच सिनेमात असल्यामुळे प्रेक्षकांना जणू उत्सवाचं निमित्तच मिळतं.

    हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरेल आवाजाची अनुभूती,संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय.  ‘संगीत मानापमान’ साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.

    *संगीत मानापमान सर्व रेकाॅर्ड तोडेल असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी दाखवला, लाँचच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले*

    *”सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या मुंबई येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता असलेले नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘संगीत मानापमान’ विषयी इतिहासात वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते.*

    *मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपली मराठी, संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहायला हवा. आपली संस्कृती, कला, संगीत, या सगळ्याला रिइन्व्हेंट करणे, अशाप्रकारे हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर असून यावरुनच चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. सुबोध भावे व त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन. संगीताशिवाय ‘संगीत मानापमान’ पूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी शंकर एहसान लाॅय यांचे अभिनंदन.*

    *आमच्या कार्यकाळामध्ये मराठी चित्रपट, नाटक, विविध कलांच्या आविष्काराला योग्य व्यासपीठ मिळायला हवे, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु. ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून विश्वास व्यक्त करतो की, हा चित्रपट सर्व रेकाॅर्ड तोडेल आणि प्रेक्षकांनाही भावेल. मी देखील हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे.”*

    इतकच नव्हे तर दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे आपलं मत व्यक्त करत म्हणाले “संगीत मानापमान मधील दिग्दर्शन आणि अभिनय हा एक माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला मनापासून आदरांजली आहे आणि  अशी कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”

    मीडिया आणि कन्टेन्ट बिझनेस, RIL च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे सुद्धा यावेळी म्हणाल्या “जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही आकर्षक कथाकथनाद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. संगीत मानापमान हा चित्रपट प्रेम संस्कृती कला परिश्रम याच  प्रतीक आहे आणि कला आणि संस्कृतीचे खरे जाणकार श्री देवेंद्र फडणवीस यांनी या विलक्षण प्रवासाचा शुभारंभ केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करते, जे महाराष्ट्राचा वारसा साजरा करते.

    जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.

    एकंदरच नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार असल्याचं दिसतंय. “संगीत मानापमान!” एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

  • फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज

    काही दिवसांपूर्वीच दाभाडे कुटुंबीयांनी गुलाबी थंडीत मस्त ‘यल्लो यल्लो’ हळदीचा जबरदस्त समारंभ साजरा केला. त्यावेळी या दाभाडे कुटुंबाची थोडी तोंडओळख प्रेक्षकांना झालीच. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ही दाभाडे फॅमिली का फसक्लास आहे, याचा अंदाजही प्रेक्षकांना आला आहे. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    हेमंत ढोमे यांचे चित्रपट नेहमीच वास्तविकतेला धरून असतात. त्यातील पात्रे नेहमीच आपल्या आजूबाजूची, आपल्या घरातील असतात आणि म्हणूनच त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचे वाटतात. असेच एक तुमच्या आमच्या सारखे कुटुंब प्रेक्षकांना ‘फसक्लास दाभाडे’ मध्ये पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये हसतं-खेळतं दाभाडे कुटुंब दिसत असून भावंडांमधील भांडणे, कुरबुरी यात दिसत आहेत. हे सगळे दिसत असतानाच त्यांच्यातील घट्ट बॉण्डिंगही दिसत आहे. दाभाडेंच्या घरातील या तीन खांबांना भेटणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.

    निर्माते भूषण कुमार म्हणतात, ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट कुटुंबातील प्रत्येकासाठी खास असणारा आहे.  प्रत्येक वयोगटासाठी असणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी सहकुटुंब पाहावा. हा चित्रपट पाहाताना यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याच घरातील भासेल. चेहऱ्यावर हास्य आणणारा हा चित्रपट आवर्जून बघावा.”

    निर्माते आनंद एल राय म्हणतात, ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट म्हणजे कुटुंबातील नातेसंबंधांचा उत्सव आहे. जो हास्य, भावना आणि जीवनातील साध्या क्षणांचा आनंद साजरा करतो. हेमंत ढोमे यांची लेखणी आणि दिग्दर्शनाचा नवा दृष्टिकोन प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करतो. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी उत्सुक आहोत”.

    चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘फसक्लास दाभाडे’ हा फक्त एक चित्रपट नाही तर कुटुंबातील विविध पैलूंना हसत-खेळत उलगडणारी एक सफर आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या जुन्या क्षणांचा, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक आठवणींना उजाळा देणारा एक फोटो अल्बमच आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट आपलासा वाटेल याची खात्री आहे.

    खुळ्या भावंडांची ही इरसाल स्टोरी प्रेक्षकांना २४ जानेवारीपासून मोठ्या पडद्यावर पाहाता येणार आहे. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘फसक्लास दाभाडे’चे  भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओज करत आहे.

  • सन मराठी’ वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेतील सत्या-मंजूच्या रोमँटिक गाण्याची प्रेक्षकांना पडणार भूरळ

    ‘सन  मराठी’ वाहिनीवरील नंबर वन मालिका म्हणजेच ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सत्याला मंजूबद्दलच्या प्रेमाची जाणीव झाल्यानंतर मालिका एका रंजक वळणावर आली आहे. याचनिमित्ताने *पहिल्यांदाच* ‘सन मराठी’ वाहिनी लाडक्या प्रेक्षकांसाठी सत्या-मंजूच खास रोमँटिक गाणं भेटीला घेऊन येणार आहे. येत्या सोमवारी  म्हणजेच २३  डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता  हा भाग ‘सन मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलेलं पाहायला मिळतंय. या प्रोमोमध्ये सत्या व मंजूच्या नव्या लूकने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. सातारा शहरात हे गाणं शूट करण्यात आलं. 

    संपूर्ण महाराष्ट्राला लागणार सत्या-मंजूच्या रोमँटिक गाण्याचं वेड

    मंजू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, “संपूर्ण महाराष्ट्रात सत्या-मंजूची जोडी हिट ठरतेय या गोष्टीचा खूप आनंद आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवर  एका मालिकेसाठी गाणं शूट करण्यात येतंय आणि ती मालिका आमची आहे. ही गोष्ट आमच्या टीमसाठी अभिमानास्पद आहे. मंजू नेहमीच प्रेक्षकांना पोलिसांच्या लूक मध्ये पाहायला मिळाली पण या रोमॅंटिक गाण्यात मंजूचा मॉर्डन लूक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जेव्हापासून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर प्रोमो पाहिलाय तेव्हापासून मला खूप मेसेज येत आहेत. प्रेक्षकांचे हे मेसेज पाहून मला काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. आता हे गाणं हिट होणार एवढं नक्की.”

    सत्या ही भूमिका साकारणारा अभिनेता वैभव कदम म्हणाला की, “आमची मालिका नंबर वन आहे या गोष्टीचा आनंद तर आहेच पण ‘सन मराठी’ वाहिनीवर ओरिजिनल गाणं शूट होतंय त्यात आम्हाला संधी मिळाली. यासाठी खरंच ‘सन मराठी’चे खूप आभारी आहोत. सातारा मधील प्रेक्षकांनी सत्याला खूप आपलंस केलं आहे. सत्या-मंजूला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड वाट पाहिली. आता खऱ्या अर्थाने सत्याला मंजूचं वेड लागलंय. प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी सत्या- मंजूचं हे रोमँटिक गाणं तयार आहे.”

  • नागेश भोसलेंचा ‘अनुजा’ लघुपट ऑस्करच्या शर्यतीत

    ऑस्कर २०२५ ची सध्या चांगलीच चर्चा आहे. ऑस्कर २०२५ सोहळा पुढील वर्षी थाटामाटात संपन्न होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत इथल्या संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या ‘अनुजा’ या भारतीय लघुपटानेही यंदाच्या ऑस्करच्या लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. ‘लाइव्ह-अ‍ॅक्शन’ शॉर्ट फिल्ममध्ये ‘अनुजा’ १८० शॉर्ट फिल्मसमधून निवडण्यात आली आहे. ‘अनुजा’ची निर्मिती सुचित्रा मटाई यांची असून गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. हा लघुपट वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे. एडम.जे.ग्रेव्स लिखित, दिग्दर्शित या लघुपटामध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले तसेच सजदा पठाण, अनन्या शानभाग, गुलशन वालिया, सुशील परवाना, सुनीता भादुरीया, जुगल किशोर, पंकज गुप्ता, रोडॉल्फो राजीव हुर्बेट सारख्या कलाकारांनी अभिनय केला आहे. ‘अनुजा’ची कथा एका भारतीय मुलीवर आधारित असून इंडो-अमेरिकन प्रोडक्शन अंतर्गत त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ऑस्करच्या लघुपट श्रेणीत ‘अनुजा’ लघुपटाला स्थान मिळाल्याबद्दल अभिनेते नागेश भोसले यांनी आनंद व्यक्त केला आहे.

    याबद्दल बोलताना नागेश भोसले सांगतात की, ‘ऑस्कर सारख्या मानाच्या सोहळ्यात आपला लघुपट असणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बालमजुरी सारखा सामाजिक प्रश्न या लघुपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडला असून एका उत्तम टीमचा भाग होता आल्याचा आनंद निश्चित आहे’.

    ९७ व्या ऑस्कर पुरस्कार-२०२५ च्या पुरस्कारासाठीची नामांकने १७ जानेवारीला जाहीर होणार आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये विजेते घोषित केले जातील. त्यात ‘वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करणारा ‘अनुजा’ लघुपट बाजी मारतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चित्रपटाच शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातल गाणं ‘ऋतु वसंत’ झाल प्रदर्शित !!

    वसंत ऋतुच्या सौंदर्याने आणि मोहकतेने संगीत मानापमान चित्रपटालाही भूरळ घातली आहे. या चित्रपटात वसंत ऋतूच्या उत्सवाला साजर करणारं एक गाणं नुकतंच रिलीज झाल आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी बरोबरच खुद्द शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसतायत.   ५००हून अधिक डान्सर्स, पारंपरिक वेशभुषा, कमालीचं  नृत्य, गाण्यातील साधेपणा थेट मनाला भिडणारे बोल असं सुंदर मिश्रण, एवढंच नव्हें तर शंकरजी आणि बेला यांचे सुमधुर स्वर चार चाँद लावत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडतायत. गाण्यात सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी ह्या दोघां कलाकारांची हलकी फुलकी, गोड, सोज्वळ केमिस्ट्री सुद्धा कमालीची दिसतेय.

    गाण्याचे बोल समीर सामंत ह्यांनी अतिशय सुंदर लिहिले आहेत. शंकर एहसान लॉय यांचं संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून तरुण पिढीलाही थिरकायला लावेल एवढं नक्किच. एखादा लढा जिंकून आल्यावर जो भाव एका मावळ्याच्या मनात असतो तशीच काहीशी भावना, तोच जश्न ह्या सुरेख सिम्पल गाण्यात आपण बघू शकतो.

    आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय ह्यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत.  तर ह्या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे.

    जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” ची म्युझिक कंपनी सारेगामा आहे.
    चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.  चित्रपटाचे पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. अशाप्रकारे ‘ऋतु वसंत’ हे गाणं साऱ्यांच्या खास करुन प्रेमी युगलांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झालं आहे. येत्या नवीन वर्षी म्हणजेच १० जानेवारी २०२५ ला संगीताने नटलेला हा चित्रपट थिएटरमध्ये अनुभवायला सज्ज व्हा.

  • मायरा वायकुळ चमकणार ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटात

    टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय असलेली मायरा वायकुळ आगामी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात झळकणार आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या  या चित्रपटाचे पहिले पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी मायरा वायकुळ, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते.

    श्री सिद्धिविनायकाच्या चरणी  ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च


    ए सी डी कैटचे मनीष कुमार जायसवाल आणि साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली असून या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण केले आहे. किमाया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे  या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर चिनार – महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. 

    सहकुटुंब पाहता येणारा  ”मुक्काम पोस्ट देवाचं घर’ ३१ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात



    अल्पावधीतच जगभरात पोहचलेल्या मायरा वायकुळची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत,सविता मालपेकर, प्रथमेश परब,  सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात मायराच्या वाट्याला आलेली भूमिका काय आहे? सोशल मीडियावर सुरु असलेल्या पोस्टकार्डच्या प्रमोशनचा चित्रपटाशी नक्की कसला संबंध आहे?  हे जाणुन घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत आपल्याला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

  • ‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!

    विजय कोंडके दिग्दर्शित आणि निर्मित ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक भावनांनी परिपूर्ण चित्रपट झी टॉकीजवर आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर, रविवार, दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरद्वारे प्रदर्शित होणार आहे.

    चित्रपटात अनुभवी आणि नवोदित कलाकारांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. गार्गी दातार मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत सुरेखा कुडची, यतीन कार्येकर, कमलेश सावंत, ओंकार भोजने, शुभांगी गोखले, सविता मालपेकर, प्राजक्ता हणमघर, अभिजीत चव्हाण, आणि नयना आपटे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

    ‘लेक असावी तर अशी’ ही कथा प्रेम, जिव्हाळा, आणि कौटुंबिक नात्यांवर आधारित आहे, जी प्रेक्षकांना भावनिक अनुभव देईल. विजय कोंडकेंच्या ‘माहेरची साडी’ या सुपरहिट चित्रपटानंतर हा त्यांचा आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

    झी टॉकीज नेहमीच दर्जेदार कौटुंबिक चित्रपटांची मेजवानी देत असते, आणि ‘लेक असावी तर अशी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाचा खास अनुभव घेता येईल.

    झी टॉकीज चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले , ” झी टॉकीजवर ‘लेक असावी तर अशी’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. विजय कोंडके यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट कौटुंबिक मूल्ये, प्रेम, आणि नात्यांची हृदयस्पर्शी कथा मांडतो. प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे एक भावनिक आणि समृद्ध अनुभव मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. झी टॉकीज नेहमीच दर्जेदार आणि मनोरंजक चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी आणण्यास वचनबद्ध आहे, आणि ‘लेक असावी तर अशी’ हा चित्रपट त्याच परंपरेचा एक भाग आहे.”

    झी टॉकीजवर, रविवार, २२ डिसेंबर रोजी, दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता जरूर पाहा ‘लेक असावी तर अशी’!

  • अभिनेत्री छाया कदम प्रथमच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

    हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजतं आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आता छाया कदम ‘स ला ते स ला ना ते’ या आगामी ७ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

    स ला ते स ला ना ते’ ७ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात



    स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती केल्या आहेत. त्यांच्या मराठी-हिंदी टीव्ही मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय चित्रपटांतून मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची शैली आहे. ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. ही फिल्म अ प्लाटून वन  डिस्ट्रीब्युटर्सचे शिलादित्य बोरा रिलीज करत आहेत

    वृत्तवाहिनीचा रिपोर्टर आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांची अनोखी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या प्रेमकहाणीत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येतात. त्यात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची ठरते. या पोलिस अधिकाऱ्याला छाया कदम यांनी त्यांच्या शैलीत अतिशय उत्तमप्रकारे न्याय दिला आहे. प्रत्येक भूमिकेत आपल्या अभिनयाचं वेगळेपण त्यांनी अधोरेखित केलं आहे. त्यामुळे “स ला ते स ला ना ते” या चित्रपटात त्यांचा पोलिस अधिकारी किती भाव खातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

  • महाराष्ट्र भूषण अशोक सराफआणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

    ‘राजकमल एंटरटेनमेंट’ या पूर्णतः नवीन प्रॉडक्शन हाऊसच्यामार्फत प्रेक्षकांना एक नवा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यवार अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ‘राजकमल एंटरटेनमेंट’ ही नवीन कंपनी सुरू करणारे मालक म्हणजेच राहुल शांताराम, हे चित्रपती व्ही. शांताराम, ज्यांनी मराठी सोबतच संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले, त्यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव आहेत. आपल्या आजोबांकडून प्रेरणा घेत, राहुल शांताराम यांनी हितकारक मनोरंजन देणारे चित्रपट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चित्रपटाचे शीर्षक अजून गुलदस्त्यातच असले, तरी या चित्रपटात अनेक वर्षांनी आपल्याला  दिग्गज अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गाला नक्कीच हा चित्रपट एक मेजवानी ठरणार आहे. थोडी खट्याळ, थोडी गोंडस आणि थोडी हळवी अशी ही अनोखी गोष्ट आपल्या समोर सादर करायला राहुल शांताराम हे सज्ज आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश गुप्ते हे करत आहेत.


    अभिनेते अशोक सराफ ह्यांनी या आगामी सिनेमाबद्दल आपलं मत व्यक्त करत सांगितलं “बऱ्याच काळानंतर मला इतकी सशक्त भूमिका साकारण्यासाठी मिळालीय, जिची मी वाट बघत होतो. चित्रपटाची गोष्ट सध्याच्या काळाशी सुसंगत आहे. दिग्दर्शक लोकेश गुप्तेने चित्रपटाचा विषय निवडून अगदी सुरेख काम केलंय. शूटिंग दरम्यान त्याचा सिनेमा या माध्यमाचा अभ्यास आणि त्यावरील पकड मला दिसली. वंदना गुप्ते या हरहुन्नरी अभिनेत्रीसोबत मी यापूर्वीही काम केलंय. ती व्यक्ती आणि अभिनेत्री या दोन्ही स्वरूपात कमालीची उत्कट आणि हजरजबाबी आहे. तिचं आणि माझं गिव्ह-अँड-टेकचं टायमिंग छान आहे, त्यामुळे या दोन्ही पात्रांना उठावदारपणा आलाय. आम्ही दोघांनीही नेहमीसारखं प्रामाणिकपणे, जीव ओतून आपापलं पात्र साकारलंय. तिच्यासोबत काम करताना नेहमीच मजा येते.  विशेष म्हणजे, निर्माता राहुल शांताराम ह्याला मी लहानाचा मोठा होताना बघितलेलं आहे. त्याचे वडील आणि माझा मित्र किरण शांताराम याला माझी बायको निवेदिता गेली ३३ वर्ष राखी बांधत आलेली आहे, त्यामुळे राहुल हा माझा भाचाच आहे. आता स्वतंत्र निर्मिती करत असताना त्याची सिनेमाबद्दलची जबाबदारी, संपूर्ण युनीटसाठी असलेली तळमळ आणि कामाचा उत्साह बघून त्याचं मला मनापासून कौतुक वाटतं. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांची उत्तम भट्टी जमून आलेली आहे. त्यामुळे आमच्याइतकी मज्जा प्रेक्षकांनासुद्धा चित्रपट बघताना येईल, असा विश्वास वाटतो.”

    चित्रपटाविषयी बोलताना राहुल शांताराम ह्यांनी सांगितलं, “राजकमल एंटरटेनमेंट नेहमीच विविध भाषांमध्ये सिनेमा आणि डिजीटल माध्यमात उत्तम आणि दर्जेदार मनोरंजन देण्याच्या प्रयत्नांत आहे. मातीतल्या, स्थानिक गोष्टी जगभरात पोहोचवण्याचा आमचा कयास आहे. आमचे मोठे पप्पा अर्थात् चित्रपती व्ही. शांताराम यांच्याप्रमाणेच सिनेमामधल्या कलावंत आणि तंत्रज्ञांच्या टॅलेंटला हक्काचा प्लॅटफॉर्म देण्याच्या हेतूनं आम्ही काम करतो. म्हणूनच आम्ही आमच्या संस्थेची नवी सुरूवात एका खास मराठी चित्रपटासोबत करतोय. लोकेश जेव्हा आमच्याकडे गोष्ट घेऊन आला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपसूकच अशोक मामा आणि वंदनाताई आले. या दोघांसोबत काही इतर अनुभवी कलाकार आणि अत्यंत नवीन आणि फ्रेश टॅलेंटसुद्धा आपल्याला बघायला मिळतील.”

    इतकंच नव्हे तर सिनेमात काम करण्यासाठी उत्साही असलेल्या वंदना गुप्ते ह्यांनीसुद्धा आपलं मत व्यक्त करत सांगितलं, “सगळ्यांत आधी, ‘राजकमल एंटरटेनमेंट’सोबत चित्रपट करणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर, अशोक सराफसारखे एक उत्तम अभिनेते चित्रपटात आहेत. अशोक सराफ हा अत्यंत कसलेला अभिनेता आहे. कॅमेऱ्याचा प्रत्येक अँगल, दिग्दर्शकाने लावलेली फ्रेम, या प्रत्येक पैलूचा त्याचा बारीक अभ्यास आहे. त्यानुसार आपल्या अभिनयाची शैली बदलत राहणं आणि मुख्य म्हणजे, आपल्या सोबतच्या प्रत्येक कलाकाराला पूर्णपणे कम्फर्टेबल करणं, यांत त्याचा हातखंडा आहे. त्यासाठी हॅट्स ऑफ टू हिम. त्याच्यासोबत मी अनेकदा काम केलं आहे आणि दरवेळी खूप समाधान मिळालेलं आहे. खूप वर्षांनी पुन्हा त्याच्यासोबत अभिनय करायची संधी मिळाली आणि मी ती सोडली नाही. लोकेश गुप्ते यांनी अतिशय छान स्क्रिप्ट लिहिलीय आणि दिग्दर्शनही उत्तम केलंय. ह्या सुवर्णसंधीबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि पडद्यावरून प्रेक्षकांना भेटायला जाण्याची आतुरतेने वाट पाहतेय.”

    सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते हे देखील चित्रपटाविषयी म्हणाले, “या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या मराठीतील दोन दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. दोघांनीही नाटक, चित्रपट, मालिका ही सर्व माध्यमं अक्षरशः गाजवून सोडलीत. वंदना गुप्तेंसोबत वेगळं नातं आहे, माझ्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर मी नाटक केलं. पण आता या चित्रपटाच्या निमित्ताने मी एक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. अशोक सराफ सरांसोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. कलाकार म्हणून त्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असलं पाहिजे, ही दिग्दर्शक म्हणून माझी जबाबदारी होती. या सगळ्यासाठी मी धन्यवाद देतो निर्माते राहुल शांताराम यांना, त्यांच्या प्रयत्नामुळे हा चित्रपट जुळून आला. हा अनुभव आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील.”

    ‘राजकमल एंटरटेनमेंट’चा हा नवा चित्रपट नवीन वर्षी म्हणजेच १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या भेटीला येणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक अभूतपूर्व पर्वणी ठरणार हे नक्की.

  • जिलबी चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित

    अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सध्या मात्र हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. प्रसाद ओकच्या केसची धुरा स्वप्नील जोशी  सांभाळणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच नेमकं प्रकरण काय ? आणि कोणती केस? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला १७ जानेवारीला येणारा ‘जिलबी’ चित्रपट पहावा लागेल.

    ‘मला ना गोल गोल फिरवता येत नाही’ मी डायरेक्ट पॉईंट वर येतो. ‘एकदा सुरू झालं ना..की मुळासकट सगळं बाहेर निघेल..! अशा दमदार संवादांसह  जिलेबीचा टिझर प्रदर्शित झाला आहे. घटना-प्रसंगांतून निर्माण झालेले गूढ उकलताना उद्योगपती सौरव सुभेदार डॅशिंग पोलीस अधिकारी विजय करमरकर याची मदत घेतात. यातील पोलीस अधिकारी विजय करमरकर याची भूमिका स्वप्नील साकारणार आहे. स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक या दोन आघाडीच्या कलाकारांनी एकत्र सिनेमात दिसावं असं त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटत असतं, ‘जिलबी’च्या निमित्ताने या दोन अष्टपैलू कलाकारांना एकत्र बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.

    आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद सांगतो, ‘वेगवेगळया भूमिका आणि उत्तम कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं.’ ‘जिलबी’ च्या निमित्ताने एक वेगळी भूमिका करण्याची संधी मिळाली. अत्यंत रुबाबदार, सगळ्या क्षेत्रात दबदबा आणि मानसन्मान असेलला उद्योगपती सौरव सुभेदार करताना मला ही तितकीच मजा आली. गोड आणि गूढ असे दोन्ही स्वाद देणारी  ‘जिलबी’  प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील.  

    ‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. 

    आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने आणलेला ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.